धुरकटलेला चंद्रगोल काजळडोहाच्या थिजलेल्या प्रतलावर विसावतो
तेंव्हा हलकेच तू येतेस,
आसमंतातील चैतन्याला चांदणचकवा देऊन,
गंधभारित निर्माल्य ओंजळीत घेऊन !
भेगाळलेल्या पावलांचे ठसे न उमटवता चालत पुढे पुढे जातेस.
कातडी सोलून निघालेले डोहाकडे टक लावून बसलेले
भवतालचे जरठवृक्ष तेंव्हा डोळे मिटून घेतात.
म्लान रुधिरफुले, कुरतडलेली पांगळीपाने आणि
अर्धोन्मिलित मृदुकळ्या आ वासून बसतात.
घरट्यात लपलेली चिमणीपाखरे
तुझ्या चाहुलीने अर्धीकच्ची जागी होतात
अन पुन्हा चोची मिटतात.
डोहाकाठचे छिन्नचराचर तुला पाहून मूक आक्रंदन करत राहते
बंदिस्त तरंगावरचा चंद्रगोल
तुझ्या स्पर्शासाठी आतुरलेला असतो,
सराईतपणे तो हात पुढे करतो !
त्याचे आवतन तुझ्या देहात झंकारते अन
तू डोहात अल्वार उतरतेस !
तुझ्या हालचालींचे कोमलतरंग थिजल्या प्रवाहास जागवू लागतात,
लखलखत्या सौदामिनीला साक्षीस ठेवून
पिसाळलेला डोह तुला खाली खेचू लागतो.
तुझ्या नाकातोंडात पाणी जाते,
सताड उघडे असलेले भकास डोळेही पाण्याआड जातात.
तू खोल खोल डोहाच्या तळाच्या दिशेने जात राहतेस,
खाली जाताना अनामिकासाठी हलवलेला
तुझ्या झिजलेल्या हाताचा तळवा
डोहावर काही क्षण भिरभिरताना दिसतो.
तुझा आरसपानी देह कर्दमून जातो,
मग अधाशी डोह पुन्हा सहजतेने साळसूद होतो.
त्या सरशी काजळडोहावर रेंगाळलेला खिन्न चंद्रगोल
तिथून उठून पुढे निघून जातो.
दर पुनवेला हे असेच चालू असते
कित्येक वर्षापासून त्याच गतीने !
तू अशीच येतेस काहीही न बोलता,
हातवारे देखील न करता...
अश्रूंची धार डोहातल्या पाण्यात विरघळवून
तू वैदेहीसारखी मातीच्या गाभ्याशी जाऊन सत्व शोधतेस.
‘तो’ तिथेच उभा असतो,
बर्फाळलेल्या डोळ्यांनी काळीज विस्फारून पाहत असतो.
जिवाभावाच्या माणसाला डोहात बुडवून मारल्याच्या बातम्यांची कात्रणे
हाती धरून उभा असतो.
‘त्याची’ यातून सुटका नाही.
वीसेक वर्षापूर्वीच चित्रगुप्ताने ‘त्याला’ सांगितलंय,
"जोवर ती या डोहात येत राहील तोवर
तुला तिन्ही लोकाची दारे बंद आहेत !,
तू असाच अधांतरी लटक,
तू केलेल्या विश्वासघाताची सजा मी देत नाही तुझेच कर्म देतेय !"
तेंव्हापासून या काजळडोहा जवळ
‘तो’ पायात खिळे ठोकल्यागत उभा आहे.
देहाची चिपाडे घेऊन,
डोळ्यांच्या खोल विहिरीत तिच्या भग्न प्रतिमा घेऊन उभा आहे !
खोल गेलेले पोट,
खचून गेलेली वाकलेली पाठ आणि
मेंदूतल्या आठवणींच्या जखमांनी व्यापलेले विशालकाय भेंडोळे
मस्तकी घेऊन ‘तो’ उभा आहे ....
कुजलेल्या हाताची शिसवीबोटे जोडून ‘तो’ उभा आहे
तिच्या माफीच्या प्रतिक्षेत !
तोवर तरी असेच अधांतरी राहावे लागेल त्याला ......
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment