Showing posts with label आई. Show all posts
Showing posts with label आई. Show all posts

Sunday, 10 May 2020

आईचे सायमाखले हात..

कैकदा खोटं बोललोय आईला.
'मी जेवलोय' असं सांगितल्याशिवाय ती जेवायचीच नाही
मात्र पहिला घास तिच्या ओठावर येण्याआधीच 
ती डोळ्यात रोखून बघायची,
तिथून थेट काळजात उतरायची!
'बापू तू मला फसवू शकत नाहीस' असं म्हणत 
डोक्यावरून हात फिरवत तोच घास भरवायची
माझं जेवण होईपर्यंत समाधानाने पाहत राहायची
मग कुठे, ती जेवायची.

आता अमृताचे घास आहेत पण ती चव नाही,
कारण आता आई देहरुपाने नाही.
मात्र ती वाहते डोळ्यांच्या कडांतून
ती अजूनही तेवते 
देव्हाऱ्यातल्या निरंजनातून..
खिडकीतून येणारा अवखळ वारा 
तिचा गंध घेऊन येतो.
परसातल्या जाईच्या वेलीत ती दरवळते
प्राजक्ताचा सडा होऊन ती अंगणात बरसते
वृंदावनातल्या तुळशींच्या मंजुळेत ती झंकारते
आई नाही अशी कुठली जागा नाही,
ती माझ्या रोमरोमात वसते
रोज रात्री निजताना 
श्वासात माझ्या पाझरते
डोळे मिटताच प्रकटते.
भाळावरुनी हात फिरवते 
तिच्या सायमाखल्या हातांची पुन्हा पुन्हा अनुभूती येते...

- समीर गायकवाड.  







Friday, 31 May 2019

हवीहवीशी भेट...


पहाटेस दूर नदी किनाऱ्यावरून वाहत येणारा
तिचा गंध मला ओढून नेतो.
पाण्याने तासलेले दगड
वाटेतल्या दऱ्यांमधले कातळलेले पत्थर
किनाऱ्यावरची हिरवी शेते
रंगीबेरंगी फुलं पार करून
त्याच्यासोबत तळाशी खेचून नेतो.

तिथे ‘ती’ रोजच माझी प्रतिक्षा करत असते
मला पाहून तिच्या चेहऱ्यावर
प्रसन्नतेची कारंजी फुलतात!
तिच्या देहाला लगटून मी खोलवर फिरत राहतो.
तिच्या बालपणीची खेळणी,
तिच्या संग्राह्य वस्तू ती आनंदाने दाखवत राहते
किशोरवयात दुरावलेल्या
आई वडिलांच्या तसबिरी दाखवताना ती हळवी होते.
कळत्या वयाआधी वाट्यास आलेल्या
पहाडकष्टांची कथा ऐकवते
नियतीने घेतलेले दंशविखार दाखवते.
तिच्या तारुण्यातली पंख विस्कटलेली फुलपाखरं
पाहताना जीव उस्मरून जातो
फुटलेल्या स्वप्नांच्या तडे गेलेल्या फ्रेम्स दाखवताना
तिच्या डोळ्यात चमक येते.
तिच्याकडे काही फोटोही आहेत
तिच्या लग्नाचे, नानाविध घटनांचे...

श्वेतधवल फोटोंचा जुना अल्बम दाखवताना
ती हरखून जाते.
लग्नानंतरच्या, संसाराच्या निष्ठुर आठवणी
तिच्या डोळ्यातून नकळत वाहत राहतात
मुलं वाढवताना झालेली उपासमार,
इच्छांचा कोंडमारा त्यातून स्त्रवत जातो.
तिचं सगळं विश्व दाखवताना ती हरखून गेलेली असते
आयुष्य संपून अखेरीस रिते राहिलेले तिचे हात
आता मला दिवसागणिक अधिकच मखमली वाटतो
तिच्या स्नेहार्द्र मुलायम कायेचा स्पर्श
जो माझी जगण्याची लढाई सुखद करतो..

