Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Saturday, 6 December 2025

प्रिय बाबासाहेब!


आपल्याकडे एक बरे असते,
एकदा का माणूस गेला की त्याला पुतळ्यात चिणतात.
त्याच्या विचारांना विशालकाय स्मारकात दफन करतात.

नुसताच उदोउदो करत महामानव नावाचं दंभसूक्त रचतात.
बाबासाहेब तरी याला कसे अपवाद राहतील?
उगाच ते या देशात जन्मले!

दलितांनी त्यांना अस्मितेच्या निळाईत बुडवले तर
उच्चवर्णीयांनी आपला पोटशूळ दडवत
दरसाली खोटा कुर्निसात केला.

Sunday, 30 November 2025

शहरातील बेघर भिकारी


शहरातील बेघर भिकारी 
रात्री रिकाम्या पोटी 
धुळकट आडोशांना झोपी जातात.
दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात
रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे
म्हणून मनातल्या मनात दुवा मागतात...
भिकारी झोपी गेल्यानंतर तिथं 
चांदणं येतं,
त्यांच्या उशाला बसून कासावीस होतं..
रात्रीस आजकाल आभाळ निव्वळ निरभ्र दिसतं
कारण माझ्या वाट्याचं चांदणं विरतंय
शहरांतला काळोख रात्रभर रस्त्यांवर भटकत असतो
त्याचाही शोध तोच आहे जो माझा आहे...

- समीर गायकवाड

https://www.facebook.com/sameerbapu1/videos/524596562072041

Friday, 26 September 2025

पाण्यात वाहत आलेली स्वप्ने..



लोकहो पाण्यातून जरा लक्षपूर्वक चाला,
पुराच्या पाण्यासोबत गावाकडच्या
निष्पाप जिवांची अधुरी स्वप्नेही वाहत येताहेत,
मदतीच्या आशेने एखादे स्वप्न घट्ट बिलगेल तुमच्या पावलांना.
क्षणभर तरी, त्याला उराशी कवटाळून घ्या,
त्याचं सांत्वन करा, त्याच्याशी बोला
मग, तुमचं काळीज डोळ्यांतून वाहू लागेल!
 
- समीर गायकवाड

Tuesday, 24 September 2024

अर्थ बेगडी उत्सवाचे!



होती कुंद पावसाळी पहाट नि हवाही बऱ्यापैकी स्वच्छ
खिडकी बाहेर डोकावलं तर चेहरा ओळखीचा दिसला.
हा तर सेलिब्रिटींचा तारणहार, इकडे कसा काय आला?
"बाप्पा! अहो बाप्पा! इकडे पाहा!" हाक मारली त्याला!

म्लान होता चेहरा, नेत्रही सुकलेले; देहबोली नैराश्याची
"गर्दी संपली का मांडवातली?" प्रश्न ऐकता नजर झुकली
"आता नसतो मी त्या दरबारी, तिथे वसतो धनिकांचा 'राजा'
शोभिवंत मुर्ती नि उंची आरास, श्रीमंतांच्या पायी गालिचा
सच्च्या भक्तांवर जबरदस्ती, कुठवर पाहू हा भाव दुजा

दमलो आता, कानही किटले! वाटते, नको ती प्राणप्रतिष्ठा
तसाही नसतो मी या मांडवां, वाटते प्रयाण करावे कैलासा
मग स्मरतात सच्चे गणेशभक्त, उरलो त्यांच्या भक्तीपुरता
काय करावे सुचेना, उत्सवाआड बाजार मांडलाय नुसता
यासाठी का केला होता, अट्टाहास सार्वजनिक उत्सवाचा

लालबागसारखे मांडव कधीच सोडलेत, भटकतो वणवण
तुमच्या बालपणीचा बाप्पा कधीच हरवलाय, उरले स्मरण
निरागस किशोर होतो मीही नाचायचो, गायचो तुमच्यासवे
आता कोंडूनि मांडवांत सोबत हिडीस गाणी नि हैदोस नवे
जीव लागत नाही आता, रडू जुन्या आठवणींनी कोसळते

कुठे गेला तो उत्सव, कुठे गेले ते पावित्र्य? काय झाले त्यांचे
शांतताही नसते; स्तोम किती माजवले तुम्ही मिरवणुकांचे!
काय ते आविर्भाव नि किती तो आवाज, जीव गेले कैकांचे
माझीही वर्गवारी केलीत, नकोत फेटे मला खोट्या मानाचे
मन रमत नाही आता, वेध लागलेत मायबाप उमा महेशाचे

रजा घेण्या करिता, हितगुज करतोय जुन्या गणेशभक्तांशी
निघतो मी आता, तुमचे हे दोषभारित जग सांभाळा तुम्ही
असेन नित्य तुमच्या हृदयी, नि जळीस्थळी काष्टी पाषाणी
मात्र असेल अट एक, असेल ज्याला चाड नैतिक मूल्यांची
असेल किंमत सृष्टीची मानवतेची, राहीन तिथेही निवासी."

