Showing posts with label सौंदर्य. Show all posts
Showing posts with label सौंदर्य. Show all posts

Monday, 2 December 2024

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!


अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर
एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन !
मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्या दोन जास्वंदी
मॉलपाशी हसत होत्या लडिवाळ शेवंत्या
कॅफेबाहेर फुलत होत्या गुलबक्षीच्या कळ्या
होस्टेलसमोरच्या गार्डनमध्ये झुलत होते कळीदार गुच्छ
एका लयीत जात होत्या पाठीवर सॅक लावलेल्या निशिगंधाच्या जुड्या
गच्चभरल्या सिटीबसच्या खिडकीतल्या जाईजुईचा तजेला हवेत होता भरून
लायब्ररीच्या पार्किंगमधल्या गुलाब कळ्यांना पेलवत नव्हतं पुस्तकांचं ओझं
ज्युबिली हॉलच्या इनर सेक्शनमध्ये दरवळत होता गंधवेड्या मोगऱ्यांचा जत्था
रस्त्याच्या कडेने आईबाबांसह घुमत होती काही सोनकुसुमं आणि सोनकळ्या....

निर्भया, असिफा, ट्विंकल आणि कालपरवाची प्रियंका
अशी लाखो फुलं अकाली चुरगाळली गेली तरी
माझ्या शहरातल्या फुलांनी बहरणं सोडलं नाही, ती अखंड फुलताहेत,
या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे! 🌺🌸🌼🌹🪻🌷

या फुलांनी फुलतच राहावं, अखिल चराचराने यांना जपावं!🌿🍂
हे प्रसन्न तजेलदार ताटवे पाहून सकलांचा अमलताश व्हावा..

- समीर गायकवाड

Saturday, 6 March 2021

रंग उदास झाला...

जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला...
हंबरला पिंपळ सांज आभाळी साकळताना
 
शांत जलौघात उतरले प्रतिबिंब अखेरच्या पक्षांचे
घुटमळला प्रवाह नदीचा शोधता तिच्या ठशांना.
 
मेंदीचा हातावरल्या तिचा गंध उरला भवताली
जडशीळ झाली नदी वाहून तिला नेताना

गेले स्वप्न विरघळून पापण्यात चिणलेले
गहिवरल्या चांदण्या डोळ्यात निष्प्राण डोकावताना
 
जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला
मुका झाला रावा चंद्रकोरी आड जाताना....
~~~ ~~~~ ~~~ ~~~~ ~~~~~
या कवितेची पार्श्वभूमी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. बनारस म्हणजेच वाराणसीच्या
मणिकर्णिकेच्या घाटावर मृतदेहांवर संस्कार करण्याचं काम अविरत सुरु असतं. दहन देण्याआधी जातधर्म कुळ गोत्र सांगावं लागतं. मग मुर्दहिया त्या प्रेताचे अग्नीसंस्कार पार पाडतो. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बनारसमधील शिवदासपूर या वेश्यावस्तीत मरण पावलेल्या बायकांना इथं दहन दिले जात नसे. इतरत्रच त्यांचे विधी पार पाडावे लागत असत. १९९२ मध्ये अकाली मरण पावलेल्या जसोदाबाई या तरुण वेश्येचा मृतदेह अन्य वेश्यांनी लपूनछपून घाटापाशी आणला. मात्र स्त्रियांना पुढे येण्याची अनुमती नसल्याने त्यांनी वेगळी शक्कल लढवली. घाटाच्या पुढच्या भागात त्या गोळा झाल्या आणि जसोदेच्या इच्छेनुसार अग्नी न देता तिला गंगेच्या हवाली केलं. असेही तिथे अर्धेमुर्धे जळालेले मृतदेहही बऱ्याचदा गंगेत सोडले जातात. त्या अर्धवट जळालेल्या कलेवरांच्या साथीने जसोदेचा देह वाहत गेला. काही दिवसांनी बिंग फुटलं. पोलिसांना बायकांना दम देऊन सोडलं. आता परिस्थिती बदलली आहे मात्र रिवाज तेच आहेत. ही कविता जसोदेसाठी लिहिलीय....

Sunday, 28 July 2019

कळीदार ...

वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो.
अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,
आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर
आता एक तरतरीत जोडपं बसलेलं असतं
ते दुसऱ्या कुठल्याच बाकावर बसत नाहीत.
न राहवून त्यांना आज छेडलंच..
त्यावर ती छानसं लाजली, गालावर तिच्या तेंव्हा मस्त खळी पडली
किंचित अवघडलेला तो गोरामोरा होत उत्तरला,
'या एकाच बाकावर अद्भुत गंध दरवळतो, जो पुन्हा पुन्हा खेचून आणतो !'
मी गालातल्या गालात हसलो.
त्या दोघांचे हात अलगद हातात घेतले
काही क्षणांसाठी हळुवार धरून ठेवले...
तिथून निघताना माझ्याकडे पाहत
बागेतली सगळी झाडं झुडपं पानातल्या पानात नाजूकसं हसत होती आणि
प्रत्येक फुलात आपल्या तरल आठवणी उमलत होत्या...

अजूनही मोगरा तुझ्या कळीदार देहात तसाच घुमतो का गं?

- समीर गायकवाड

Friday, 31 May 2019

सावली


उन्हे फार कडक होती,
सकाळपासून तुझ्या घराची दारे खिडक्या बंद होती
आता सूर्य मावळला असेल तर
जरा शयनकक्षाच्या खिडकीतून बाहेर पहा
तिथल्या पारिजातकाच्या झाडाजवळ
माझी सावली विसरली आहे
तुला पाहून तिच्यात फुलांचा दरवळ तरी येईल !


- समीर गायकवाड 

Saturday, 25 May 2019

प्राजक्त


खूप प्रयत्न करूनही ओठातून शब्द फुटले नाहीत
घायाळ मौनाचे अर्थ तिला कधी उमजलेच नाहीत
काळीज पोखरणाऱ्या निशब्दतेचीही एक भाषा असते
जी शब्दांच्या कुबड्यांसाठी कधी मोहताज नसते...

तसं तर ती ही अर्धोन्मिलित ओठांनी पुटपुटली होती काही तरी
पण मातीत रुतलेल्या तिच्या अंगठ्यावरच माझी नजर होती
त्यामुळं तिचं म्हणणं कधी कळलंच नाही...
आता काही दशकानंतर तिला भेटताना
थरथरतात का अजूनही ओठ तिचे, शोधायचं होतं मला
पण पाहताच मला नजर तिने लपवली
अंगठ्यानं ती उकरत होती माती, हे पाहून मात्र हायसं वाटलं !

आता भर उन्हात उभं असताना तिची सावली आवाज देत शोधते मला
भूतकाळाच्या उंबरठ्यातून तिच्या हाका ऐकू येत नाहीत
दाराबाहेरचा पारिजातक मात्र शोषून घेतो तिच्या सात्विक हाका
सकाळ होताच तिच्या हाकांचा प्रतिध्वनी ऐकवण्यास झेपावतात फुलं अंगावर