तिच्यासोबतचे हे जादुई क्षण मी रोज जगतो
दूर पाण्याखाली असताना
तिच्या गर्भात असल्याची पुनरानुभुती घेतो..
ती इहलोकातून गेल्यापासून
त्या नदीचं पात्र कोरडं पडलंय
पण तरीदेखील रोज पहाटे येणारा
तिचा हवाहवासा परिमळ
मला खेचून पुन्हा पुन्हा तिथेच नेतो.
तेव्हा मात्र त्याच नदीचं पात्र
पाण्याने काठोकाठ भरलेलं असतं
ते पाणी तिच्या अश्रूंच्या थेंबातून पाझरलेलं असतं

आईशी माझी रोज अशीच भेट होत असते,
जी माझी उमेद बनून राहते...

(ब्रूस स्पिरिंग्टनच्या ‘द रिव्हर’ कवितेवरून सुचलेली रचना)

Wednesday, 8 May 2019

सर्गातली माय ..



करडू लोचते कासेला
पिलू मायवेडे बघे वाकुनी

धार लागे आचळाला
व्हट इवलूशे जाती सुकूनी

भूक लागे पिलाला
धुंडाळे माईला चित बावरुनी

पाणी येई डोल्याला
सर्गात माय रडे धाय मोकलुनी

पान्हा फुटे छातीला
कान्हा माझा जाई भूकेजूनी !

- समीर गायकवाड.

अंधार...

लामणदिवे, कंदील, चिमणी, पणती 
सगळं भंगार त्याने काही दिवसांपूर्वीच टाकून दिलंय
भव्य एलईडीने आता त्याचे घर सजलेय
दिवाणखाना तर प्रेक्षणीय झालाय
उंची सोफा अन् मखमली जाजम
तलम पडदे, देखणी रंगसंगती
किंमती साजोसामान सारं कसं आखीव रेखीव!

प्रशस्त किचन आहे, ऐसपैस बेडरूम्स आहेत
हॉस्टेलवर गेलेल्या एकुलत्या मुलाची
चिल्ड्रनरूमही मस्त ठेवलीय.
बाल्कनीत लालपिवळ्या नाजूक फुलांची रोपे आहेत
सज्जे, जिने पेंटींग्जने डवरलेत
गुळगुळीत मार्बल्समध्ये लख्ख प्रतिबिंब दिसतं
अंगणातल्या लॉनमध्ये छोटासा झुला आहे
मोकळाच असतो तो!

कंपाउंड वॉलला हिरव्यापिवळ्या वेली लगटून आहेत.
बंद पडलेली जुनी मोटारसायकल
मागे आऊटहाऊसपाशी धूळ खात पडूनय
आऊटहाऊसमधल्या अडगळीच्या खोलीत
जुन्या ट्रंकेत आईवडिलांच्या तसबिरीही आहेत.
काही महिन्यांपूर्वी त्यांची एकापाठोपाठ एक एक्झिट
याच खोलीतून झालेली!

ते जुनाट लामणदिवे
तो काच तडकलेला कंदील
ती वात नसलेली चिमणी
ती टवके उडालेली पणती
ते सगळं त्यांचंच होतं.
अंतःकरणापासून जपून ठेवलेलं ;
आयुष्यभर ती ज्योती झालेली अन् ते वात होऊन जळलेले
मुलाच्या आयुष्यात भव्य प्रकाशाची उजळण त्यांनी केली होती.
त्यांचं निर्वाण झालं तेव्हा आऊटहाऊस मध्ये घनगर्द अंधार होता, घोर अंधार होता...

देहाचे सरपण...

जळण गोळा करताना

मायच्या देहाचेच झाले सरपण.

डोई चढलेला भार मोळीचा वाहताना

तिच्या पायाला यायचा बाभळीचा बहर.

मायची पाऊले चालली तरच चूल चालायची 

पोरांच्या रित्या पोटापायी जंगलवाटेची हुल लागायची

माय रातंदीस कामाला जुपून राही, जणू घाण्याचा बैल 

घरादाराच्या सावलीसाठी, काठी झाली मायच्या देहाची. 

माय उपाशी भुकेलीच निजे, चिंधूडके धडूते नेसून गावभर फिरायची

किस्नाच्या यादीत नाव तिचेच कसे नव्हते हा सवाल आजही काळीज पोखरतो

माय तोंडावरून हात फिरवायची तेंव्हा उरी गायचे सहस्र रावे.

रात होताच तिच्या डोळा यायचे पाणी नि स्वप्ना यायचा जंगलातला देव अनवाणी 


एके दिवशी,

प्रारब्धाने जंगलातले झाड खुडून मायच्या डोईत रोवले

मायच्या जिंदगानीचे झाली हजार शकले !

