Showing posts with label गूढ. Show all posts
Showing posts with label गूढ. Show all posts

Thursday, 15 September 2022

डोळ्यातलं आभाळ

आठवणींच्या मेघांचा रस्ता नेहमीच हरवलेला असतो
ते येतात असेच अनाहूत 
आणि दाटून येतं आभाळ अचानक.
कालची प्रखर उन्हेच बरी होती असं मग वाटू लागतं
घरांना खिडकी नसली तरी चालते. 
मनातल्या खिडकीत 
एकसंध बसता यायला हवं.
बाहेर हात बांधून उभं असलेलं गच्च साचलेलं आभाळ 
मग आपल्या डोळ्यात रितं करता येतं..
आपलं रितेपण दूर होण्याचा याहून चांगला मार्ग नाही!

Monday, 22 March 2021

हे रस्ते संपू नयेत..

काही वेळात सूर्यास्त होईल
घराकडे निघणारी पावले आता पहिल्यासारखी असोशीने पडत नाहीत
ती रेंगाळतात रस्त्यावरच्या रोषणाईत, स्ट्रीटलाईटच्या गर्द फिकट उजेडात
सकाळी दुपारी सावल्या देणारी झाडं फांद्या वाकवून उभी असतात सांजेस
ती वाट पाहतात उरल्या सुरल्या पक्षांची
जी अजूनही शहरातल्या झाडांवर जीव लावून आहेत
त्यांचा परतीचा किलबिलाट ऐकून झाडे रस्ते तृप्त होत असतील
कदाचित संधीकाळास देखील त्याची लत लागली असावी
पण आमचं काय ?
घरातून निघणं आणि घरी परतणं
ही क्रिया इतकी निर्जीव कशी झाली याचे उत्तर शोधतोय
बऱ्याचदा सांजेस शहरातल्या रस्त्यांवरचा कोलाहल खूप आधार देऊन जातो
एकटं असल्याची जाणीव करकचून मोडून काढतो
कधी कधी वाटतं
ही संध्याकाळ, हा गोंगाट संपू नये, हे रस्ते संपू नयेत
नेमकी ही कशाची ओढ आहे कोडं काही सुटत नाही..

- समीर गायकवाड 

Wednesday, 8 May 2019

कोमा



तू गेलीस अन
चंद्रभेसूर अंधार दुःखवेडया डोहाच्या
ओंजळीत हमसून हमसून रडला.
उध्वस्त घरट्यातील दिशाहीन पक्षी
रात्रभारित पश्चिमेच्या आभाळ निळाईत विरले.
घुबडघुमटी देवळाच्या शुष्क दीपमाळा
मेघांच्या धुव्वाधार मिठीत हळुवार निमाल्या.
अजान पुकारताना मस्जिदीचे गोलघुमट
अंतराळाला सवाल करून मोकळे झाले.
फुलांच्या गंधरुसव्या कळ्यांनी
देठाशीच कोंडून घेतले.
भिंतीवरच्या घडयाळातल्या टोकदार लंबकाने
अखेरचे उष्म आचके दिले.
देव्हाऱ्यातल्या समईने हलकेच फुलवातींना
मागे ओढून पोटात पाय दुमडले.
गुलमोहरी वळणवाटेवरच्या जुन्या शिळांना
दाटून गच्च उमाळे आले.
अंगणातले प्रकाशाचे प्रतिबिंब रात्रीत
गुंतताना निशाचराच्या रक्ताक्षात विलीन झाले.
माळावरच्या सावल्यांनी प्राक्तनवृक्षाचे मलिन
खोड कापताना मुळ्यांच्या अंताशी तुझा शोध सुरु केला.....

पण तू परत आली नाहीस...
त्या दिवसापासून उफाणलेल्या वाऱ्याने त्याचे घर वर्ज्य केले,
जाईच्या पाकळ्यांनी भ्रमरांशी अबोला धरला,
समग्र सांजा शिशिरातुर पानगळीत रत झाल्या,
प्रकाशगोलाच्या ओढीने ग्रासलेल्या त्याच्या देहाच्या
वेदीवरती क्षितिजाच्या यमसल्लेखनेच्या वेणा सुरु झाल्या !
अन,
पानातल्या स्वरबंदिस्त वेणूनादाने गदगदलेल्या झाडात हलकेच गोंदवून घेतले.\    
जेंव्हा कधीही अवचित येतो स्वरगंधित पानांचा सळसळणारा आवाज
तो ओळखतो की
आता तुझ्या परतण्याचा भास होणार आहे.
त्याच्या थिजलेल्या प्रतिक्षारत डोळ्याच्या बाहुलीत हलकेच तुझे प्रतिबिंब तरळते,
त्याच्या डोळ्यांची जोरदार हालचाल होते.........  


इस्पितळातल्या आयसीयुत तो पडून आहे दोन दशकापासून
डोळ्यावर टॉर्चचा झोत टाकताच होते त्याच्या बुब्बुळांची हालचाल
डॉक्टर म्हणतात, "स्टील होप्स आहेत, ही रिस्पॉन्डस,
त्याच्या डोळ्यात लाईफसाईन आहे, हि मे रिकव्हर फ्रॉम कोमा !"
खरे तर तेंव्हा त्याच्या डोळ्यात तू तरळून गेलेली असतेस अन
त्याच्या कानात स्वरबंदिस्त पानांचा अल्वार वेणूनाद होऊन गेलेला असतो.

- समीर गायकवाड.

द्वैत



आंब्याचा मोहोर देहात, केवड्याचा कहर केसात
लाली विडयाची ओठात, लेवून गंधवस्त्रे अंगात
मोगरी बेटांच्या जोशात, तू येतेस धुंद स्वप्नात !

इश्काच्या गर्द वनात, घेतेस नाग विळख्यात
नशेचे जहर डोळ्यात, दव घर्मबिंदूंचे गजऱ्यात
वीज ओलेत्या केसांत, घाव खोल काळजात !

मरवूनी कैफ कायेत, नेतेस देहाच्या चैत्रबनात
येई लालिमा मृदूगालात, झंकारते वीणा कानात
लीन होतेस वेणूनादात, एक आत्मा दोन देहात !

येती रोमांच अंगात, खणके मृदंग चराचरात
बुडताच तुझ्या डोहात, खोल विकाराच्या अंतात
स्वप्न उतरे सत्यात, द्वैत नुरते मिलनात !

- समीर गायकवाड.

सूर्यास्त



अस्ताला जाणारा सूर्य सोनेरी शिखरांवरून अलगद कलतो
घुमटांतून उत्तुंग क्षितिजात उतरतो. 
पश्चिमेच्या लाल नभांत विरतो
तुळशीच्या शीतल दिव्यात अन् देव्हाऱ्यातील निरंजनात तेवतो.  
पक्षांच्या घरटयात शिणलेली पाठ टेकतो
झाडांच्या ढोलीत बिछाना अंथरतो
प्रेयसीच्या दुखऱ्या पापण्यात ओला होतो
भकाकत्या चुलीच्या अर्धविझल्या निखाऱ्यांना फुलवतो.

हमरस्त्यांवर अंधार शिंपडून 
शेत शिवारातील गवतफुलांवर
पिकपाण्यावर जीव टाकून पुढे जातो. 
निशिगंधाच्या मादक फुलांना जागं करतो
गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात झिरपून कासेत पाझरतो 
निळ्याकाळ्या मेघांतून परतणाऱ्या पक्षांच्या डौलदार पंखांवर विसावतो!
वेशीवरच्या पारंब्यात झुलतो, तळ्याकाठच्या गारव्यात रमतो.              