लोक म्हणतात, अंगणात प्राजक्त फुलांचा सडा किती बहारदार पडलाय !


- समीर गायकवाड 

Wednesday, 15 May 2019

बहर


अलीकडे रोज सकाळी न चुकता मी रेडीओ लावतो.
खरं तर मी ऐकत काहीच नसतो
आठवणींच्या तरंगात जगत असतो.
हातून निसटलेला गतकाळाचा पारा वेचण्याचा तो एक अधुरा प्रयत्न असतो.
भूतकाळात वारंवार डोकावं नये असं म्हणतात
पण मी डोकावतो, जगतो
साथसोबत सोडून गेलेल्या माणसांचं सान्निध्य अनुभवतो
माझ्याच चुकांचा आलेख नव्याने मांडतो
येणाऱ्या काळाचं गणित शिकतो....
आजकाल मी वर्तमानाला न साजेसं जगतोय
कारण मर्जीप्रमाणे वागतोय...
कुणी कालबाह्यतेचा ठपका ठेवला तरी हरकत नाही, दुःख नाही.
जगाला आवडेल असं आयुष्य आता मी जगत नाही.
अंगणात दफन झालेले कधी काळचे माझेच उसासे आता आनंदी भासतात मला..
पारिजातक आता अधून मधूनच फुलतो पण मी रोजच बहरलेला असतो...


- समीर गायकवाड 

Wednesday, 8 May 2019

सुभग

चांदण्या लुकलुकत्या लेवूनि अंधाराच्या नित्य झोपी जाते रात्र
तरंगतात खुणा जन्मदात्यांच्या भिंतीवरल्या आत माजघरात
अंगाई गीत ओसरीवरच्या पिंपळपानांचे रंगते आर्त स्वरात
कातळ अंधाराचे कुरतडते अलगद कातरवेळेची ओढाळ खार
भरकटलेलं हरिण मनीचे जंगलात मौनाच्या घुसमटते आरपार
साली आठवणींच्या सोलत तिष्टतो कोनाड्यात उद्याचा प्रहर
नभात दूर अंधारल्या ओढतो चिलीम दुःखाची वृद्ध एकाकी मेघ
स्फटिक धवल निर्झरात विरघळतात स्वप्नांचे घायाळ घननीळ
झोपी जातात सावल्या झाडांच्या अंगणात, लटकतात अन पारंब्यात
येताच किरणे पहाटेची कष्टतात झाडे किरमिजी दूर दूर गगनात
पाखरांचे जथ्थे मग उठतात अन झेपावतात उंच उंच आभाळात
होताच सकाळ निजतो मी मेघांच्या अभ्र्यात, जन्मजन्माच्या झुल्यात
पक्षी सुवर्णवर्खी आठवणींचे फडकवत पंख सांगावा सुभगाचा सांगतात...

- समीर गायकवाड

स्वर्गाची वाट



स्वर्गाच्या सर्व वाटा मातीतूनच जातात,
मातीचीं नाती जपता त्या आपसूक गवसती !
मातीतून उगवणारे अंकुर साठवता मनी
झाडे घनगर्द देती शीतल सावली
जपता काळजागत मातीत रोवलेल्या बीजां
या वाटांची गावे बहरदार होती.
थेंब मातीत कोसळणारे टिपता आसवल्या डोळ्यांनी
दारे मोक्षाची कोरीव खुलती
ओठी ठेवता मातीचे अजरामर गाणे
होतो परिचय स्वर्गीय गीतांच्या स्वरांशी,
धूळ जित्राबांच्या खुरांची मातीत राबत्या मस्तकी लागता
उभारती यक्ष-गंधर्व पायाशी
गंध भाळी मातीचा ल्येता कुणी
वाट अलगद नेती वैकुंठी !

- समीर गायकवाड

बाभळी




बारा गावच्या बाभळी आम्ही, जणू लंकेच्या पार्वती.
नाही सोन्याची आस ना मोत्याची भूक

मातीच्या नातलग आम्ही, लेतो निसर्गाचे लेणं.
साधीच माणसं आम्ही, आमचं साधंच जिणं.

नाही फुलांचे वेड, नसे दागिन्यांचा सोस
ना वाटे लाज सावळ्या रंगाची, नसे रुपाची खंत

बघा कधीही काळजात, तिथे खऱ्याचीच आस
पोट पाठ एक होऊनीही धरतो मातीचीच कास

माय बापाच्या घरी, आम्ही झालो परक्या
जणू वाऱ्यावर उडालेल्या शेवरीच्या गिरक्या

माहेर सासर दुईकडं आमच्या जीवाची घालमेल
आधी मुलगी मग बहीण, नंतर मायंची गं वेल !

कधी जगलोच नाही आम्ही आमचंच जिणं
दुःख जातसे पळून, आम्हाला सदा हसत पाहून

चंदनी देहातुनी आमच्या वाहे मायेचाच दरवळ
एक डाव येऊनि घ्या, आम्हा बाभळीचा हो आशीर्वाद.
नाही झालं प्रसन्न तुमचं मन, तर नाव दुजाचे लावीन…

सरण..

काळोख वेचताना लामणदिवे बोटांचे झाले,अंतरंगी अंधार साठवूनी हृदय झाकोळले.
अट्टाहास प्रकाशाचा सोडून तप उलटले,
फसवले दिशांनी मला, त्याला युग लोटले.
दिक्कालाच्या रेघांनी नयन धुंद रेखाटले,
