Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

Sunday, 8 February 2026

तोडलेल्या झाडाचे प्रतिबिंब ..



दूर कुठे तरी एकट्याने मरून पडलेल्या
देहपंख विद्ध झालेल्या पक्षाच्या
भिंगुळल्या डोळ्यात
बारकाईने
निरखून पाहिले तर
तोडलेल्या झाडांचे थिजलेले प्रतिबिंब दिसते.

__________________________ 


झाडं माणसासारखी कृतघ्न नसतात;
झाड कापण्यासाठी जे त्यांच्या छायेत येतात
त्यांनाही ते सावली देतात!

कृतघ्न तर माणूस असतो, जो स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो!
मुकी बिचारी झाडं कधी उलटून बोलत नाहीत,
पण एके दिवशी निसर्ग असं काही करून दाखवतो की
मग पश्चातापालाही वेळ मिळत नाही!

- समीर गायकवाड

Wednesday, 17 December 2025

पूर्वी एक पक्षी गझल गायचा..



पूर्वी एक पक्षी गझल गायचा, 
चार पाच झाडे ती ऐकत राहायची.

ज्यांच्या बद्दल बोललं जायचं, 
ती माणसंही मोजकीच असायची.

रात्र होताच फुल उमलायचे, 
चौदिशांना सुंगंधाची नजर असायची...

आताशा सांज विलक्षण मौन असते, 
वारा शोधित फिरतो झाडांना

विराणी खोल घुमते अंधारी, 
पक्षांची ती गझल आता कशी ऐकायची?

Friday, 12 December 2025

वळणावरती झाड उभे..

 


वळणावरती झाड उभे कलंडूनी आकाशाला
घरट्यामधले पक्षी गाती सावलीच्या गीताला

भरदार बुंधा, हिरवी कोवळी पाने शेंड्याला
उनाड वारा अलगद झोंबतो नव्या कोंबाला

टक्क दुपारी जित्राब अज्ञात येते आसऱ्याला
भिंगुळली उन्हे रेंगाळती पानांच्या पदराला

अंगाई अंधाराची रात्रीस निजवते पानांला
स्वप्नी दिसे आर्तवन पानमिटल्या झाडांला

होता सुर्योदय पाने हसरी वंदिती विधात्याला
भुरळ झाडाच्या प्रेमाची नित्य पडते मातीला!

वळणावरती झाड उभे कलंडूनी आकाशाला
सावलीत निजे कुणी कुऱ्हाड घेऊनी उशाला

- समीर गायकवाड

Wednesday, 10 February 2021

काळजाची बाभळ ..


कालच्या पावसाची नाही जमली वेचणी
स्वप्नांची झाली छाटणी

वाहून गेला जुंधळा, कांदा कोवळा
थरारल्या साक्षीच्या कातरवेळा

विस्कटल्या तुरी
पानगळल्या बोरी.

फड सैरभैर ऊसाचा
शिग तरंगला कडब्याचा.

पाखरांची शाळा बांधावर
घरट्याचं मढं झाडावर

मोडल्या माना वृक्षांच्या
विझल्या वाती दिव्यांच्या

आता पुन्हा रिती दावण
छळती तिचे जुनेच व्रण.

गोठ्याच्या छताला
आता टांगतो भविष्याला

तरीही पावसाचे या नुठले वळ
काळजाची झाली बाभळ....

- समीर गायकवाड

Thursday, 8 August 2019

पूर


पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शिरलंय गावाबाहेरच्या उपेक्षित वस्त्याही पाण्यात बुडाल्यात आणि गावातल्या चिरेबंदी वाड्यांच्या ढेलजाही जलमय झाल्यात. मंदिराच्या कळसाभवती आणि मास्जिदीच्या मीनारांभवती घुमणारे पक्षी कधीच उडून गेलेत. गणेशपेठ, भीमनगर आणि मोमीनगल्लीही पाण्यात बुडून गेलीय. पावसाने भेदाभेद केलेला नाही.... हाहाकारातून वाचण्यासाठी वडाच्या फांद्यांना शेजारच्या पिंपळाचा आधार आहे. एकाच झाडावर असणाऱ्या उध्वस्त घरट्यातले भिन्नवर्गीय पक्षी ओलेत्या पंखांनी शेजारी बसून आहेत. पाऊस उघडला की पुन्हा एकमेकाशेजारी ते आपलं घरटं नव्याने बांधणार आहेत. एव्हढेच नव्हे तर जमिनीच्या हिश्शावरून वाद असलेल्या एकाच बांधावरल्या बोरींनी बाभळींना मदतीचा शब्द दिलाय ! आपण तर प्रगत जीव आहोत चला सर्वांना मदतीचा हात देऊया... - समीर गायकवाड.

Wednesday, 8 May 2019

माती

काळ्या मातीत रुजलेल्या खोल मुळांसारखीच आई असते.
सारखी ती दबून राहते, तरीही मातीला खोल खोल भिडत राहते.
हजार फुटवे उगवतात तिच्या देहावर आणि ती झाड जगवत राहते.
अंधारल्या जगातली मुळं अनभिज्ञ असतात मातीवरच्या जगाला...
तर ऊन, वारा, पाऊस झेलणारा झाडाचा बुंधा हा बापासारखा असतो. 
मातीतल्या मुळांना घट्ट धरून असतो.
जणू मुळांच्या अस्तित्वात तो एकजीव होऊन गेलेला असतो.
अंगाखांद्यावरती फांद्यांचे ओझे समर्थपणे पेलत राहतो.
कधी कधी कुऱ्हाडीचे घावही सोसतो,
अर्ध्यातून कापला जातो तरीही हिरवा कोंब मस्तकावर नव्याने उगवत राहतो...
झाडावरची पानं, फुलं मात्र खुशीनं डवरत असतात,
वारयावरती डुलत असतात, सूर्यप्रकाशात हसत असतात.
काही फुलं गळून पडतात तर काहींची फळं होतात ;
फळांच्या बिया फिरून पुन्हा मातीमध्ये रुजतात...


आणि नव्याने सुरु होतो तटतटलेल्या मुळांचा आणि टणक होत चाललेल्या कोवळ्या झाडाचा प्रवास...


- समीर.

एक ऋतू काय बदलला!


ऊन थोडंसं निष्प्रभ काय झाले, रंग फुलांचे फिके झाले  
येता राज्य उदास मेघांचे, घर सावलीने ही सोडले!

सोने धुंद बहाव्याने उधळले, पक्षी तरीही न परतले
होताच दोनेक पाऊस, झाडांनी करार हिरवाईशी केले
 
'यंदा उन्ह जरा जास्त होतं, हे आता नित्याचेच झाले’
असं म्हणत गवताच्या पात्यांनी, वसे तलवारीचे घेतले

रस्त्यातून थोडं पाणी वाहताच, भाव कागदी नावांना आले,
कलत्या सांजेला झुरतात आता, उन्हाच्या कवडशांचे प्याले
   
रंगला नच जरी पाऊस पुरता, तरी शब्दांनी साज ल्याले
रात्रीस घनगर्द आमराईत, आभाळ तारकांनी लगडले

तुझ्या कमनीय आरस्पानी देहात, टिपूर चांदणे चमकले
एक ऋतू काय बदलला, रंग माझ्या कवितेने बदलले!!

पहिला पाऊस..

रात्रीच ढगांची जोरदार खडाखडी झाली,
ढगांच्या रांगांनी मग तांबडफुटी अडवली.
एकामागून एक काळ्या ढगांनी अस्मानी डाव रंगवले,
मुसळधार, धुव्वादार, रिपरिप,जोरदार, संततधार असे अनेक डाव झाले.
या वर्षी आभाळातले पैलवान गडी पहिल्यांदाच रंगात आलेत.
आमच्याकडे मस्त कोसळणारा पाऊस घेऊन आलेत.
काळ्या मातीच्या भेटीला तिचे तहानलेले थेंब आलेत,
टपोरया थेंबाचे मेघदूत आज मातीत मनसोक्त न्हालेत....
हा पाऊस पाहुणा आता मुक्कामी रहावा म्हणून आमचे प्राण कंठाशी आलेत....

पहिले उडाण ..



पंखी तयांच्या बळ लाभू दे, आकाश कवेत येऊ दे 

गगन भरारी उंच त्यांची, विश्वाला कौतुके पाहू दे
वाऱ्याच्या झुळूकेवर तयांना, गाणी वेगाची गाऊ दे
गिरक्या घेताना आकाशी, उर्मी चेतनेची लाभू दे
गीत नव्या पंखांचे गाताना, चोचीत गोडवा येऊ दे  

घास प्रेमाचा भरताना, तृणात अमृत झिरपू दे
ऊन,वारा, पाऊस,सावली यांचे भान तयांना येऊ दे
मार्ग न चुको तयांचा, पथदर्शी या दिशांना होऊ दे
घरट्याकडे परतताना कृपा त्यांच्यावर राहू दे
पहिले उडाण त्यांचे, तुझ्या नावाचे असू दे !!

- समीर गायकवाड

माळराने



वाऱ्यांच्या तप्त झुळुकांच्या शिरी दगडफुले नाचती
काटेरी सावल्यांत बाभळीच्या, सरडे थिजती

विखुरल्या मातीच्या अंगाशी उन्हे झोंबती
आभाळाच्या लख्ख आरशात, विहंग चमकती

कोरडया ओढयात शिळा असती टक्क पडुनी
बांधावरच्या सावल्यांत, फुलपाखरे गाती गाणी

जराजीर्ण झाड सजविते स्वप्न पानाच्या देठी
रखरखत्या छायेतही ओल असे, गवताच्या ओठी

मातीच्या कुशीत खोल मुळे शोधित भागीरथी
अंकुरती तरी नवे कोंब, झाडांच्या निष्पर्ण माथी

येता उन्हे डोक्यावर घामासंगे एकांत वाही
नसे उनाड पारवा दूरवर, तरी शीळ घुमते सही

माळरान म्हणजे नभांची नक्षी मातीच्या स्तनी
जिथे उजाडती दिशा, हिरवाईचे गालिचे उसवुनी,

हरवूनी उन्हांना जिंकती तृणफुले तग धरुनी 
सुकती जरी माळराने, शांततृप्ती राहे वास करुनी.. 

सुभग

चांदण्या लुकलुकत्या लेवूनि अंधाराच्या नित्य झोपी जाते रात्र
तरंगतात खुणा जन्मदात्यांच्या भिंतीवरल्या आत माजघरात
अंगाई गीत ओसरीवरच्या पिंपळपानांचे रंगते आर्त स्वरात
कातळ अंधाराचे कुरतडते अलगद कातरवेळेची ओढाळ खार
भरकटलेलं हरिण मनीचे जंगलात मौनाच्या घुसमटते आरपार
साली आठवणींच्या सोलत तिष्टतो कोनाड्यात उद्याचा प्रहर
नभात दूर अंधारल्या ओढतो चिलीम दुःखाची वृद्ध एकाकी मेघ
स्फटिक धवल निर्झरात विरघळतात स्वप्नांचे घायाळ घननीळ
झोपी जातात सावल्या झाडांच्या अंगणात, लटकतात अन पारंब्यात
येताच किरणे पहाटेची कष्टतात झाडे किरमिजी दूर दूर गगनात
पाखरांचे जथ्थे मग उठतात अन झेपावतात उंच उंच आभाळात
होताच सकाळ निजतो मी मेघांच्या अभ्र्यात, जन्मजन्माच्या झुल्यात
पक्षी सुवर्णवर्खी आठवणींचे फडकवत पंख सांगावा सुभगाचा सांगतात...

- समीर गायकवाड

या इथे सपरात माझ्या ...



या इथे सपरात माझ्या, जरा विसावा घ्या
लख्ख पितळी तांब्यातले पाणी गार प्या
सोबतीला खडा गुळाचा ओठी विरघळवा.
पिंपळपान अंगणातले टेकवेल माथा तुमच्या खांदयावरी आस्थेने 
गहिवरल्या गाई हंबरतील मायेने, पाठ तुम्ही धरेला तरी टेकवा
गोऱ्हे तिचे चाटतील हात तुमचे, मायेने त्याला स्पर्श तरी करा!