आता घरात चूल नाही आणि भुकेचे ही वांदे नाहीत

आणि हो, माय गेल्यापासून जंगल गेलंय जळूनी

बोडखी निष्पर्ण झाडे उरलीत, त्यांच्या स्वप्नात येत असेल का माझी माय ?            


- समीर गायकवाड.

समिधा..



गर्भात तुझ्या मी होतो, तुझी ती पहिली ओळख होती.
तेंव्हा तू मला पाहिलंही नव्हतंस की स्पर्शही नव्हता केलास
पण तू देहातलाच एक समजत गेलीस, अगदी नितळपणे जोपासत गेलीस.
रक्तामांसावर पोसलंस, एके दिवशी मरणप्राय यातनांना हरवून मला जन्म दिलास.
तुझ्या नाळेतून माझ्या देहात चैतन्याचे अगणित हुंकार भरलेस, श्वास बहाल केलेस.
तुझ्या दुधावर वाढणारा, तुझं बोट पकडून चालणारा मी
एके दिवशी शरीराने तुझ्याहून उंच होत तुझ्यापासून विलग झालो !

मायचा हिशोब



हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून,
सुकलेले आभाळ बघे चेहरा, तिच्या हंडयामधी वाकून
काटकुळ्या तिच्या पायाला पडती भेगा, रानोमाळ भटकून
माती पुसे तिच्या पायाला, कशाले जन्मलीस बाईल होऊन ?

हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून,
डोळा घेऊन पाणी माय म्हणे देवाला, काय गुन्हा झाला ?
जे मनुक्षाला तू असा, शाप तहानेचा घनघोर दिला.
खोल मातीत बुडाले पाणी, त्याचा जीव की घनव्याकुळला

हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून,
उठे झोपेत दचकून म्हणे, येईल कधी पाणी गळा भरून
माय सदानक्दा करे पाणी, बा टिपे डोळे तिच्याकडे बघून
हंडयातल्या तळाशी रडे पांडुरंग, डोळे मिटत हमसून हमसून !

हंडे वाहून रातदिन डोईवर, मायचा खांदा येई भरून
मायला उन्हात चालताना बघून, बांध जाई आतच खचून
उनाड पाखरे पानाआड लपवत चेहरे, मायच्या डोळा बघून
तिच्या देहाच्या कानाकोपऱ्यात, घाम येई अल्गद गहिवरून


झाडे तोडतसे दुनिया, अन शिक्षा काहून माझ्या मायेला
उफराटा रे न्याय,
कसा फुटेना पाझर तुझ्या काळजाला
सांगून ठेवतो तुला, मायेचा शाप लागंल अख्ख्या जगाला
अंती हाडाकाडांच्या हिशोबी तिच्या, रडून काय उपयोग तुला !!

- समीर गायकवाड

पाऊस आईच्या डोळ्यातला ..



वडील गेल्यापासून आईच्या डोळ्यात रोजच वेळी अवेळी पाऊस कोसळतो.
परसदाराच्या डाव्या बाजूच्या खोलीतच आई शांत बसून असते... 
आईं आता ऐंशी पार करून गेलीय
इतके वर्षे ताठ कण्याने जगलेली ती आता काहीशी वाकलीय.  

दिवसभरात ती अस्ताव्यस्त वस्तू नीटनेटक्या ठेवते पण
वडिलांच्या कपाटाचे दार कायम किलकिले उघडे ठेवते
आवडीचं काही वाचत बसते, अधून मधून टीव्हीही बघते..
नकळत एकांतात छताकडे टक लावून बसते
बसल्या बसल्या सुनेला कामात मदत करते
मन रिते राहू नये म्हणून हात गुंतवून ठेवते.

आई



भेटताच परिचयाची माणसे कुठेही, म्हणायची मला की, 'बदललोय मी खूप' !
मात्र 'माझा बापू आहे तसाच आहे' असं म्हणत कुरवाळणारी ती आईच होती.
गुजगोष्टीत सांगितलं काहींनी की, 'विशालकाय वृक्ष जणू झालोय आता मी',
मात्र पानाफुलातही माझ्या, बीज आपलं दृष्टीस पडलं जिच्या ती आईच होती.
उज्वल ध्येयापर्यंतचा प्रवास माझा सोनेरी, नजरेत सर्वांच्या आता तरळतो आहे,
मात्र रुतलेले काटे कुटे पायातले माझ्या, दिसले जिला ती फक्त आईच होती.

