Tuesday 26 March 2019

घरंगळलं आभाळ


घरंगळलं आभाळं तुझ्या कोयरी डोळ्यांत
मनं खिल्लारं धावून गेलं चौखूर दिशांत
गोंदण दंडाचं दिसतां उडती कारंजी काळजात
हसली पाखरं खुदकन जुंधळ्याच्या ऐन्यात
हळदल्या पावलांनी माती जाई हरखून
भर उन्हातलं लागिरं पारंब्याच्या सावल्यात
रान झपाटलं तुझ्या चंदनगंधी देहात
गाभुळलं उन्हं तलम कायेला शिवून
उधाणल्या अंगातला घुमं पारवा जोरात
गेली लाजून झाडं वेली गेल्या झिम्माडून
गाणं प्रेमाचं गातंया उभं शिवारं नाचत...

आठवणींच्या पाकळ्या

कालच ती भेटली.
तेंव्हा तिला सांगितलं,
तुझ्या बंदिस्त घराभोवती चौदिशेने कुंपण बांधताना
किमान त्यास तरी एक दरवाजा ठेव
एखाद्या दिवशी तुला
जगाची गरज नक्कीच भासेल.....

माझ्या मात्र दशदिशांनाही कुठेच दरवाजे नाहीत
की खिडक्या नाहीत.
जीव गुदमरवणारी सर्वव्यापी रेंगाळणारी निर्वात पोकळी फक्त आहे.
माझ्यासाठी कुणी दारं उघडी ठेवली असती
तर मी इथे असलो नसतो.

कबरीवरून काल माझ्या ती हळुवार हात फिरवून गेली तेंव्हा
तिच्या मिटलेल्या डोळ्यात अश्रू होते
काही हुंदके आणि कढ ठेवून ती गेली.
आता माझ्या भवताली आठवणींच्या सदाबहार पाकळ्या भिरभिरताहेत....

- समीर गायकवाड

Saturday 23 March 2019

जाताना सांगून तो गेला होता...


जाताना सांगून तो गेला होता, "आता लवकरच मी परतेन घरी
वचन तुला दिलेलं अधूरं राहिलं तरी भारतमातेचं वचन मात्र पुरं करेन" 

वचन मला दिलेलंही त्याने पुरं केलंय, तो खरेच लवकर घरी आलाय
पूर्वी गणवेशात घरी यायचा, यावेळी तिरंग्यात लपेटून आलाय.

त्याचं मुखकमल पाहून हरखलेली माय म्हणतेय, हिरा माझा कसा निजलाय
त्याला छातीशी आपल्या गच्च धरून वृद्ध पित्याने मात्र हंबरडाच फोडलाय 

जिचा तो सौभाग्य अलंकार होता तिचा साजशृंगार कधीच गळून पडलाय
तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा हा एकच ध्रुवतारा होता जो निखळलाय

कसे सांगू मी तुम्हाला, "की सरहद्दीहून कुणाची माती आली आहे ?
हा अन्य कुणी नाही, हा तर माझ्या काळजाचा तुकडा, हा मोठा बंधू आहे ! "...

हा तुकडा काळजाचा असा अवचित कसा गळून झडलाय

सहवेदनेसाठी जमलेला भावूक जत्था अल्पजीवी आहे, उद्याचा सवाल पडलाय..     

Tuesday 5 March 2019

मैत्र


धगधगत्या निखारयावरून चालताना स्वतःला जाळून
दुसरयासाठी त्या विस्तवाचं चांदणं करतात,
आपल्या स्वप्नांची राखरांगोळी करून दुसरयांची सुखे सजवतात,
आपली अडचण लपवून सदैव मदतीचा हात पुढे करतात,
आपल्या वाट्याचं आभाळ दुसरयाच्या अंगणात रितं करतात,
ते मित्र असतात.....

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...