Wednesday 8 May 2019

बदल ....


थकलेले, कंबरेत वाकलेले सरते वर्ष
मोठ्या उमेदीने उमलत्या नववर्षाला बोटाला धरून पुढे आणते..
सरत्या वर्षाची जेंव्हा सुरुवात झाली होती तेंव्हा त्यालाही असेच बोटाला धरून मागच्या वर्षाने प्रकाशवाटा दाखवल्या होत्या.
तो जल्लोष, ते भव्य स्वागत
आठवतना सरत्या वर्षाचे डोळे पाणावून जातात.
ओलेत्या डोळ्यांनी,
जड पावलांनी मागे वळून पाहत सरते वर्ष अंतिमपर्वात येतं.


हळूहळू नजरेआड होत धूसर होत
भूतकाळाच्या अंधारयात्रेत विलीन होते..
जो तो उगवत्याचे कौतुक करतो,
आनंद व्यक्त करतो,
त्याच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघडया अंथरतो !
सरत्याचे काय होत असेल ?
तो भूतकाळाच्या कुपीत बंदिस्त होतो,

त्याच्याविषयीच्या सर्वांच्या जाणिवा असमान होत जातात...
कुणी त्याला कोसतो,
कुणी त्याला दोष देतो तर कुणी त्यावर नाखूष असतो. क्वचित एखादाच त्याच्यावर फिदा असतो.
जुने जाऊद्या मरणालागुनि असे म्हणत गेलेल्याच्या जखमांवर मीठ चोळतो.

दुःखाच्या हातात हात गुंफुनी सुख येऊ शकत नाही,
गतकाळाला मागे टाकल्याशिवाय
वर्तमानास पुढे येता येत नाही.
मागे पुढे होताना हे दोघे
एकमेकाशी बोलत असतील का ?
सरत्या वर्षाचे अनुभव नव्या वर्षाला वारसा रूपाने मिळत असतील का ?
दोघे गळ्यात गळा घालून निरोप देत असतील का ?
का माणसासारखं तुसडं वागत असतील ?
तुझं माझं करत असतील का ?
काहीही होवो पण एक घटिका अशी येतच असणार जेंव्हा हे दोघे निमिषार्धासाठी एकत्र असतील,
तेंव्हा काय बोलत असतील हे दोघे जण ?

मला वाटते,
सरते वर्ष नव्या वर्षाला सावध करत असेल,
मनुष्य नावाच्या स्वार्थी प्राण्यापासून जपून राहण्याचा सल्ला देत असेल.
नैसर्गिक आपत्तींची चाहूल देण्याविषयी विनवत असेल.
महापुरुषाच्या मृत्यूचा
अन विध्वंसकारी युद्धाचा डाग भाळी लावून घेऊ नको म्हणून सूचित करत असेल..
जमेल तितके सत्कार्य करण्यासाठी खुशामत करत असेल !

अंधाराच्या गर्भातून प्रसवणारया नववर्षाच्या वेणा नियतीला ठाऊक असतात.
कॅलेंडरची पाने पालटून
आणि ग्रहदशा अभ्यासून माणूस त्या जाणू पाहतो, गवसलेल्या अर्ध्यामुर्ध्या अर्थाने हुरळून जातो.
विस्तीर्ण आकाशगंगेच्या खिजगणतीतही नसणारा हा जीव तरीही आपल्या बुद्धीच्या आधारे काळाला गवसणी घालू पाहतो !
झालं गेलं विसरून नव्या वर्षाच्या शुभेच्छा दरसाली देत राहतो,
सनावळीतील बदलानंतर येणारा काळ सुख समाधानाचा असेल या कल्पनेने मोहरून जातो ...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...