Wednesday, 8 May 2019

अंधार...

लामणदिवे, कंदील, चिमणी,
पणती सगळं त्याने टाकून दिलंय.
भव्य एलईडीने आता त्याचे घर सजले आहे.
दिवाणखाना तर प्रेक्षणीय झालाय,
उंची सोफा अन मखमली जाजम.
तलम पडदे, देखणी रंगसंगती,
किंमती साजोसामान सारं कसं आखीव रेखीव.
प्रशस्त किचन आहे, ऐसपैस बेडरूम्स आहेत.
हॉस्टेलवर गेलेल्या एकुलत्या मुलाची
चिल्ड्रनरूमही मस्त ठेवली आहे.
बाल्कनीत लाल पिवळ्या फुलांची नाजूक रोपे आहेत,
सज्जे, जिने पेंटींग्जने डवरले आहेत.
गुळगुळीत मार्बल्समध्ये लख्ख प्रतिबिंब दिसतं.
अंगणातल्या लॉनमध्ये छोटासा झुला आहे,
मोकळाच असतो तो.
कंपाउंड वॉलला हिरव्यापिवळ्या वेली लगटून आहेत.
बंद पडलेली जुनी मोटारसायकल
मागे आऊटहाऊसपाशी धूळ खात पडून आहे.
आऊटहाऊसमधल्या अडगळीच्या खोलीत
जुन्या ट्रंकेत आईवडिलांच्या तसबिरीही आहेत.
काही महिन्यापूर्वी त्यांची एकापाठोपाठ एक एक्झिट
याच खोलीतून झालेली.

ते जुनाट लामणदिवे,
तो काच तडकलेला कंदील,
ती वात नसलेली चिमणी,
ती टवके उडालेली पणती
ते सगळं त्यांचंच होतं.
अंतःकरणापासून जपून ठेवलेलं ;
ती तेल व्हायची अन ते वात होऊन जायचे,
मुलाच्या आयुष्यात त्यांनी खूप प्रकाशाची खूप उजळण केली होती.

ते गेले तेंव्हा आऊटहाऊस मध्ये अंधार होता...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...