अस्ताला जाणारा सूर्यच
परसदाराशी रुसून बसलेल्या जाईच्या वेलीत घुटमळतो 
खोल गेलेल्या विमनस्क आडाच्या आर्त तळाशी हळूच डोकावून पाहतो
समुद्राच्या लाटांवर लोळून पाण्याच्या तळाशी झेपावतो. 
हरलेल्या मद्यपीच्या वेदनांच्या प्याल्यात तरंगतो
कष्टकऱ्यांच्या भेगाळलेल्या टाचांत रेंगाळतो
फाटक्याच झोपडीतला तलम अंधार गडद करतो
गाबडलेल्या वस्त्यातली विकारांची पाती धारदार करतो
वेश्यांच्या भडक मेकअपमधल्या भयाण आम्लास संपृक्ततो.
जुगाऱ्यांच्या डोळ्यात चमक भरतो,
अंधाराची प्रतिक्षा करणाऱ्या तमाम हिंस्त्र श्वापदांच्या इच्छावासना जागृत करतो!

अस्ताला जाणारा सूर्यच विदीर्ण हृदयांत संध्याछायेची भीती घालतो 
आणि अंधार जन्माला घालतानाच ध्यासमग्न प्रकाशाची बीजे रोवतो.... 

चांदणचकवा


धुरकटलेला चंद्रगोल काजळडोहाच्या थिजलेल्या प्रतलावर विसावतो
तेंव्हा हलकेच तू येतेस,
आसमंतातील चैतन्याला चांदणचकवा देऊन,
गंधभारित निर्माल्य ओंजळीत घेऊन !
भेगाळलेल्या पावलांचे ठसे न उमटवता चालत पुढे पुढे जातेस.
कातडी सोलून निघालेले डोहाकडे टक लावून बसलेले
भवतालचे जरठवृक्ष तेंव्हा डोळे मिटून घेतात.
म्लान रुधिरफुले, कुरतडलेली पांगळीपाने आणि
अर्धोन्मिलित मृदुकळ्या आ वासून बसतात.
घरट्यात लपलेली चिमणीपाखरे
तुझ्या चाहुलीने अर्धीकच्ची जागी होतात
अन पुन्हा चोची मिटतात.
डोहाकाठचे छिन्नचराचर तुला पाहून मूक आक्रंदन करत राहते
नि मग तू डोहाच्या काठाशी येतेस.

Wednesday, 24 April 2019

येरझार



सादळल्या जीवाचा गं, जड झाला भार 
भादव्याची काहिली जिवे घामाचे येरझार

थकल्या पायाला फुफुटयाचा आधार
बाभळीचा काटा कुठून शिरे आरपार ?

रांडाव आभाळाचा कसा नेभळा संसार 
विझल्या चुलीत जळे सारे घरदार

धगाटल्या वाऱ्याचा फणा शिवारभर
वसुंधरेच्या मस्तकी का पापाचा भार ?

पिसाळल्या उन्हाने गिळले जलशिवार 
देहाच्या चकव्यास श्वासाचीच घरघर

डोळ्यातल्या उष्म्याची भूल अश्रूंच्या पार 
उघडणार कधी तुझ्या दयेचे दार ?

चिपाडल्या झाडांच्या पाना लागे कातर
फुलांच्या गावी चालती कायेचे व्यापार

थिजल्या काळजाला वाटे पैलतीराचा भार
दयाघना सोसवेना आता; पुरे झाले येरझार.. 

कावळा



माळावरच्या ओसाड दुनियेत
फुलव्याकुळ पाखरं भकास भिरभिरतात,
तेव्हा पायाखालचं अस्ताव्यस्त
अरबट चरबट तणसुद्धा मखमली वाटतं

उभारता गुरांच्या कळपापाशी
डोक्यातलं जित्राबही कान टवकारतं
वठलेल्या झाडावरची साल
आपल्याच अंगावरून सोलून काढल्यासारखी वाटतं

मुक्त....


पत्ता माझा शोधण्यास हा गंधच तुला कामी येईल,
काळीज जळतानाचा दरवळ तुझ्या परिचयाचाच असेल !
काळोख कितीही झाला तरी दिशा तुला गवसतील
पावलो पावली मातीत शिंपडलेले रक्त माझेच असेल !
भिऊ नकोस कुण्या पावसाला अन वाऱ्या वादळाला
अंतःकरणी तुझ्या तेवणारा दिवा माझ्याच आत्म्याचा असेल
तू फक्त एक कर जेंव्हा खोल दरीच्या टोकापाशी येशील
एक शिळा ढकल, ती ज्यावर पडेल ती कबर माझीच असेल !
स्पर्श तुझा ज्या पत्थरास होईल त्याचे सुमन होईल
जाणीवांनी त्या पुष्पगंधाच्या मुक्त होणारा जीव माझाच असेल !! 

