पहिल्या पावसात उगवलेल्या तेजतर्रार
अंकुराने
शेजारच्या लवलवत्या रोपटयास विचारले,
"माझे आयुष्य किती
?"
पानातल्या पानात हसत रोपटे उत्तरले,
"गवताच्या पात्याकडे
बघ, कितीही दबले तरी ते उन्मळत नाही,
वठलेल्या वडाकडे बघ, बुंधा सुकला तरी तो जळत नाही,
बांधाच्या कडंला असलेल्या शेवाळाकडे बघ, ते कधीच
मरत नाही.
दिलखुलास जग, माणसाने खुडण्याआधी इथे कुणी मरत
नाही."
भेदरलेल्या अंकुराने पुन्हा सवाल केला,
"मग माणसाचे आयुष्य
किती ?"
फुलांच्या गुच्छांना जोजवत
रोपटे शांतपणे उत्तरले,
"जेंव्हा आपण कुणीच इथे नसू, तेंव्हा त्याच्या
जगण्याला अर्थच नसेल !"
उत्तर ऐकताच अंकुराची हिरवीपिवळी कोवळी पाने स्वतःवर बेहद्द खूष झाली...
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment