Tuesday 15 January 2019

शोध


मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते. 
वाटेवरच्या बांधात घुटमळत राहते, कुंबीच्या दगडातील कड्या कपारीत घुमत राहते. 
गवताच्या पात्यांना कुरवाळते त्यांची ख्याली खुशाली विचारते आणि डोळे पुसत राहते !
माळावरच्या वड चिंचांना फेर धरून झोंबत राहते, ओल्या सुक्या पारंब्यावर झोका घेते.


डोबीतल्या पाण्यात पाय टाकून बसलेल्या औदुंबराच्या बुंध्याशी रेलून बसते, सुस्कारे सोडते.
दंडातून खळाळणाऱ्या जलस्फटिकासोबत पारदर्शी होत विकारओझे टाकून वाफ्याकडे वाहते.

मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते. 
निवडुंगात अडकलेल्या जुनेर कापडाच्या चिंध्यात ओळखीच्या सदरयाचे लक्तर धुंडाळत बसते !
वाटेच्या कडेने पडलेल्या बाभळीच्या काट्याने कुण्या पावलांना दंशले असेल याचा अंदाज लावत बसते.
अळवाच्या पानावरील मोत्यात झिरपलेल्या आरसपानी प्रतिबिंबाचा अर्थ लावत सैराभैर होऊन जाते. 
वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनपानांकडून राघू मैनेच्या नव्या पिढीचा हिरवा पत्ता अलगद काढून घेते !
फांदयावरील जुन्या घरटयांतील वाळलेल्या काटक्यात पिलांची नाजूक पिसे मोजत बसते..

मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते. 
शेताच्या मध्यावर असणारया ताशीव दगडी विहिरीतल्या निळयाहिरव्या पाण्यात गटांगळ्या खाते. 
मऊशार काळ्या ढेकळाच्या अंधारलेल्या शाश्वत गर्भात दडलेल्या सानुल्या बीजाला गोंजारते.  
अथांग नभाच्या निळाईत विस्कटलेल्या ढगांच्या पुंजक्यांना जुन्या प्रेमळ मेघांचा नवा पत्ता विचारते  !  
पाऊलवाटेच्या अंताशी असणारया पूर्वजांच्या समाधीजवळील चाफ्यापाशी निशब्द हुंदके देते.
या वाटेवर बालपणाचा विरलेला कापूर गवसतो का याचे आडाखे लावत आत्ममग्न होऊन जाते.

मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते,
मातीत मिसळलेल्या पाऊलखुणांना आपलीच पावले समजून तिथे रांगोळीतली चिन्हे रेखाटते.
गिर्र्रेबाज मक्याच्या कणसातले मोती मोजून ऊसाच्या डौलदार तुरयावर डोलत राहते.
वाटेतल्या पांढरया काळ्या जित्राबांच्या गळ्यातल्या घंटाच्या तालनादावर जीव ओवाळून टाकते.
गोठयातुन येणाऱ्या वृद्ध गाईंच्या आर्त हंबरडयाने आवंढा गिळत कासावीस होऊन जाते.
चंद्रमौळी छपरातून भरल्या डोळ्यांनी पाहणारया पोक्त किरणांना उराशी घेऊन कवटाळते.

मन फिरून पाऊलवाटेवर येते, तिथल्या भुरकट मातीत हरवलेल्या क्षणांचे काळीज शोधते,
रक्तात उतरलेले हमरस्त्याचे तुसडेपण आसमंतात विरघळवून आयुष्याचे निर्माल्यगंध वेचत राहते.....

- समीर गायकवाड.  


No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...