Monday, 15 June 2026

लिलीची फुलं..




निघताना त्याने विचारलं, 'आता पुन्हा कधी भेट होईल की नाही ठाऊक नाही,
अखेरची गळाभेट तरी घेशील की नाही?'

इतका वेळ खाली नजर खिळवून असलेली ती, 
त्याच्या या सवालाने भानावर आली

आलिंगन देण्यास तिने नकार दिला.
गहिऱ्या आवाजात त्याने पुन्हा एकदा विनंती केली, 
अखेरच्या मिठीसाठी!'

आता जर मिठी मारली नाही तर 
हा क्षण पुन्हा येणार नाही 
आणि हा सल मनात राहून जाईल,' तो म्हणाला.

डबडबलेल्या डोळ्यांनी नकार देत ती उत्तरली, 
"निरोप घेताना सगळं मनासारखं झालं तर 
तो निरोप कधीच लक्षात राहणार नाही, 
मनात काही सल राहिला तर तो क्षण अखेरपर्यंत सोबत राहील.. 
येते मी.." 

ती निघून गेली त्या दिशेने तो पाहत राहिला

तिचा आकार ठिपक्याएव्हढा झाला, 
अंधार डोळ्यांत उतरला तेव्हा तोही निघाला. 

त्या नंतर अनेक वर्षे तो अधून मधून त्या ठिकाणी यायचा. 
शून्यात नजर लावून बसायचा.

अलीकडील काही महिन्यात तो दिसला नाही. 
तिथे आता लिलीची सफेद फुलं मोठ्या प्रमाणात उगवली आहेत. 

तिच्या कॉफीनवरतीही तशीच फुलं होती..

- समीर गायकवाड

लिलीची फुलं..

निघताना त्याने विचारलं, 'आता पुन्हा कधी भेट होईल की नाही ठाऊक नाही, अखेरची गळाभेट तरी घेशील की नाही?' इतका वेळ खाली नजर खिळवून असले...