Tuesday, 26 February 2019

दरवळ


तुझ्या ऑफिसच्या रस्त्यावरचीच गोष्ट आहे,
काल पाऊस पडत असताना ज्या झाडाखाली उभी होतीस
त्या झाडाची तमाम हिरवी पिवळी पानं बेहोष झालीत..

आताच मी ऐकलंय, ते झाड डोळे मिटून पावसासाठी दुवा करत होतं !
________________________________________________

जुन्या घराजवळ तुझ्या, काल गेलो होतो
अंगणातल्या पारिजातकाच्या फुलांत अजूनही तुझ्या अश्रूंचा दरवळ होता.
परतून आलीस कधी तर पानांना विचार
श्वासात माझ्याही गंध तुझाच भरलेला होता!

कावरा बावरा होत, तिथंच घुटमळत होतो
सागवानी बंद दारातही तुझ्या दिसण्याचा तोच जीवघेणा भास होता.
समजून घेतलंस कधी तर श्वासांना विचार, 
काळजात तुझ्याही परिमळ माझाच होता !

___________________________________________________



अलीकडे हे असेच होते, त्वरित रिप्लाय द्यायचे ठरवतो 

आणि नकळत अंगणातल्या पारिजातकात गुंतून पडतो...
फुलांचं बहरणं चालूच राहतं, 
त्या नादात शब्द विसरून जातात...
बघता बघता रिप्लायला उशीर होतो...
पाकळ्यांवरचे दवबिंदू डोळ्यात दाटले की भानावर येतो 
पाहतो तर शाईत फुलांचा गंध दरवळत असतो !!!...

_______________________________________________

खिडकीतून गरम हवा आली तेंव्हाच ओळखले मी
पडद्याआड तुझेच ऊर धपापले असणार !
उंबरठयावरची रांगोळी सांगून गेली मजला,
येण्याची माझ्या, प्रतिक्षा अनंत झाली असणार !

मी असाच आलो अवचित वारा जसा पदराशी खेळाया
तू होती भिनवित आठवणी ऐन्यात हळदीच्या राया
येताच घरात मी, शहारल्या माळावरच्या मुग्ध आमराया !
चल पसरू दे दरवळ, वारा गंधवेडा आसुसला असणार !


- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...