या इथे सपरात माझ्या, सूर्य खेळे झिम्मा
कवडशात त्याच्या आभाळ पिऊन घ्या
संगतीला बेभान वारे काळजात भिनवा. 
पारिजातक पडवीतला करेल अभिषेक फुलांचा तुमच्या मस्तकावरी
पक्षी फांद्याफांद्यावरचे गातील प्रेमगीत, कानोसा तरी घ्या
बुलबुल टिटव्या साळुंख्या सारेच येतील, जरा चुचकारून बघा!

या इथे सपरात माझ्या, झोपती चांदण्या
उजेडात त्यांच्या स्वतःला निरखून घ्या
संगे चंद्रकोर डोळ्याच्या पाऱ्यात उतरवा.
ईश्वर ढगांच्या मखमली दुलईतला गायील अंगाई थापटून पाठीवरी
गोधडी माह्या मायची देईल ऊब जन्माची, जरा पांघरूण तरी घ्या
चंद्रतारेच काय सारं आभाळ यील संगतीला, जरा डोळे मिटून पहा!

या इथे सपरात माझ्या, नांदतो ज्ञानराजा
शब्दात त्याच्या अर्थ जगाचे समजून घ्या
शोध घेण्यास तयाचा दीप अंतरीचा जागवा.
भिंतीतून येईल हाक अनामिक जणू मायबाप प्रेमाने साद घालती
कणाकणात इथल्या मिळेल स्नेह, नच वाटता आला साठवून तरी घ्या
अर्थ जगण्याचा वा भेटेल देवही, एकदा अंतर्मनात जरा डोकावून तरी बघा!

या इथे सपरात माझ्या, मन लावून एकदा विसावा तरी घ्या!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नियत

हसतमुखाने फाळ म्हणाला मातीला, 
जप आता हिरव्या कोवळ्या अंकुरांना !
माती म्हणाली पावसाला, 
निघ सख्या आता जीव नको टांगू मेघातल्या सूरांना. 
पाऊस म्हणाला वाऱ्याला, 
नको बोलावूस मला आता अवकाळी फिरून भेटायला
वारं म्हणालं पावसाला, 
मी निमित्त असतो नीट मापात राहायला सांग माणसांला !
गदगदलेला फाळ म्हणाला, 
चूक माणसांची तर यांची सजा का मुक्या जित्राबांला ?
गोठ्यातल्या गायी वदल्या, 
माणूस नियतीने राहिला तरच बरकत येईल साऱ्यांला !

- समीर गायकवाड. 

गाव माझे ..

 

त्या तिथे दूर वळणावरती शांत सुंदर गाव वसते माझे

अंधाररात्री चांदणे जिथे फुटक्या छपरावरी निजते 

उजळूनी दाही दिशा उंबरठ्यावरी माथा रवी टेकवितो,

आकाशातला देव अंगणातल्या पानाफुलांत उतरतो,

उनाड अवखळ वारा तटतटल्या कंच पिकातुनी डोलतो

समईच्या ज्योतींचा मंदशीतल प्रकाश नितळ झिरपतो

माय पित्यांच्या अंतरी विश्वेश्वर तृप्ततो जिथे, ते गाव माझे!

विवेक



आभाळाच्या निळाईखाली रांगतो डोंगर,
वाऱ्याच्या कुशीत झिम्मा खेळती पाखरं.

नदीच्या पाण्यात विरतो हवेतला गंध,
मातीच्या पोटात फुटे कंच हिरवा कोंब.

पिंपळाच्या बुंध्यावरती मुंगळ्यांची रांग,
पानाआडून किरणे मारी हवेत सुरंग.

गोठ्याच्या छपरात चालती किड्यांचे डाव,
बैलांच्या डोळ्यात दिसे काळजाचा ठाव.

नाही पिकलं धान्य तरी खुश हे गणगोत,
बीज सुकले तरी उरी असे आशेची ज्योत.

