पैंजणसाज गीतांना चढवताना रागदारीस नकळत भुलवशील,
पण चुरगळून पडलेल्या मोगरयास कसे हाताळशील ?
पानात अडकलेल्या गंधवेणा वाऱ्याच्या अल्वार सोडवशील,
पण उधळून विखरलेल्या परागकणांना कसे आवरशील ?
डोहात रुतलेल्या चांदणचकव्यास हलकेच विरघळवशील,
पण डोळ्यात उतरलेल्या धुंदचांदण्याचे काय करशील ?
मेघांत अडकलेली स्वप्नांची किरणे अलगद सोडवशील,
पण दिल्या घेतल्या आणाभाकांचे प्रतिबिंब कसे पुसशील ?
गद्दार वचनांना सुक्तात गुंफताना भावार्थाची फोडणी देशील,
पण शब्दांनी केलेल्या फंदफितूरीला कसे लपवशील ?
कत्लेआम करताना घातकी सुरयांना सहज धार लावशील,
पण चिंधडया उडालेल्या काळजाची विल्हेवाट कशी लावशील ?
विकताना शपथांना साज इमानदारीचे हळूच चढवशील,
पण अखेरचा हिशोब करताना कुटील उत्तर काय देशील ?
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment