Tuesday 15 August 2023

हृदयस्थ दरवळ ..





त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती,
'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात.
बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात.
तिने टेक्स्ट मेसेज केलेला -
'काहीही अडचण न सांगता नक्की ये... '


जगभराचे ओझे बाजूला सारून
तो वेळेवर येऊन थांबलेला.
घामेजलेल्या चेहऱ्याने.
लांबूनच ती येताना दिसली.
हायसे वाटले तरीही
घशाला कोरड पडली होतीच.
घाईघाईने रस्ता ओलांडून ती समोर आली.

तिला पाहून चेहरा पडला.
तिचे डोळे डबडबलेले!
बराच वेळ ते दोघे बोलत होते,
गाड्यांचे हॉर्न त्यांना ऐकू येत नव्हते!

रडवेल्या आवाजात
अचानक तिने काही तरी सांगितले
त्याच्या काळजात धस्स झालं.
अश्रू निखळले.
भरमार गर्दीतही ते आता पुरते एकटे होते
त्यांचा एकांत त्या वाहतुकीपेक्षा अजस्त्र होता.

बराच वेळ ते मौन बसून होते
बहुधा ते एकमेकांना महसुस करत होते,
ते क्षण काळजात खोलवर साठवत होते.
तिच्या घरुन फोन येत होते,
बऱ्याचदा तिने कॉल कट केला
अखेर तिने कॉल रिसिव्ह केलाच!
पलीकडून काळजीयुक्त दरडावणीचा स्वर होता
बारीक आवाजात ती काहीतरी बोलली
कॉल कट केला नि फोन पर्समध्ये ठेवून दिला.
तिला आता निघायचं होतं,
पाय उचलत नव्हते
काळीज थांबत नव्हतं पण निघावं तर लागणारच होतं.
त्याच्या नजरेला नजर न देता ती काही पुटपुटली,
तिचा संयम आता संपत आला होता
त्याच्या हातात काहीएक चीज
तिने गडबडीत सरकावून दिली
नि ती हमसून हमसून रडतच तिथून निघाली.
तो तिला पाठमोरा पाहत उभा राहिला.
नेहमीप्रमाणे तिच्यासाठी आणलेला गजरा
त्याच्या म्लान हातात तसाच राहिला.

तिने एकदोनदा मागे वळून पाहिले
नि ती गर्दीत नाहीशी झाली
बराच वेळ तो तिथेच थिजून होता. 
तिने त्याला सांगितलेलं की, आपली ही शेवटचीच भेट आहे
काय पहायचे आहे ते नजरभरुन पाहून घे!
पुन्हा भेट होईल न होईल ठाऊक नाही!

बरीच वर्षे झाली या गोष्टीला.
तो जिथे उभा राहायचा
तिथे आता बकुळाचे झाड आहे, 
वर्षा दोन वर्षाकाठी एक पोक्त प्रौढा
तिथे येऊन लपूनछपून झाडाला मिठी मारते,
निघताना डोळे पुसते.
बहुधा 'त्या' रात्रीसही तिला मिठी मारायची होती,
मात्र ती राहूनच गेली असावी. 

आताशा 'तिचा' तरुण मुलगा अधुनमधून मला भेटत असतो
'त्याच्या'च नावावरून तिने मुलाचे नाव ठेवलेय, परिमल!
'त्याचा' दरवळ अजूनही तिच्या हृदयात आहे!

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...