मृगजळी पाऊलखुणांनी आयुष्य विस्कटले.
वारयाने कस्तुरीचे तुझ्या पत्ते चुकीचे दिले,
शोधताना तुला, मी तारे मस्तकात खोवले.
तरंगांनी ताऱ्यांच्या गीत विरहाचे शिकवले,
दिसली न कधी तू, विराणीचे शब्द उसवले.
मोहात तुझ्या मी नाते उजेडाशी की तोडले,
देहातले वाटवाघुळ अंती स्मशानी लटकले.
काळोख जगताना नित्य देहाचे सरण पेटले,
अखेर सरणातल्या आगीत चैतन्य तुझे भेटले !

- समीर गायकवाड.

तू

पहाटवेळी स्नानासाठी तू पाणी काढून ठेवतेस तेंव्हा त्यातला प्रत्येक थेंब स्पर्शाधीर होऊन जातो,
तुझ्या तलम देहावरून ओघळताना त्यांचे प्राण कंठाशी येतात आणि तुझी काया शहारून उठते.
भल्या सकाळी ओलेत्या अंगानेच चिंब झालेले केस सुकवण्यास तु सज्जात येऊन उभी राहतेस तेंव्हा,
तुझ्या बाहेर येण्याआधीच अंगणातल्या नभांत दृष्टीव्याकुळ मेघांची दाटी झालेली असते.
तुला पाहून गालातल्या गालात हसत एकेक मेघ आभाळाच्या अंतरंगात विरघळत जातो,

चैतन्य ..

महिरपी केसांत कुंकवाचा चंद्र 
मासोळी डोळ्यात इष्काचा डंख
चाफेकळी नाकी मोरणीचा संग
नाजूक जिवणीस पुर्वाईचा रंग
खाऊनी विडा कातकेशरी कंद
गोजिरया गालांना लज्जेचा छंद
निमुळती हनुवटी करितसे दंग
सैल अंबाडयात केवडा धुंद
रेखीव बांधा संगे कमनीय अंग
देहाची गोलाई जाळी अंगांग
तेजाळ तारुण्य निमगोरा रंग
लेवुनी जरतारी मखमल तंग
करिती नृत्य जणू दामिनी तरंग
पैंजणी रुळे मधुर नादगंध
सुटुनी जाती सारे भावबंध
मैफिलीत उरती हृदय रंध्र
भाळूनी जाती मदन सारंग
बघताचि आत्मा होई अनंग

नार न तू, तू चैतन्य अभंग !

- समीर गायकवाड

चंद्रावळ नार


रंगरूपाची तू खाण चंद्रावळ नार !

बांधा कमनीय अंग अंग भरदार

मासुळी डोळ्यात इष्काचं जहर,

नागिणी भुवयांचे बाण टोकदार

गुल्कंदी ओठावर प्रेमाचा बहर,

उफाणल्या देहात भरतीची लहर !

 

सैल अंबाड्यास कैफ केवड्याचा,

भाळी टिळा लालबुंद कुंकवाचा,

गालाचा स्पर्श मोरपिसाचा,

चाफेकळी नाकास छंद मोरणीचा

छातीस भार उन्नत उरोजाचा,

मख्मली पोटास गंध नाभीचा !


साजिऱ्या हाती सोनेरी बिल्वर,

तन्मणी खोडाची गळयात सर

देखण्या दंडास बाजुबंदाची नजर,

कानी डुलती सोनझुबे डौलदार

आवळ चोळीवर रुळे गोफ चंद्रहार,

कंबरपट्ट्यात कैद कटीभार


हिरे कंकण ल्येली सारजा नार,

गच्च पोटरयांचे वळण घेरदार

मंजुळ वाजती पैंजण घुंगरू फार,

शिंदेशाही तोड्याचा नाजूक भार

देहात वारं जणू अश्व बेदरकार,

चालताना होई काळजावर वार ! 


कर्नाटकी चोळीला जरतारी धार,

थुईथुई नाचती पैठणीवरचे मोर

हिरवेगार चुडे लाजंत होती चूर,

स्वर्गीची अप्सरा का जन्नतची हूर  

मी मदनबाण तू मेनकेचा अवतार,

लागे शस्त्र कशाला तूच तलवार !!


रंगरूपाची तू खाण चंद्रावळ नार !

बांधा कमनीय अंग अंग भरदार......


- समीर गायकवाड.

Sunday, 5 May 2019

अमलताश


काही वर्षापूर्वी भेट दिलेलं पुस्तक आज तिच्या हातात होतं.
अधून मधून दोन्ही हातांची मिठी घालत हातातली पुस्तके ती छातीशी गच्च आवळून धरत होती.
तिच्या अदा आजही तशाच होत्या,
तोच अंदाज कायम होता.
बराच वेळ ती मैत्रिणींसोबत बोलत उभी होती.
काही वेळानं दिलखेचक हास्यमुद्रेनं निघून गेली....
तिच्या स्पर्शानं वितळलेली काही अक्षरं
रस्त्याच्या कडेला बहाव्याच्या झाडाखाली पडून होती,
ती गेल्यानंतर गोळा केली.
ती अक्षरं जोडली तर तिचं नी माझंच नाव तयार झालं !
जीवाचा 'अमलताश' झाला !!

Wednesday, 24 April 2019

गल्बला ..



गाव फुलांचा सोडून काय ती गेलीसुगंध की इथला निमाला.

वाराच तो सैरभैरज्याने पत्ता नवा तिचा अकस्मात कळवला.