बोलून इतके तो गेला निघून, खांदे झुकवून संथ चालीने!
दमला असेल खूप तो, काय नसेल सोसले असेल त्याने
झाला असेल कितीदा खजिल, थिजला असेल घुसमटीने
गेली कैक वर्षे होता तगून, सच्च्या भावभक्तीच्या ओढीने
नुरली आता स्नेहार्द्रता, विटला असेल तो बाजारीकरणाने

सहनशक्तीचा त्याच्या न पाहावा अंत, आवतण अनर्थास!
सरली आस्था नुरली स्नेहर्द्रता, अर्थ काय बेगडी उत्सवास!

- समीर गायकवाड

Friday, 18 November 2022

तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!....

खरं तर, तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!
लोकांनी, माध्यमांनी मात्र तुझ्या मृत्यूचा बाजार हिरिरीने मांडलाय
तुझ्या नावाखाली हरेकास आपली पोळी भाजून घ्यायचीय
आपले विचार पुढे रेटायचेत,
असलेले, नसलेले 'इझम' खोल खोल रुजवायचेत
पहार ठोकावी तसे सर्वजण तुझ्या अवशेषांना अगदी खोल मेंदूच्या भुयारात ठोकत आहेत.

तू पुन्हा पुन्हा मिनिटाला हरेक वृत्तवाहिनीवर मरते आहेस
लोकांच्या सोशल मीडियामधल्या पोस्टमध्ये तुझ्या चिंधड्या उडताहेत
काहींनी तर तुझ्या मरणावरही मिम्स बनवलीत
तुझा मृत्यू हा आमच्या विचारधारा पसरवायचा इव्हेन्ट झालाय.

पोरी, तुला खूप दुःख होत असेल ना गं!
'त्याने' तुझे तुकडे केले तेंव्हाही तू इतकी व्यथित झाली नव्हतीस ना!
तुझा बाजार आणखी काही दिवस चालेल,
पुन्हा सारं विसरून सारे नव्या हाडाच्या प्रतिक्षेत राहतील
नवं हाडूक मिळताच तुला अगदी अलगदपणे स्मृतींच्या विजनवासात सोडतील.

तिथे असेल काळाकभिन्न अंधार आणि जीव गुदमरवून टाकणारा एकांत!
मात्र भिऊ नकोस बाळा, तू मोठी धीराची पोर आहेस!
कैक जण तुला नावं ठेवत असतील तरी त्याची पर्वा करू नकोस.

तुला पुन्हा लेकीचा जन्म घ्यावा वाटला तर माझ्या पोटी जन्म घे
तसेही तुझ्यासारख्या शोषितांचे आत्मे माझ्या मस्तकात, हृदयात तेवते आहेत
तेंव्हा पोरी माझ्या पोटी जन्माला ये आणि राहिलेलं आयुष्य मनसोक्त जगून घे!

- समीर गायकवाड

16/11/2022

@shraddha walker murder

Monday, 12 September 2022

जिभा काढून घेतल्यात त्यांनी..


जिभा काढून घेतल्यात त्यांनी आणि
मणकेही ताब्यात घेतलेत
तुम्ही वाकूनच राहायचं, बोलायचं नाही
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय
आता तुमच्यापाशी उरलेय तरी काय,
तर तुमचे असले नसलेले ईमान आणि निद्रिस्त विवेक!

Friday, 15 May 2020

ते ज्या रस्त्यावरून निघून गेले ...


रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं 
चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती.
त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा 
ते थकलेले जीव निद्राधीन झालेले…

त्यांचे डोळे तेंव्हा सताड उघडे नव्हते हे एका अर्थाने बरेच होते.
नाहीतर कालच्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलेलं
त्यांचं चंद्रमौळी घर,
फाटक्या साडीतली बायको,
डोईची चांदी झालेली आई,
दृष्टी अंधुक झालेला जन्मदाता आणि
आपला बाप येण्याच्या खुशीनं अर्धपोटी झोपलेली चिंधूडकी पोरंबाळं,
हे सगळं त्यांच्या डोळ्यात तरळलं असतं.
ते पाहून काहींनी अश्रू पुसले असते तर काहींनी उसासे सोडले असते...

