Wednesday, 8 May 2019

ऋण..


तू कुठेही असलास तरी

तुझ्या शिंगांच्या आकाशात

सूर्य डोलायाचा

तुझ्या डोळ्याच्या ओलाव्यात

मायेचा अबोल पारा पाझरायचा  !


तू चालत निघालास

की सगळं शिवार सावध व्हायचं

पाने फुले झाडे पक्षी मुग्ध व्हायचे

साद गळ्यातल्या घुंगरांचा

त्यांच्या पंचप्राणात घुमायचा !


तू बसून जरी राहिलास

तरी अवती भवती

रानवारा घुमत राहायचा

तुझ्या पायाखालची माती

राकट खुरांना कवेत घ्यायची !


तू डोळे मिटून राहिला

तरी महादेव तुझ्या ठायी

चित्त चुकवून लपून राहायचा

तुझ्या पाठीवरचा भार

आपल्या खांद्यावर घ्यायचा !


तू कामास जुंपलेला असता

मानेवरचे जूं भरून येई

तरळत अश्रू त्यातही

चाबूक तुझ्या अंगावर ओढताच  

वळ माझ्या कातडीवर कधी नुठायचा  !


तुझ्या कष्टातून आम्ही खातो घास

बदल्यात त्याच्या तुला कष्टाचा श्वास

तुझ्या मेहनतीचे कसे फिटतील पांग

दाखव मार्ग तुझ्या ऋणातून उतराई व्हायचा

 
- समीर गायकवाड 

 

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...