Wednesday 8 May 2019

साल ..




सालटी सोललेली झाडांची ब्रॉयलर कोंबडी
आम्ही न शिजवता आवाज न करता चावून खातो
आमचे चिंचोळे रस्ते सरळ रेषेत रुंद हस्तिदंती करताना
वाटेत येणारया भणंग झाडांच्या फांद्या कापून त्यांचे तळपट करतो
बांधावरची झाडे वाटणीतला डावा हिस्सा म्हणून धारदार आरीवर लावून धरतो
बापजाद्यांनी लावलेल्या सर्वच उभ्या आडव्या वाकड्या झाडांचे आम्ही जळण करतो
झाडांची एक दिवस पूजा करतो,गंध फासतो न दिवसाढवळ्या त्याला चुलवणात टाकतो
वातानुकुलीत खोलीत बाटलीबंद पाणी पित कोट्यावधी झाडांची लागवड मोहीम पुकारतो
बोन्सायची औलाद आम्ही, रोपवाटिकेतली कोवळी रोपटीसुद्धा पाण्या वाचून सुकवतो
इतके नीच आम्ही की अंगणातले जुनाट बहरलेले घरट्यानी लगडलेले खरबरीत
सालींचे झाड निर्विकारपणे कापून त्याच्या बुन्ध्याचे शोपीस करून ठेवतो
अंगणातल्या जुनाट झाडांचे काय घेऊन बसलात ? त्याही पुढे जाऊन
आम्ही गर्भातल्या कोवळ्या कळ्यासुद्धा सफाईने अलगद खुडतो
इतके सारे सताड डोळ्यांनी बघतो, बधीर कानांनी ऐकतो
निलट साळसुदागत आभाळाकडे तोंड करून बघतो
त्यालाच विचारतो की पाऊस असा बेभरवशाचा
का झाला आहे ? पडत का नाही वेळेवर ?
भरल्यापोटी चर्चा करताना नतद्रष्ट पावसानेच आमची वाट लावली असं म्हणतो !!!  

- समीर गायकवाड.    

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...