शाळेतल्या वाटेने जाताना पाने फुले वाकुल्या दाखवत हसत.
लालपिवळी फुलपाखरं वर्गापर्यंत येऊन हिरमुसून परत जात.
पोपडे उडालेल्या भिंतीवरचे रंगीबेरंगी तक्ते फेर धरून नाचत.
वढ्यावरची लाडी गाय आणि तिची वढाळ वासरं डोळ्यापुढे येत.
शिकवताना मास्तर खडू फेकून मारत, मध्येच मोठ्ठे डोळे वटारत.
देवळातला इटोबा हटकून येई रांगत, त्येचं ध्यान दिसे मास्तरात.
गाभूळलेल्या चिंचा, पाड लागलेल्या कैरया दप्तरातून डोकावत.
तडे गेलेल्या धुरकट फळ्यावं मास्तर पांढरी अक्षरं मस्त गिरवत.
अक्षरं काई कळत नसत, सारं चित वस्तीतल्या गोजिरया घरात.
खिडकीतून वारा उनाड येई आत संगट गवतकाडयांची वरात.
चिपाडातली चिलटं केसात, उसातल्या दसकटाची लगोर रुते उरात.
उललेल्या अंगावरची धुळीची पुटं, चिल्हारीतली फोलफाटं गणवेशात.
गुऱ्हाळाची कायली, ढेलजेतली पितळ पायली ऱ्हाऊनि दिसं पानात.
मोत्याची कणसं, वाफ्यातलं माळवं दरवळे वर्गातल्या पोरा पोरात.
शाळंतली पोरं पुस्तकं घेऊन त्यातली पानं ना पानं तोंडपाठ करत.
माझ्या जुनेर पुस्तकातल्या पानातसुदिक भिरभिरे शिवार शेत.
म्हसरं, पाखरं, हिरीतलं पारवं, बारवं, उन्हाचं शिरवं पसरे काळजात.
शाळंतल्या दिसात शेत येई डोक्यात आता रोज शाळा येते सपनात !
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment