Wednesday, 8 May 2019

मायचा हिशोब



हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून,
सुकलेले आभाळ बघे चेहरा, तिच्या हंडयामधी वाकून
काटकुळ्या तिच्या पायाला पडती भेगा, रानोमाळ भटकून
माती पुसे तिच्या पायाला, कशाले जन्मलीस बाईल होऊन ?

हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून,
डोळा घेऊन पाणी माय म्हणे देवाला, काय गुन्हा झाला ?
जे मनुक्षाला तू असा, शाप तहानेचा घनघोर दिला.
खोल मातीत बुडाले पाणी, त्याचा जीव की घनव्याकुळला

हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून,
उठे झोपेत दचकून म्हणे, येईल कधी पाणी गळा भरून
माय सदानक्दा करे पाणी, बा टिपे डोळे तिच्याकडे बघून
हंडयातल्या तळाशी रडे पांडुरंग, डोळे मिटत हमसून हमसून !

हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून
मायला उन्हात चालताना बघून, बांध जाई आतच खचून
उनाड पाखरे पानाआड लपवत चेहरे, मायच्या डोळा बघून
तिच्या देहाच्या कानाकोपऱ्यात, घाम येई अल्गद गहिवरून


झाडे तोडतसे दुनिया, अन शिक्षा काहून माझ्या मायेला
उफराटा रे न्याय,
कसा फुटेना पाझर तुझ्या काळजाला
सांगून ठेवतो तुला, मायेचा शाप लागंल अख्ख्या जगाला
अंती हाडाकाडांच्या हिशोबी तिच्या, रडून काय उपयोग तुला !!

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...