माय ....


माय करता सैपाक चूल जळे पोटातुनी
धूर जाई चिपाडात रडे आभाळ बिल्गुनी
माय कापे पाचरूट झाके डोळा विळीचा
छिलता मायेची बोटे रक्त पात्यात येई
होता मायचा स्पर्श काटा येई भिंतीला
माय बसता चुलीपुढं, मातीलाही येई कढ
रित्या कढईत माय देई उकळी नशिबाला
कुठं बस्ला दडून जाग का रे येईना तुला
मायच्या तुलनेत देवा तू रे वाटतो खुजा

- समीर गायकवाड.

अंगाई



झुले चिंचेखाली झोळीनिजे आनंदे सानुली

रुणुझुणू गाई वाराफुले नाजूक डोलती शिवारा


दंगता कृष्णमेघ सावळेबिलोरी नभ भोवळे

सावल्यांचे उंच हिंदोळे, जाती भुरळूनि डोळे


डुले पानांची अल्वार नक्षीझिंगूनि जाय पक्षी

गिरकी घेऊनि पान आल्हादझेप झोळीमधे घेई


छाती बुंध्याची येई फुलून, झाड जाई हरखून !

पाहे पांडुरंग कौतुके फांद्यांतूनी चित्त दंग होऊनी


दिस वैरी येता डोईवरीछकुली भुके होई बावरी     

माय अर्धपोटी गाई अंगाईबाळासंगे शिवार झोपी जाई...

Tuesday, 7 May 2019

माऊली ..


दिवस उतरत जाताना सांजेला तुझ्या डोळ्यामधे
मंद तेवलेले असतात त्या निर्मिकाचे लामणदिवे.

देहाच्या गाभाऱ्यातला प्रकाश चेहऱ्यावर जत्रा मांडतो.
भाळावर लिहिलेली काबाडकष्टाची गाथा वाचण्यास
होऊनी उतावीळ राधेकृष्णाचा गजर आसमंती करतो.
संध्येचा चंद्र तुझ्या रुपेरी केसांतल्या चांदीत झिरपतो,
तुळशीच्या पानाआडचा वारा घरभर फिरून दमतो.

सुरकुत्यांत मी शोधतो हरवल्या आनंदाचा पारा,
भेगाळल्या ओठांनी तू पुटपुटतेस, आशीर्वाद लेकराला
देवादिकाहून देतेस अधिक, पाठी हात ठेवूनी थरथरता
मी हात तुझा उरी कवटाळत स्मरतो परमेश्वरा
आयुष्य माझे लागू दे रे माझ्या माय माऊलीला!

- समीर गायकवाड 

Tuesday, 22 January 2019

नभाच्या गर्भात

कोलाहल दूरवर उठवळ उन्हांचा
गायीच्या डोळ्यातले बेट साकळे मनात
पान्हा आटता नदीच्या स्वप्नांचा
रत्नजडीत पिसारे मोरांचे कुढती वनात
तूझे सुतोवाच करतो रव उल्कांचा
झुरतो पाऊस उष्म नभाच्या गर्भात...

अन्वयार्थ –

या कवितेत 'उठवळ उन्हे' हे प्रतिक आहे जगातील अघोरी लोकांचे जे इतरांच्या भावविश्वात डोकावून त्याचे जगणे हराम करून जातात. अशा वेळी दुःखांचे कढ नकळत मनात साठत जातात. नवा उन्मेष, सृजनता सगळं काही बेचिराख होऊन जातं जणू काही नदीचा पान्हा आटावा अन तिचे पात्र कायमचे कोरडे पडावे तसे मन शुष्क होऊन जाते ! प्रतिभेचे पंख झडून पडतात आणि मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेऊ लागते, जे कधीच हाती लागत नाही त्यासाठी कुढत राहते. अशा वेळी जन्ममृत्यूचे प्रतिक असणारी उल्का जगण्याचा नवा संदेश घेऊन येते. उष्म मेघांच्या गर्भात रोज नव्याने निजताना प्रतिभाशक्तीला नित्य नवे धुमारे फुटू लागतात पण व्यक्त होता येत नाही की मनसोक्त कोसळता येत नाही म्हणून केवळ झुरणे उरते! अशा अर्थाची ही कविता.

- समीर गायकवाड

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...