मातीच्या काळजात भेगाळले आभाळ,
धरित्रीच्या लेका तुझा तूच झालास रे काळ .

सांजेला पणती दिगंताच्या पायात,
विवेकाचा गर्भ उमलू दे उगवतीच्या उदरात !

- समीर गायकवाड

शाळा



शाळेतल्या वाटेने जाताना पाने फुले वाकुल्या दाखवत हसत.
लालपिवळी फुलपाखरं वर्गापर्यंत येऊन हिरमुसून परत जात. 
पोपडे उडालेल्या भिंतीवरचे रंगीबेरंगी तक्ते फेर धरून नाचत.
वढ्यावरची लाडी गाय आणि तिची वढाळ वासरं डोळ्यापुढे येत. 
शिकवताना मास्तर खडू फेकून मारत, मध्येच मोठ्ठे डोळे वटारत.
देवळातला इटोबा हटकून येई रांगत, त्येचं ध्यान दिसे मास्तरात. 
गाभूळलेल्या चिंचा, पाड लागलेल्या कैरया दप्तरातून डोकावत.
तडे गेलेल्या धुरकट फळ्यावं मास्तर पांढरी अक्षरं मस्त गिरवत.
अक्षरं काई कळत नसत, सारं चित वस्तीतल्या गोजिरया घरात.
खिडकीतून वारा उनाड येई आत संगट गवतकाडयांची वरात.
चिपाडातली चिलटं केसात, उसातल्या दसकटाची लगोर रुते उरात.
उललेल्या अंगावरची धुळीची पुटं, चिल्हारीतली फोलफाटं गणवेशात. 
गुऱ्हाळाची कायली, ढेलजेतली पितळ पायली ऱ्हाऊनि दिसं पानात.
मोत्याची कणसं, वाफ्यातलं माळवं दरवळे वर्गातल्या पोरा पोरात.
शाळंतली पोरं पुस्तकं घेऊन त्यातली पानं ना पानं तोंडपाठ करत.
माझ्या जुनेर पुस्तकातल्या पानातसुदिक भिरभिरे शिवार शेत.
म्हसरं, पाखरं, हिरीतलं पारवं, बारवं, उन्हाचं शिरवं पसरे काळजात.
शाळंतल्या दिसात शेत येई डोक्यात आता रोज शाळा येते सपनात !

- समीर गायकवाड.

साल ..




सालटी सोललेली झाडांची ब्रॉयलर कोंबडी
आम्ही न शिजवता आवाज न करता चावून खातो
आमचे चिंचोळे रस्ते सरळ रेषेत रुंद हस्तिदंती करताना
वाटेत येणारया भणंग झाडांच्या फांद्या कापून त्यांचे तळपट करतो
बांधावरची झाडे वाटणीतला डावा हिस्सा म्हणून धारदार आरीवर लावून धरतो
बापजाद्यांनी लावलेल्या सर्वच उभ्या आडव्या वाकड्या झाडांचे आम्ही जळण करतो
झाडांची एक दिवस पूजा करतो,गंध फासतो न दिवसाढवळ्या त्याला चुलवणात टाकतो
वातानुकुलीत खोलीत बाटलीबंद पाणी पित कोट्यावधी झाडांची लागवड मोहीम पुकारतो
बोन्सायची औलाद आम्ही, रोपवाटिकेतली कोवळी रोपटीसुद्धा पाण्या वाचून सुकवतो
इतके नीच आम्ही की अंगणातले जुनाट बहरलेले घरट्यानी लगडलेले खरबरीत
सालींचे झाड निर्विकारपणे कापून त्याच्या बुन्ध्याचे शोपीस करून ठेवतो
अंगणातल्या जुनाट झाडांचे काय घेऊन बसलात ? त्याही पुढे जाऊन
आम्ही गर्भातल्या कोवळ्या कळ्यासुद्धा सफाईने अलगद खुडतो
इतके सारे सताड डोळ्यांनी बघतो, बधीर कानांनी ऐकतो
निलट साळसुदागत आभाळाकडे तोंड करून बघतो
त्यालाच विचारतो की पाऊस असा बेभरवशाचा
का झाला आहे ? पडत का नाही वेळेवर ?
भरल्यापोटी चर्चा करताना नतद्रष्ट पावसानेच आमची वाट लावली असं म्हणतो !!!  

- समीर गायकवाड.    

भेट



मान्सूनचा निरोप घेताना पाऊस कासावीस होतो, तिच्या बंद दारासमोर रस्ता हरवल्यागत रेंगाळतो.

अंगणातल्या निष्पर्ण वेलींची आर्त गळाभेट घेतो, दारासमोर वाढलेल्या गवतात हलकेच घरंगळतो.

दारावरल्या कुलुपाच्या छिद्रातून डोकावून पाहतो, खिडकीच्या फटीतून जमेल तितके अंग घुसळतो.

परसदारापाशी जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसतो, सांज होताच अखेर गर्दमेघांचे अश्व उधळतो.

कुंद ढगात तरमळणाऱ्या माझ्या आत्म्यास मिठी मारतो, भेट यंदाही झाली नाही म्हणून अश्रू ढाळतो !!

- समीर गायकवाड.

पाऊसवेडा चंद्रचकोर ....


छत्तीस तासांपासून पाऊस पडतोय पण झाडांच्या बुंध्यालगत मातीचा थर अजूनी कोरडाच आहे,
त्रिकोणात थवे करून उडणारया पक्षांचे पंख कोरडे आहेत,
गोजिऱ्या फुलांच्या पाकळ्या किंचितच ओल्या आहेत,
झाडांच्या पानांवरून क्वचित एखादा थेंब ओघळतोय,
पर्जन्यवेडया गवताच्या पात्यांची पेंग अजून सरली नाहीये,
बाभळीच्या घरट्यातील काड्यावर नवाडा पाहुणा डोळे झाकल्या पडुन आहे,
झाडाच्या ढोलीतले तांबट-सुतारांचे जग अजुनी उदास आहे,
खोल गेलेल्या विहिरीच्या तळाशी गाळाचेच अजुन साम्राज्य आहे,
कपारीतल्या पारव्यांचे गहिरे निश्वास तसेच आहेत,
गोठ्यातल्या गाईंच्या डोळ्यात शुष्क पाचोळ्याचे तेच प्रतिबिंब थिजून आहे,
वंगणओल्या चाकांनाही चिखलाचा नुसताच अजुनी ध्यास आहे,
तिफणीतले चुकार बियाणे मातीच्या गर्भस्वप्नात नुसतेच दंग आहे,
नभात डोकावणारया देवळाच्या टोकदार कळसाची पर्जन्याभिषेकाची आस
अजुनी टिकून आहे,
मेघांत गवसणी घातलेले मस्जिदीचे आत्ममग्न मिनार कोरडेच उभे आहेत,
मातीच्या कुशीतले अर्धोन्मिलित अंकुर म्लानमाना टाकूनही सचेत आहेत,
चंद्रमौळी घराचे छत मेघास कडाडून भेटण्या अजूनही उत्सुक आहे,
'भिंतीतली ओल, गेली कुठे रुसून' म्हणत आढयातले वासे सुकून गेले आहेत,
मंजुळा हरवलेली तुळस मेघश्यामाच्या आणाभाकात मश्गुल अजून आहे,
दारापुढचा गंधवेडा पारिजातक नक्षत्रांच्या मृगजळाशी आस लावून आहे,
परसातली जाईजुई वाऱ्याच्या सांगाव्यावर पावसाचे स्वप्नझुले झुलवत आहे,
उन्हात वाहिलेल्या माथ्यावरच्या चिवट हंडयांची माळ्यावर बोळवण व्हायची अजुनी बाकी आहे,
पुठ्ठा मोडून पडलेल्या वहीतल्या पानांच्या कागदी 'होडया' कपाटातल्या ड्रॉवरमध्ये पडून आहेत,
हिरमुसला झालेला रेनकोट अजूनही दाराआडच्या हुकात लटकतो आहे,
तिथेच खाली अंगाच्या काडया मुडपून छत्रीची मुठ अबोल झालीय,
पर्जन्योत्सुक चराचराच्या मनातले मेघमल्हार अजूनही भारित आहेत.
देहातल्या मातीच्या आभाळवेणा अजूनही सुरूच आहेत अन
पाऊस हा असा हलकाच येऊन स्पर्शुनी जातोय
हितगुज मातीशी करुनी जातोय,
जणू शस्त्रे टाकून बसलेल्या पार्थास माधव जीवनसार ऐकवितोय !

सारे सारासार जाणूनही मी अजून कोरडाच आहे
म्हणूनच की काय,
'मातीच्या कानात पाऊसथेंबानी सांगितलंय तरी काय ?'
हे उमगायला आणखी बराच काळ लागेल !
एकूणच काय,
माती आणि आभाळ यांचा काहीतरी तहनामा झालाय
अन मधल्या मध्ये माझ्या जीवाचा पाऊसवेडा चंद्रचकोर झालाय...

- समीर गायकवाड.

( सर्वत्र संततधार पाऊस पडतोय असं वाचनात येतंय ..इतरत्र काय होतंय नेमकं कळायला मार्ग नाहीये, आमच्या इथेही परवाच्या सांजेपासून पाऊस पडतोय......मात्र एखादा ज्ञानी महात्मा संताच्या अभंगांचे हळुवारपणे, संथ गतीने, शांतगंभीर स्वरात, सखोल जाणीवांसह विश्लेषण करत भावविभोर वर्णन करतो तशी या पावसाची शैली आहे...)

सूर्यास्त



अस्ताला जाणारा सूर्य सोनेरी शिखरांवरून अलगद कलतो
घुमटांतून उत्तुंग क्षितिजात उतरतो. 
पश्चिमेच्या लाल नभांत विरतो
तुळशीच्या शीतल दिव्यात अन् देव्हाऱ्यातील निरंजनात तेवतो.  
पक्षांच्या घरटयात शिणलेली पाठ टेकतो
झाडांच्या ढोलीत बिछाना अंथरतो
प्रेयसीच्या दुखऱ्या पापण्यात ओला होतो
भकाकत्या चुलीच्या अर्धविझल्या निखाऱ्यांना फुलवतो.

हमरस्त्यांवर अंधार शिंपडून 
शेत शिवारातील गवतफुलांवर
पिकपाण्यावर जीव टाकून पुढे जातो. 
निशिगंधाच्या मादक फुलांना जागं करतो
गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात झिरपून कासेत पाझरतो 
निळ्याकाळ्या मेघांतून परतणाऱ्या पक्षांच्या डौलदार पंखांवर विसावतो!
वेशीवरच्या पारंब्यात झुलतो, तळ्याकाठच्या गारव्यात रमतो.              

अस्ताला जाणारा सूर्यच
परसदाराशी रुसून बसलेल्या जाईच्या वेलीत घुटमळतो 
खोल गेलेल्या विमनस्क आडाच्या आर्त तळाशी हळूच डोकावून पाहतो
समुद्राच्या लाटांवर लोळून पाण्याच्या तळाशी झेपावतो. 
हरलेल्या मद्यपीच्या वेदनांच्या प्याल्यात तरंगतो
कष्टकऱ्यांच्या भेगाळलेल्या टाचांत रेंगाळतो
फाटक्याच झोपडीतला तलम अंधार गडद करतो
गाबडलेल्या वस्त्यातली विकारांची पाती धारदार करतो
वेश्यांच्या भडक मेकअपमधल्या भयाण आम्लास संपृक्ततो.
जुगाऱ्यांच्या डोळ्यात चमक भरतो,
अंधाराची प्रतिक्षा करणाऱ्या तमाम हिंस्त्र श्वापदांच्या इच्छावासना जागृत करतो!

अस्ताला जाणारा सूर्यच विदीर्ण हृदयांत संध्याछायेची भीती घालतो 
आणि अंधार जन्माला घालतानाच ध्यासमग्न प्रकाशाची बीजे रोवतो.... 

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...