Thursday 15 September 2022

डोळ्यातलं आभाळ

आठवणींच्या मेघांचा रस्ता नेहमीच हरवलेला असतो
ते येतात असेच अनाहूत 
आणि दाटून येतं आभाळ अचानक.
कालची प्रखर उन्हेच बरी होती असं मग वाटू लागतं
घरांना खिडकी नसली तरी चालते. 
मनातल्या खिडकीत 
एकसंध बसता यायला हवं.
बाहेर हात बांधून उभं असलेलं गच्च साचलेलं आभाळ 
मग आपल्या डोळ्यात रितं करता येतं..
आपलं रितेपण दूर होण्याचा याहून चांगला मार्ग नाही!

Monday 12 September 2022

जिभा काढून घेतल्यात त्यांनी..

जिभा काढून घेतल्यात त्यांनी आणि 
मणकेही ताब्यात घेतलेत
तुम्ही वाकूनच राहायचं आणि बोलायचं नाही
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय

आता तुमच्यापाशी उरलेय तरी काय?
तर तुमचे असले नसलेले ईमान आणि निद्रिस्त विवेक!

तुम्ही जर कधी लढले असालच सत्यासाठी तर
पेटून उठेल तुमचे ही ईमान नक्कीच
आणि असेल थोडी जरी श्रद्धा मानवतेवर तर विवेक ही जागेल तुमचा

पण मित्र हो,
तोवर निदान हात तरी कलम करून देऊ नकात त्यांना
अन्यथा ते तुमच्याच हातांनी तुमच्यावर शस्त्रे चालवतील
आणि मग यथावकाश होईल घोषणा - "तुम्ही शहिद झालात राष्ट्रासाठी!"

- समीर गायकवाड.

भादव्यातल्या उन्ही माळाच्या उष्ण काठी...

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
चिंचेच्या चिगोरी एक
निजे गाय थकलेली
पिऊनी साय सावली

डोळ्यात तिच्या झुरे
निष्पर्ण झाड शोकाचे
पक्षांना भूल स्वप्नांची
पंखांत ओल फुलांची!

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
सुकल्या खोडाच्या पोटी
भुकेले पिलू घरटयात  
घार दूर मेघांच्या अभ्ऱ्यात      

चोचीस होती भास
इवल्याशा घासांचे
ओशाळे बरड रान
गळता अखेरचे पान.

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी...


श्रावणातला पाऊस ओसरला की भाद्रपदातल्या उन्हांचे दिवस सुरु होतात. भाद्रपदातलं ऊन अंगाला चटके देतं. भरपूर पाऊस पडून गेलेला असल्याने मोकार उन्हे पडताच मातीतून धग बाहेर पडू लागते. मात्र सर्वच शेतशिवारात असं घडत नसतं. बरड मातीचा एखादा निष्पर्ण माळ असतो तिथे हे दृश्य दिसत नाही. अशा बांधांवर नुसती गरम हवा वाहत असते, रोरावणारा वारा बांधांच्या ऊष्ण काठांशी विसावतो आणि बांध अजून तापतात. अशा बांधावर एखादं चिंचेचं झाड असलं तर आसपासच्या शेतातली एखादी थकलेली भाकड गाय सावली पिऊन दिवसभर निव्वळ बसून राहते. सावली तिच्या आसपास मागेपुढे होत राहते. तिथेच शेजारी असणाऱ्या निष्पर्ण अशोकाच्या खोडातल्या घरट्यात जिवंत राहिलेलं एखादंच पिलू बसून असतं डोळे मिटल्या अवस्थेत. त्याला भास होत असतात आईने घास भरवल्याचे, त्याची चोच नकळत उघडझाप करत राहते मात्र त्याची आई दूर मेघांच्या अभ्र्यात विहरत असते. हे सगळं कमालीचं संथ आणि उदासवाणं असतं, परिणामी अशोकाचं अखेरचं पान गळून पडतं तेंव्हा ते बरड मातीचं रान विलक्षण ओशाळतं, कारण आपल्याही कुशीत हिरवे पिवळे कोंब उगवावेत झाडं मोठी व्हावीत त्यांना आभाळभर पाने फुले यावीत आणि त्यावर घरटी व्हावीत असं त्या मातीला वाटत असतं!

- समीर गायकवाड.  

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...