करपलेली का असेना पण भाकरी हेच जिथे प्रेम असते
कासावीस भुकेची आतडी तिथे दीनवाणी हसत असतात
थकल्या जिवा घेरी येऊनही सुखाचं गाणं गात राहतात
खोल पोटात निजतं उपाशी काळीज गच्च पाय दुमडून
तिथं स्त्रवणारी कळ मेंदूतल्या भुकेच्या भावनांना टोकरते
अंधाराचे पहारेकरी उजेडीही असतात सोबतीला
चंद्रमौळी छतास चंद्रसूर्य असतात उलटे टांगलेले
छिलून टाकते भूक रक्ताच्या लालगुलाबी पाकळ्यांना
मौन होतात ओठी असणाऱ्या वेदनेचे धगधगते अंगार
काळ दाराशी तेव्हा फाटकी झोळी घेऊन उभा असतो…
सुकलेले ओठ कसे बरे गातील जीवघेणे मिठ्ठास तराणे
पसाभर ओंजळीवर जिथे चूल विसंबते, तिथे कुठचे गाणे
जगण्याची चाले लढाई तिथे वसती प्रेमाची कब्रस्ताने
वासनेच्या चिखलात उमललेली निष्पाप म्लान फुले
हाच काय तो प्रेमाचा विकारी स्पर्श,
दंशाने त्याच्या देहाचा कापूर अलगद उडत जातो …
जिथे भूक हेच अंतिम सत्य असते तिथे प्रेमाचे फक्त कलेवर असते..

No comments:
Post a Comment