Saturday, 9 May 2020

रुळाजवळ तुटून पडलेली बत्तीस पावलं ...


रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं

चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती.
त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा

ते थकलेले जीव निद्राधीन झालेले…


त्यांचे डोळे तेंव्हा सताड उघडे नव्हते हे एका अर्थाने बरेच होते.
नाहीतर कालच्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलेलं
त्यांचं चंद्रमौळी घर,
फाटक्या साडीतली बायको,
डोईची चांदी झालेली आई,
दृष्टी अंधुक झालेला जन्मदाता आणि
आपला बाप येण्याच्या खुशीनं अर्धपोटी झोपलेली चिंधूडकी पोरंबाळं,
हे सगळं त्यांच्या डोळ्यात तरळलं असतं.
ते पाहून काहींनी अश्रू पुसले असते तर काहींनी उसासे सोडले असते...

Wednesday, 8 May 2019

सुरुवात ...


अस्तित्वाच्या हुंकाराचे झेंडे अजूनही पाठमोरे आहेत,
दैन्याचे खंजीर अजूनही छातीत शिरण्या सज्ज आहेत.
स्वातंत्र्याच्या गप्पा आता शिळोप्याच्या झाल्या आहेत,
स्वप्नांच्या भाकडकथा अजून किती काळ ऐकायच्या आहेत ?
आश्वासनाची कल्हई लावलेले चेहरे झेंडे फडकवत राहतात.बुद्धीची झिलई उतरलेले लोक तरीही त्यांना भुलतच राहतात,
स्वातंत्र्योत्तर सात दशकात पाणी,रस्ते,वीजच ते देत आहेत.
सुरक्षा, शिक्षण, समानता अजून उंबरठ्याबाहेरच उभे आहेत,

डोंबारी ...



डोंबारी बालपणीचे खूळखुळे उम्रभर पायी बांधून
भविष्याला उलटे टांगून
भकाकणाऱ्या दर्पाच्या घासलेटी टेंभ्यानं आपल्या आयुष्याचे
धगधगते रिंगण करतो तेंव्हा
विजळलेल्या आंब्यासारखं तोंड
करून पब्लिक त्याला बघून टाळ्या पिटतं….

जिवाचं सरपण..



दूर आडरानी एक वस्तीचा ठाव,

तिथं काळजात बाभळीचा डाव

उगवे सूर्य, संगट पोटाचा सवाल

हाता फुटत पारंब्या लाखलाल


काटेरी जू माणसाच्या मानेवर,

जित्तेपणीचं जणू मुकं कलेवर

खपाटी पोट बरगड्या बाहेर  

डोळ्याची विहीर माथा सैरभैर


वारा खुनशी फिरे शेतशिवारातून,

काळ्या मातीस आधण आंतून

किडं करपल्या पानी चिटकून,

पाल फिरे कोरडया जात्यातून


खोपटा टांगलं नशीब छिललेलं,

जणू सुंद वटवाघळ झाडा लटकलं 

उन्हं तळपती संसार माथी मारून,

भूक शमते सरपण जिवाचं जाळून..  

द्रोहबाण



अजूनही कपटी द्रोणाचार्य फिरत असतात जागोजागी

ओठांवरती तेच फसवं स्मित अन काळजात विखार घेऊनि

खान्द्यावरती हात ठेवतात,

संस्कृतीचा नटवा शब्दच्छल करतात.

गरळ मेंदूतलं ओंजळीत रितं करतात.

भेदाभेद करत विद्रोहाचाच लक्ष्यभेद करतात.

वेश बदलूनी, मुखवटा लावूनी फिरतात.

पोटात शूळ अभद्र, हातात तुळ विषम

घेउनी ते न्याय हवा तसा करतात फिरतात...

एक काळ नक्की येईल

जेंव्हा भिल्लपुत्र नव्या युगाचा

प्रत्यंचेवर चढवून द्रोहबाण

घेईन वेध नवद्रोणांच्या मुखाचा...

 

- समीर गायकवाड.

 

नसती तहान तर ...



नसती तहान तर बरे झाले असते,
अष्टौप्रहर वणवण पायपीटेची थबकली असती.
निवडुंगे बोटाची झाली नसती
भार नसता वाहावा लागला बोडक्या मस्तकी हंडे कळशांचा.
दुधपीते तान्हुले घरी टाकून झोळीत
रणरणत्या भुईच्या वाळवंटी नसते लागले
माझ्या मायबहिणींचे अगतिक मेळे.

फुटवा



 

मी पेरतो मातीत माझेच बालपण, उगवते तण जातीचे जिथे
मी रुजवितो बीज माझेच मनोमन, दडपतो कंठ मातीचा जिथे....

मी पात्यात तग धरतो, पात्याचे होताच भाले कापतात जिथे
मी मुळात पुरूनि उरतो, मुळासकट देह कुस्करतात जिथे

मी मातीत एकरूप होतो, पुरतात देहाची लक्तरे मातीत जिथे
मी मरून पुन्हा उगवतो, देहास फुटतो विळा कोयता जिथे

मी शुष्क लाकूड होतो, खोवतात ज्याला कुऱ्हाडपाते जिथे
मी गोतास काळ होतो, शिरच्छेद करुनी नाचतात लोक जिथे

मी देह मातीत मिळवतो, वर्ण लिंग जात धर्माच्या कबरी जिथे
मी पेरतो आता मातीत जीवन, उगवती माणसं मातीतून जिथे!!

बनाव


धार शब्दांना माझ्या नाही, वेदनांचा त्यांच्याच हा हुंकार आहे,
लपवू कसे सत्य मी, उसना त्यांचाच हा शब्दसंभार आहे !
शृंगार त्यांचा पुरेसा नाही, गर्द वासनांचा हा काळोख आहे,
सजवू कसे दुःख मी, चिरडल्या कळ्यांचा हा बाजार आहे !
निर्वस्त्र रात्र सरतच नाही, फितूर नशीबाचा हा अंधार आहे,
फुलवू कसे निखारे मी, थिजल्या अश्रूंचाच हा समुद्र आहे !
मोल त्यांचे कळत नाही, त्यांच्याच अब्रूचा हा लिलाव आहे,
वेचू कशा या राशी मी, भंगल्या स्वप्नांचा हा बनाव आहे !!

- समीर गायकवाड.  

महापुरुषांची दुकाने

एकदा महापुरुष आणि धर्मपुरुष रिंगण करून बसले.
धर्मपुरुष तांवातावात पुढे येऊन म्हणाले, 'आता पुरे झाले !
अजून पोसायचे तरी किती ? आपसांत वाटून टाकलेले बरे !'
महापुरुष वाकल्या मानांनी खजिल चेहऱ्याने मुकाट बसले.
मराठ्यांनी शिवरायांना छातीशी कवटाळले.
ब्राम्हण पुढे झाले, त्यांनी रामदासांना थोपटले.
तर महारांनी बाबासाहेबांना आलिंगन दिले.
अण्णाभाऊ साठे मातंगांच्या गळा मिठी पडले.
अहल्यादेवींची धनगरांनी तिथेच पूजन केले.
तर माळी ज्योतीबांच्या पुढ्यात जाऊन बसले.
नाभिकांनी शिवा काशिदास गच्च मिठी मारली.
चर्मकारांनी रोहिदासांना आपल्या कह्यात केले.
राजपुतांनी राणा प्रतापांना वेढ्यात कैद केले.
गाडगेबाबांचा ताबा घेण्यास परीट पुढे झाले.
चित्पावनांनी टिळकांना गळाला लावले.
गांधीजींसाठी मात्र कोणी पुढे नाहीच आले.  
असं करत करत काही मिनिटात महापुरुषांची वाटणी सफलसंपूर्ण झाली.

आता धर्मपुरुषांची वाटणी सुरु झाली,
एकामागून एक धर्मपुरुषांची रांग तिथे लागली,
अखेरचा धर्मपुरुष आला तरी त्याचीही बोली नाही लागली.
एकमेका जवळ घेण्यास सर्वच धर्मपुरुषाची पावले अडखळली.
दिवस कलायला आला तरी त्यांना नव्हता कुणी वाली.
शेवटी सारे महापुरुष एक झाले अन त्यांनी त्या धर्मपुरुषांना माणुसकीची 'दिक्षा' दिली !

आता सारे धर्मपुरुष एकत्र राहतात, मात्र महापुरुष तिथून निघून गेलेत कायमचे, न परतण्याच्या अटीवर !
महापुरुषांच्या पश्चात राज्यकर्त्यांनी मात्र त्यांची दुकाने आता लावली आहेत, गल्लोगल्लीच्या नाक्यावर !!

सावित्रीच्या लेकी ..



भल्या पहाटेच उठून आईला कामात मदत करणाऱ्या या मुलीच असतात,
चूल पेटवण्या पासून ते पाण्याचे आधण ठेवणाऱ्या त्याच असतात,
एकीकडे उतू जाणाऱ्या दुधाकडे लक्ष देत वेणीफणी करत असतात,
आजीने मारलेल्या हाकेला ओ देत आजोबांच्या हाती पानाची चंची सरकवत असतात,
कुंकवाचा करंडा आईच्या पुढ्यात ठेवून अंगण लख्ख झाडून घेत असतात,
सकाळीच आलेला बिगारी कामाचा निरोप वडिलाना सांगताना लहान भावाला जागं करत असतात,
शेजारच्या घरून दुधाची एखादी लोटी उसनी आणताना तिथलेही काम हलके करत असतात.

मला जगायचे आहे ....



मला जगायचे आहे, आई गं ! आई गं SSS !
पंखमिटल्या कळ्यांचे हे बोल कुणी कळवा
आईच्या गर्भातली कैफियत तुम्ही आळवा
लेकींच्या जन्माची ही करुणकथा अनुभवा...
मला जगायचे आहे, आई गं ! आई गं SSS !!..

आईच्या कुशीमध्ये निजायचे आहे,
आजीच्या गोष्टीतही रमायचे आहे..
बाबांच्या मांडीवरती झोपायचे आहे
दादाच्या गालांनाही चुंबायचे आहे.

मला जगायचे आहे, आई गं !! आई गं SSS !!
शाळेतल्या फळयावरती लिहायचे आहे
मैत्रिणींच्या जगामध्ये घुमायचे आहे.
आरशामध्ये पाहुनी नटायचे आहे,
स्पर्धेच्या जगात सिद्ध व्हायचे आहे

मला जगायचे आहे आई गं ! आई गं SSS !!
श्वास माझा अवचित असा, नका हो थांबवू
देहाच्या माझ्या चिंधडया नका हो उडवू !
तुमच्या काळजातुनी मला, नका हो हटवू
मी लेक तुमची रक्ताची, मला नका हो मारू !

मला नका हो मारू मला नका हो मारू SSS !
मला जगायचे आहे आई गं ! आई गं SSS!!

- समीर गायकवाड.

(आईच्या गर्भात खुडल्या गेलेल्या अभागी कळ्यांच्या अधुरया श्वासांना समर्पित..)

Tuesday, 7 May 2019

माण्साने ....

माण्साच्या शाळेतल्या प्रतिज्ञा खोट्या असतात,
'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं नुसतंच म्हणायचं असतं
पण माण्साने तसं वागायचं नसतं.
माण्साने हिंदू व्हावं, मुसलमान व्हावं,
बौद्ध व्हावं, ख्रिश्चनही व्हावं पण भारतीय होऊ नये.
हिंदूंनी मुसलमानांचा द्वेष करावा आणि मुसलमानांनी हिंदूंचा द्वेष करावा.
बौद्धांनी ख्रिश्चनांचा आणि ख्रिश्चनांनी बौद्धांचा,
उरलेल्या धर्मवाद्यांनीही एकमेकाचा मत्सर करावा.
माण्साने आपली जात गोंजारावी, दुसऱ्याच्या जातीचा दुस्वास करावा.
मराठयांनी महारांचा, महारांनी मराठयांचा द्वेष करावा
या चालीवर सर्व जातीपातींनी मत्सर जोपासावा.
काही बुद्धीभेदयांनी या निखाऱ्यांना कायम पेटते ठेवावे,
पातळ भावनांचे सडके गटार तुंबवावे,
प्रक्षोभक गरळ ओकणारया निर्बुद्ध बैलांना पुढे करत आपण मात्र पडद्याआड राहावे,
सारी पेटवापेटवी करून जपमाळ ओढत नामानिराळे राहावे.

Wednesday, 24 April 2019

जायबंदी हरणाची कविता



तलम त्वचेवर व्रण पडावेत तशी माळरानात पालं पडतात ..
आभाळाला भळभळून खोक पडल्यागत
मातीच्या छातीवर चुलवणं उभी ठाकतात.
खुरपल्या हातांनी घट्ट मरणमेखा ठोकल्यावरही
कधी पालं टिकतात आदिम चिवट मुळांगत, तर कधी
वर्णभेदी वादळाच्या विकट तडाख्यात उन्मळून पडतात!
रणरणत्या दिर्घउन्हांत
जायबंदी हरणासारखी पालं दिवसभर बसून कण्हत असतात.

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...