आपण जेंव्हा एखाद्या कारणानिमित्त काही दिवसांसाठी घराबाहेर पडतो तेंव्हा घराचा उंबरठा ओलांडताना काय विचार मनात येतात ?
घराबाहेर पडणारे आपण एकटेच असलो तर कसे वाटते ?
शेवटी घर आणि घरातली माणसे यांच्याबद्दल नेमका काय विचार आपण करतो ?
घरातून जाताना ज्या भावना मनात असतात त्या कुठवर टिकतात ?
तुम्ही जेंव्हा घर मागे सोडून जाता तेंव्हा तुम्हालाही असेच वाटते का ?
घरघर लागणे आणि घर सोडून जाणे यांतले साम्य शोधायचे असेल तर वाचा
झिझलेला उंबरठा ओलांडून जाताना अंगणातली तुळशीची पाने
कृष्णाच्या बासरीवरची नाजूक पारिजातकाची चुरगळलेली फुले
पायाशी गुदगुल्या करणारी ओलसर चिमुटभर काळीभोर माती
रुमालात घेऊन बाहेर निघतो पण अख्ख जग सोबत घेतल्याचं
विलक्षण सुख मनात हिंदोळे घेत राहतं……
निघताना आई थरथरता मऊ हात डोक्यावरून फिरवते
तिच्या थकलेल्या डोळ्यात अश्रुंचा पारा चमकून जातो.
सुकलेले ओठ काहीतरी पुटपुटतात, आशीर्वाद देतात
पाठीवरून फिरणारा तिचा हातच सारं काही बोलून जातो.
काळजी घे म्हणून सांगते अन तीच डोळ्याला पदर लावते.
घरातून निघताना पावले जड होतात अन डोळे खारट.…
दारापर्यंत पत्नी येते, किंचित उतरल्या चेहरयाने
एक हाताने दाराशी चाळा करत दुसरा हात निरोपासाठी उंचावते,
डोळ्यात प्रश्नचिन्ह तसेच ठेवून ओठ हसरे ठेवते
तिच्या डोळ्यात गाभारयातले निरंजन दिसत राहते.
लवकर परतण्याची ओढ ही अशी घर सोडतानाच लागून राहते…
निघताना अवखळ वारा पायात निरोपाची रुंजी घालत राहतो
झाडांवरची पाखरे किलबिलाट करून त्यांचाही सांगावा देतात.
थोडे चालून झाल्यावर घराकडे मागे वळून बघत राहावे वाटते
प्रवास रद्द करून आईच्या कुशीत तोंड मिटून झोपी जायचे का ?
गायी बैलांच्या पाठीवर हात फिरवत वाघ्यापाशी बसायचे का ?
असे अवघड प्रश्न उगाच मनाची तारांबळ उडवून देतात.....
आस्ते कदम काही चालून झाल्यावर काळीपिवळी रिक्षा भेटते
सवयीने ती पुढे जाऊ लागते अन मन मात्र मागे जाऊ लागते
दरवेळेस बाहेर जाताना मनाचे हे असे पुढेमागे का होते हे काही उमगले नाही.
उगाच सोबतच्या पिशवीला घट्ट धरून राहिले की मग मात्र बरे वाटते
बघता बघता बस जवळ रिक्षा येऊन थांबते, यंत्रवत आत जाऊन बसले
की थोडा ताण हलका होतो अन प्रवासाचे पुढचे वेध लागतात…
वारा प्यायलेली बस पुढे जाताना तिचा कैफ और असतो
खिडकीजवळ बसून तिची झिंग प्रवास जाणवून देत असतो..
फाटक्या कपड्यांनी शेतात खेळणारी काळीसावळी मुले
त्यांच्यामागे हवेत उडणारे बगळ्यांचे शुभ्र त्रिकोणी थवे
वारयावर डोलणारी हिरवीगार झाडे अन त्यांच्या बहरलेल्या फांद्या
मनाला आधार देत राहतात, आप्तस्वकीयांचा विरह विसरवतात.....
रानारानातून काम करणारे शेतकरी आणि त्यांचे डौलदार बैल
बांधाबांधावर विसावा घेत बसलेले थकलेले कष्ठकरी जथ्थे
सावल्यांच्या झाडावर बिलोरी सुरपारंब्या खेळणारी पाखरे
पदराने घाम टिपत लख्ख तांब्यात पाणी देणारया स्त्रिया
या सर्वाना डोळ्यात साठवत कुठूनशी एक डुलकी हळूच येते....
आवाज कमी जास्त होत जातात, बस पुढे जात राहते
घराकडच्या आठवणी मध्येच फेर धरून नाचतात
पिशवीतल्या शिदोरीचा वास भुकेचे संदेश घेऊन येतो
त्यातले चार घास खाल्ले तरी मनाला तृप्तीची उभारी येते.
उन्हे कलतात आणि सावल्या मावळतीला येतात.....
रस्त्यारस्त्यावर डोळ्यात आभाळ माळलेल्या गंधवेड्या स्त्रिया
आणि त्यांच्या पुढ्यातल्या दुरडीतल्या रंगीबिरंगी वस्तूंच्या राशी,
डोळ्यात प्रतिक्षेचे दिगंत घेऊन उभे असलेले आशाळभूत पांथस्थ
पटापट मागेपुढे होत राहतात. नानाविध हाका न आरोळ्यांचे आवाज,
वाटेने येत जाणारे हळदीच्या शेतांचे, उसाच्या फडाचे, लिंबांच्या बागांचे
अन कडुलिंबांच्या झाडाचे वास झिम्मा खेळून जातात.
वाफाळत्या चॉकलेटी चहाची तलफ मध्येच पूर्ण होऊन जाते...
प्रवास संपतो आणि कामाचे वेध सुरु होतात
वेळ जात राहतो, तारखा पुढे सरकत राहतात
फावल्या वेळात घराकडे बोलणे देखील होत राहते
रात्री पाठ टेकवली मग मात्र उगाच कुंद मेघ जमा होतात
झिझलेला उंबरठा, अर्ध उघडे दार, आत्ममग्न पारिजातक
अन दाराकडे खिळलेले ओलसर डोळे तरळत राहतात.....
कुठेही गेलो तरी रुमालात बांधून आणलेले घर
मनाला घरपण देत राहते अन ओझे हलके होत राहते.....
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment