Friday 21 December 2018

कढ


अडचणी बऱ्याचदा आल्या, संकटे आली

दरवेळी त्यानं तिच्याकडं आर्त पाहिलं

अंतरंगी तुफान असूनही ती अबोल राहिली 

जवळ बसून तिने, हातावर त्याच्या हात हळुवार ठेवला

तितकं पुरेसं होतं..  

स्पर्शानं वासना जशा जागतात

त्याहून अधिक दुःखांचे कढही निवतात

दृढ होत गेलेल्या सहवासाचा असाही अमीट ठसा असतो !


- समीर गायकवाड 

Wednesday 12 December 2018

ऋतू


तळपत्या उन्हातल्या पिवळट पानांना विचारलं,
बाबांनो तुमचं वय किती, काही सांगता येईल का ?
एकसाथ सगळी पानं देठापासून कसनुशी हसली
त्यातलंच एक पिकलं पान थरथरत म्हणालं,
ऋतू बेभरवशाचे झाल्यापासून 
कैक मौसम नवी घरटी झालीच नाहीत,
ज्या फांद्यांवर पक्षीच आले नाहीत 
तिथं पानांनी दिवस मोजण्यात हशील तरी काय ?

- समीर गायकवाड

Thursday 6 December 2018

घुटमळ...

अमावस्येच्या अंधाराचा त्रास काहीच नसतो मात्र

आकाश जेंव्हा लक्ष चांदण्यांनी लखलखतं तेंव्हा 

आपल्या एकटेपणाची जाणीव अधिक तीव्र होते...

 

संवाद अर्ध्यात सोडून तू गेलीस ती रात्र 

अजूनही तिथेच रेंगाळते आहे

रात्रीच्या त्या वळणावरती तू कधीही आलीस तर 

माझी सावली दिसेल तुला...

 

हवे तर विचार चंद्राला

जो खिडकीतून दिसत असेल तुला ! 
अंगणात कोसळलेल्या उल्का सांगतील तुला 

घुटमळतोय तिथेच आत्मा माझा !

 

- समीर गायकवाड 

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...