वाऱ्यास गंधवेड्या विचारले, "शोध तिचा कसा काय लागला ?"

"आसमंत देहगंधाने तिच्या दरवळला त्यानेच की माग लागला"

तलम अस्तुरीगंधबेधुंद कसा राहीन लपूनकरी तो गल्बला !

Tuesday, 26 March 2019

घरंगळलं आभाळ


घरंगळलं आभाळं तुझ्या कोयरी डोळ्यांत
मनं खिल्लारं धावून गेलं चौखूर दिशांत
गोंदण दंडाचं दिसतां उडती कारंजी काळजात
हसली पाखरं खुदकन जुंधळ्याच्या ऐन्यात
हळदल्या पावलांनी माती जाई हरखून
भर उन्हातलं लागिरं पारंब्याच्या सावल्यात
रान झपाटलं तुझ्या चंदनगंधी देहात
गाभुळलं उन्हं तलम कायेला शिवून
उधाणल्या अंगातला घुमं पारवा जोरात
गेली लाजून झाडं वेली गेल्या झिम्माडून
गाणं प्रेमाचं गातंया उभं शिवारं नाचत...

Tuesday, 26 February 2019

दरवळ


तुझ्या ऑफिसच्या रस्त्यावरचीच गोष्ट आहे,
काल पाऊस पडत असताना ज्या झाडाखाली उभी होतीस
त्या झाडाची तमाम हिरवी पिवळी पानं बेहोष झालीत..

आताच मी ऐकलंय, ते झाड डोळे मिटून पावसासाठी दुवा करत होतं !
________________________________________________

जुन्या घराजवळ तुझ्या, काल गेलो होतो
अंगणातल्या पारिजातकाच्या फुलांत अजूनही तुझ्या अश्रूंचा दरवळ होता.
परतून आलीस कधी तर पानांना विचार
श्वासात माझ्याही गंध तुझाच भरलेला होता!

कावरा बावरा होत, तिथंच घुटमळत होतो
सागवानी बंद दारातही तुझ्या दिसण्याचा तोच जीवघेणा भास होता.
समजून घेतलंस कधी तर श्वासांना विचार, 
काळजात तुझ्याही परिमळ माझाच होता !

___________________________________________________



अलीकडे हे असेच होते, त्वरित रिप्लाय द्यायचे ठरवतो 

आणि नकळत अंगणातल्या पारिजातकात गुंतून पडतो...
फुलांचं बहरणं चालूच राहतं, 
त्या नादात शब्द विसरून जातात...
बघता बघता रिप्लायला उशीर होतो...
पाकळ्यांवरचे दवबिंदू डोळ्यात दाटले की भानावर येतो 
पाहतो तर शाईत फुलांचा गंध दरवळत असतो !!!...

_______________________________________________

खिडकीतून गरम हवा आली तेंव्हाच ओळखले मी
पडद्याआड तुझेच ऊर धपापले असणार !
उंबरठयावरची रांगोळी सांगून गेली मजला,
येण्याची माझ्या, प्रतिक्षा अनंत झाली असणार !

मी असाच आलो अवचित वारा जसा पदराशी खेळाया
तू होती भिनवित आठवणी ऐन्यात हळदीच्या राया
येताच घरात मी, शहारल्या माळावरच्या मुग्ध आमराया !
चल पसरू दे दरवळ, वारा गंधवेडा आसुसला असणार !


- समीर गायकवाड 

Wednesday, 6 February 2019

सावल्यांचा गंध


क्षितिजाच्या खोल डोहात आता काही वेळात हा केशरी सूर्य बुडून जाईल

माझ्या दिवाणखान्यातल्या तिच्या सावल्या ज्याने सोबत नेल्यात.

आता या अंधाररात्रीस अंगभर चांदणं ल्यालेला चंद्रमा खिडकीत येऊन बसेल

ज्याला वेड लागलेय तिच्या सावल्यांच्या गंधाचे, त्याला आता काय सांगावे?

- समीर गायकवाड 

Tuesday, 15 January 2019

शोध


मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते. 
वाटेवरच्या बांधात घुटमळत राहते, कुंबीच्या दगडातील कड्या कपारीत घुमत राहते. 
गवताच्या पात्यांना कुरवाळते त्यांची ख्याली खुशाली विचारते आणि डोळे पुसत राहते !
माळावरच्या वड चिंचांना फेर धरून झोंबत राहते, ओल्या सुक्या पारंब्यावर झोका घेते.

बहक


तळपत्या उन्हात तिच्यावर काय कविता लिहू ?
थोड्याशा उन्हानेच तिची नाजूक सावली करपते !
खिडकीच्या आड तीच उभी आहे आत कशाला पाहू ?
तिच्या देहाचाच गंध असणार, हवा का उगाच बहकते !

- समीर गायकवाड 

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...