Tuesday, 5 March 2019

मैत्र


धगधगत्या निखारयावरून चालताना स्वतःला जाळून
दुसरयासाठी त्या विस्तवाचं चांदणं करतात,
आपल्या स्वप्नांची राखरांगोळी करून दुसरयांची सुखे सजवतात,
आपली अडचण लपवून सदैव मदतीचा हात पुढे करतात,
आपल्या वाट्याचं आभाळ दुसरयाच्या अंगणात रितं करतात,
ते मित्र असतात.....


स्वतःचं शरीर अधू झाल्यावरही आयुष्यभर साथ देतात,
स्वतः गलितगात्र होऊनही दुसरयाचे पंचप्राण बनून राहतात.
नव्या जुन्या आठवणींचे हक्काचे साथीदार असतात,
अर्धपोटी रात्रींचे अन उत्तुंग यशोगाथेचे साक्षीदार असतात,
आनंदाचे वाटेकरी असतात अन वेदनांचे भागीदार असतात
ते मित्र असतात......

संकटात बाहू होतात अन घनमेघ आपल्या शिरी पेलतात
भळभळत्या जखमा झाल्या की डोळ्यात राहून अश्रुंचा पारा होतात.
व्यावहारिक जगाने फसवले की स्वतःचा खिसा मोकळा करतात,
दुनिया जरी आपल्या विरुद्ध गेली तरी आपल्यासाठी ढाल होतात,
ते मित्र असतात......

प्रसंगी उपाशी राहून दुसरयाचे पोट भरतात,
मित्र आयुष्याची शिदोरी असतात,
शैशवातली विटी अन उतारवयातली काठी असतात,
दुर्योधनासाठी कर्ण होतात अन कृष्णासाठी सुदामा होतात,
आपण मेल्यानंतर पोरेबाळे घरी जातात पण पाटीपेन्सिल पासून सुरु झालेले मित्र तिथंच बसून रडत राहतात,
मित्र दुसरे तिसरे कोणी नसतात,
या हृदयाचे त्या हृदयी व्हावे यासाठी जन्मलेले देवदूत असतात !

-
समीर गायकवाड.


No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...