सांज ढळताना सैरभैर होऊनी भोवताली मला शोधू नकोस,
समईच्या वातीत हरपूनि देहभान जळणारा मीच असेन...
रात्र अंगणात उतरल्यावर दारामध्ये मला धुंडाळू नकोस,
खिडकीतून डोकावणा-या मंदप्रकाशात झिरपणारा मीच असेन.
चिंधुडक्या पुस्तकाच्या क्षतित पानात मला वेधू नकोस,
अक्षरांच्या वळणदार वेलांटीत वठलेल्या ठशात मीच असेन.
भिंतीवरल्या जुनाट तसबिरीत चित्र माझे निरखू नकोस,
ओलेत्या तुझ्या पापण्यात अल्वार पाझरणारा मीच असेन.
कूस बदलत निजताना आठवणींनी माझ्या रडू नकोस,
शेजारीच तुझ्या मध्यानराती निरखत पहुडलेला मीच असेन.
इथेतिथे वा अवतीभोवती जगी कुठेही मला शोधू नकोस,
दग्ध श्वासांच्या धाग्यात तुझ्या गुंफलेला रजःकण मीच असेन !!
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment