Wednesday 8 May 2019

देहाचे सरपण...

जळण गोळा करताना

मायच्या देहाचेच झाले सरपण.

डोई चढलेला भार मोळीचा वाहताना

तिच्या पायाला यायचा बाभळीचा बहर.

मायची पाऊले चालली तरच चूल चालायची 

पोरांच्या रित्या पोटापायी जंगलवाटेची हुल लागायची

माय रातंदीस कामाला जुपून राही, जणू घाण्याचा बैल 

घरादाराच्या सावलीसाठी, काठी झाली मायच्या देहाची. 

माय उपाशी भुकेलीच निजे, चिंधूडके धडूते नेसून गावभर फिरायची

किस्नाच्या यादीत नाव तिचेच कसे नव्हते हा सवाल आजही काळीज पोखरतो

माय तोंडावरून हात फिरवायची तेंव्हा उरी गायचे सहस्र रावे.

रात होताच तिच्या डोळा यायचे पाणी नि स्वप्ना यायचा जंगलातला देव अनवाणी 


एके दिवशी,

प्रारब्धाने जंगलातले झाड खुडून मायच्या डोईत रोवले

मायच्या जिंदगानीचे झाली हजार शकले !

आता घरात चूल नाही आणि भुकेचे ही वांदे नाहीत

आणि हो, माय गेल्यापासून जंगल गेलंय जळूनी

बोडखी निष्पर्ण झाडे उरलीत, त्यांच्या स्वप्नात येत असेल का माझी माय ?            


- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...