- समीर गायकवाड 

Tuesday, 26 March 2019

आठवणींच्या पाकळ्या

कालच ती भेटली.
तेंव्हा तिला सांगितलं,
तुझ्या बंदिस्त घराभोवती चौदिशेने कुंपण बांधताना
किमान त्यास तरी एक दरवाजा ठेव
एखाद्या दिवशी तुला
जगाची गरज नक्कीच भासेल.....

माझ्या मात्र दशदिशांनाही कुठेच दरवाजे नाहीत
की खिडक्या नाहीत.
जीव गुदमरवणारी सर्वव्यापी रेंगाळणारी निर्वात पोकळी फक्त आहे.
माझ्यासाठी कुणी दारं उघडी ठेवली असती
तर मी इथे असलो नसतो.

कबरीवरून काल माझ्या ती हळुवार हात फिरवून गेली तेंव्हा
तिच्या मिटलेल्या डोळ्यात अश्रू होते
काही हुंदके आणि कढ ठेवून ती गेली.
आता माझ्या भवताली आठवणींच्या सदाबहार पाकळ्या भिरभिरताहेत....

- समीर गायकवाड

Wednesday, 14 November 2018

दिक्कालाच्या सीमेवर


सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडाची पानं न पानं उपसून काढली
डेरेदार जुनाट झाड मुळासकट उपसून निघालं
फांद्यावरच्या घरट्यांसकट कोसळलं
रणरणत्या उन्हांच्या साक्षीत गहिवरलेल्या मातीने
गर्भातली काही मुळं घट्ट धरून ठेवली.

दिवस काही असेच शुष्क गेले
एक अवकाळी पाऊस काय झाला
मातीच्या गर्भातल्या कोमेजल्या मुळांनी
जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
आता लवकरच मातीच्या आभाळभर अस्मितेनं
एक अंकुर फुलून येईल.

अंधारलेल्या दिक्कालाच्या सीमेवर
तेव्हा मी उभा असेन औक्षणासाठी
डोळ्यांचे दिवे घेऊन!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

Friday, 31 August 2018

तू ....

अबोल्यातही एक अर्थ असतोनिशब्दतेतही एक हुंकार असतो,
नसलो जवळ री, स्पंदनात तुझ्या मी असतो....
प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते, अनुत्तरीत होण्यातही एक उत्तर असते,
नच उतरलो शब्दात तरी, काव्यात तुझ्या मी असतो .... 
दिसण्यातही एक आनंद असतो, दृष्टीचाही एक अथांग शोध असतो,
नसलो भोवताली तरी, डोळ्यांत तुझ्या मी असतो.
कपाळीच्या बटेतही एक माधुर्य असतं, ओठांतही एक आसक्ती असते,
नच स्पर्श केला तरी, देहगंधात तुझ्या मी असतो !
जवळीकीचाही एक कैफ असतो, कैफाचंही एक आत्ममग्न जिणं असतं,
नच सहवास लाभला तरी, परिघात तुझ्या मी असतो.

Monday, 8 January 2018

गंधवेणा

रात्र सरपटताच देहावरती खडबडीत गळून पडतो मोगऱ्याचा फणा

चंद्र रडतो कोनाडयात, छळतात उरलेल्या त्वचेवर सोलल्याच्या खुणा

कैक येतात, जातात ; छेडत राहतात विवस्त्र देहातली आर्त छंदवीणा

सकाळ दुष्ट होताच येतात मरणाची सुखस्वप्ने, भरवित बाजार जुना !

गंधभारित वेदनांचा जत्था मळक्या देहातला, कळवळतो पुन्हा पुन्हा...

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...