Wednesday, 8 May 2019

आई



भेटताच परिचयाची माणसे कुठेही, म्हणायची मला की, 'बदललोय मी खूप' !
मात्र 'माझा बापू आहे तसाच आहे' असं म्हणत कुरवाळणारी ती आईच होती.
गुजगोष्टीत सांगितलं काहींनी की, 'विशालकाय वृक्ष जणू झालोय आता मी',
मात्र पानाफुलातही माझ्या, बीज आपलं दृष्टीस पडलं जिच्या ती आईच होती.
उज्वल ध्येयापर्यंतचा प्रवास माझा सोनेरी, नजरेत सर्वांच्या आता तरळतो आहे,
मात्र रुतलेले काटे कुटे पायातले माझ्या, दिसले जिला ती फक्त आईच होती.



नावलौकिक माझा अनेकांना दिसला, छोटामोठा रुबाबही जाणवला काहींना,
मात्र पायातल्या भेगा माझ्या अन घट्टे हाताचे, दिसले जिला ती आईच होती.
जीवनवाटांवरती पाय अनेकदा डगमगले, चुकला मार्गही ; चुकवणारेही भेटले,
सहारा जिने दिला, वाती डोळ्यांच्या पेटवूनि मार्गही दाखवला ती आईच होती.

बालपणी कधी जेंव्हा पडलो आजारी, वा जीवनी धरले कधी जेंव्हा अंथरूण
न साह्वून दुःख, मांडीवर ठेवूनी माथा केली जिने जाग्रणे, ती आईच होती.
डोळे मिटुनी पडलो होतो मी, अन म्लान चेहऱ्याने ती पाहत माझ्याकडे होती,
कन्हण्याने माझ्या, टोचल्या सुया काळजात अल्वार जिच्या ती आईच होती.

चांगला होता काळ माझा जेंव्हा, सगळेच अंगणात माझ्या दाटले होते तेंव्हा,
वाईट काळातही मात्र होती जी माझ्यासवे, ठामपणे उभी ती फक्त आईच होती.
तारुण्य असो की शैशव, तणाव असो कामाचा की थकवा असो बागडण्याचा,
शिरताच कुशीत जिच्या अलगद, विझायचा शीण जीवाचा ती आईच होती.
जगी आजवरी मागितली सर्वांनी करुणा प्रभूची, कृपादृष्टी होण्या स्वतःवरी,
मात्र केली जिने तपस्या पोटच्या गोळ्यासाठी, ती फक्त आणि फक्त आईच होती.....

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...