Tuesday 9 November 2021

दवात उमलत्या वेदना....



पावसाने गोठयातल्या चिखलात रुतलेलं
मथीचं आजारी अशक्त वासरू मेलं.

त्यालाही तिथंच पुरलंय जिथं
कधी काळी चित्रीला पुरलं होतं
आता चार दिवस उलटून गेलेत,
दरम्यान एकही रानफुल उमललं नाही.

मथीचं दूध आटलंय
दावणीला उभी असते ती
निर्विकारपणे
मात्र तिचे डोळे अखंड वाहतात
मथीचं ते शेवटचंच वेत होतं.

दुपारच्यानं आई गोठ्यात गेली की ती मथीपाशी बसते
मग आई आणि मथी दोघीही आसवत जातात
त्यांची काही दुःखे समान असावीत!

त्यांना रडताना पाहून
कडब्याच्या गंजीवर एकटीच बसलेली साळुंखी भावूक होते

घोटाभर चिखलात आडवी पडलेली
जुंधळयाची हिरवी सोनेरी ताटं
त्या दोघींच्या दुःखात सामील होतात.

सांजंला आई वृंदावनापाशी दिवा लावते तेंव्हा
दिव्याच्या केशरी पिवळ्या ज्योतीत
उद्याच्या आशा चौदिशेला तेवत राहतात

रातीला दावं मोकळं सोडलेली मथी
नकळत आईपाशी बाजेजवळ येऊन बसते
खरबरीत जिभेने तिचे हातपाय चाटत राहते.

मध्यानरातीला चान्न्या आईपाशी येतात
तिच्या भेगाळलेल्या पायापाशी झोपी जातात

त्या वक्ताला मथी, तिचे अशक्त वासरू आणि चित्री
सगळेक तिथे टक्क हजर असतात

मग ओलेती रात्र त्यांच्या डोळ्यांतून पाझरत राहते
पाय पोटात दुमडून
एकमेकींच्या पोटावर डोकं टेकून त्या अल्लाद निजतात
तेंव्हा कुठं झाडं, पानं. फुलं, पिकं, डोबी, गोठा, शेतशिवार डोळं मिटतं.

त्यांच्या समग्र वेदना सकाळच्या दवातून उमललेल्या असतात! 

- समीर गायकवाड

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...