Monday 28 January 2019

उद्याचा काळ



काजव्यांची गर्दी दारी तुझ्या असली तरी,
तारांगण उद्याचे माझेच असणार आहे.

सूर तुझे जरी लागले खास असतील तरी,
मुक्त बंदिशी उद्याच्या मीच गाणार आहे.

तोरणे फुलांची लागली तुझ्या घरी तरी,
बाग फुलांचा उद्या माझाच असणार आहे...

रचून घे कवने खोट्या शब्दांची किती तरी,
शब्दांना वेसण उद्या मीच घालणार आहे.

कैफ वाऱ्याचा साजरा कर भरभरून उरी,
दिशा वादळाची उद्या मीच बदलणार आहे.


दुःखाच्या डागण्या मला खुशाल दे परी,
येणारा काळ हसणार तुझ्यावर आहे !!

समीर गायकवाड

Tuesday 22 January 2019

उठवळ उन्हे...

कोलाहल दूरवर उठवळ उन्हांचा

गायीच्या डोळ्यातले बेट साकळे मनात

पान्हा आटता नदीच्या स्वप्नांचा 
रत्नजडीत पिसारे मोरांचे कुढती वनात
तूझे सुतोवाच करतो रव उल्कांचा
मी पुन्हा जन्मतो आईच्या गर्भात...

 

अन्वयार्थ –

या कवितेत 'उठवळ उन्हे' हे प्रतिक आहे जगातील अघोरी लोकांचे जे दुसरयाच्या भावविश्वात डोकावून त्याचे जगणे हराम करून जातात. अशा वेळी दुःखांचे कढ नकळत मनात साठत जातात. नवा उन्मेष, सृजनता सगळं काही बेचिराख होऊन जातं जणू काही नदीचा पान्हा आटावा अन तिचे पात्र कायमचे कोरडे पडावे तसे मन शुष्क होऊन जाते ! प्रतिभेचे पंख झडून पडतात आणि मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेऊ लागते, जे कधीच हाती लागत नाही त्यासाठी कुढत राहते. अशा वेळी जन्ममृत्यूचे प्रतिक असणारी उल्का जगण्याचा नवा संदेश घेऊन येते. आईच्या गर्भात रोज नव्याने निजताना प्रतिभाशक्तीला नित्य नवे धुमारे फुटू लागतात. अशा अर्थाची ही कविता आहे.

 

- समीर गायकवाड

Tuesday 15 January 2019

शोध


मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते. 
वाटेवरच्या बांधात घुटमळत राहते, कुंबीच्या दगडातील कड्या कपारीत घुमत राहते. 
गवताच्या पात्यांना कुरवाळते त्यांची ख्याली खुशाली विचारते आणि डोळे पुसत राहते !
माळावरच्या वड चिंचांना फेर धरून झोंबत राहते, ओल्या सुक्या पारंब्यावर झोका घेते.

बहक


तळपत्या उन्हात तिच्यावर काय कविता लिहू ?
थोड्याशा उन्हानेच तिची नाजूक सावली करपते !
खिडकीच्या आड तीच उभी आहे आत कशाला पाहू ?
तिच्या देहाचाच गंध असणार, हवा का उगाच बहकते !

- समीर गायकवाड 

Wednesday 9 January 2019

देहगंध



पाऊस पडणार आहे म्हणे.
मग जमल्यास असं करशील का,
आपण ज्या झाडाखाली भिजलो होतो तिथे जाऊन तू उभी राहा.
पुन्हा कधी तरी मी ही तेथे जाईन तेंव्हा

तुझ्या देहगंधात न्हालेलं पाऊसपाणी पिऊन तृप्त झालेली पानं
तुझ्या देहाची कळा माझ्या काळजात कोरतील !

Tuesday 1 January 2019

पाठीवरचा तीळ


तिच्या मखमली पाठीवरचा तीळ त्याच्या डोळ्यात विसरलाय
तर पहिल्या मिठीनंतर त्याच्या काळजाचे ठोके तिच्या हृदयात हरवलेत
या गोष्टीला तप उलटलंय....
आता तो तिच्या घरी जात नाही की ती त्याच्या घरी येत नाही
पण दोघांना ठाऊक असतं की विसरलेलं कुणीच नसतं
अधुरं राहिलेलं काही सांगायचं असलं तरी गाठभेट होऊनही बोलायचं नसतं.
पूर्वी ते लोकांच्या नजरा चुकवत एकमेकांना पाहत
आता एकमेकांच्या नजरा चुकवत ते लोकांना पाहतात.
इतकं होऊनही एकमेकाच्या मनातलं त्यांना नेमकं ओळखता येतं

- समीर गायकवाड 

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...