
पाऊस यावा म्हणून तुम्ही
जितक्या प्रार्थना करताय त्याहून
कैक आर्जवे मी गेल्या काही वर्षापासून
करतोय, माझ्या जीर्ण मोडक्या शुष्क निष्पर्ण
फांद्या कित्येक दिवसांपासून आभाळाकडे आशाळभूत
होऊन नजरा खिळवून विमनस्क उभ्या आहेत, त्यांच्यातले
बळ आता संपुष्ट होऊ लागलंय, किड लागलेल्या खोडातनं आता
किड - वाळवी सुद्धा चोरपावलाने माझ्या नकळत कधीच निघून गेलीय
उजाड शेंड्यावर ना कुणी येतं ना एखादं कोवळं लुसलुशीत पान हळूच उगवतं
ना घरट्याच्या काड्या राहिल्यात ना पाखरांचा चिवचिवाट ना पाने ना फुलांचा वास
आजकाल वारा देखील जवळ येत नाही ; मी उन्मळलो तर त्याच्या माथ्यावर खापर येईल
याची त्याला भीती असावी, शोभिवंत मरणाचे संभावित लक्ष्य म्हणून लोक मला पाहतात
सावली जरी पडत नसली तरी माझे जन्माचे साथीदार खिल्लार जवळ बसतात माझे
क्षेमकुशल विचारतात ओलेत्या डोळ्याने खालच्या मानेने जन्माची चित्तरकथा ऐकतात,
गहिवरतात तेव्हा कडब्याच्या गंजीवर बसलेले वेडे राघू सुद्धा समाधिस्त होत वदतात
'नच येते चिटपाखरू देहावरी तुझ्या तरी साथ आमुचि अंतःश्वासातो राहील”
बळ देतात; कधी काळी माझ्या बहरलेल्या फांद्यावर जन्मलेले, पहिल्यांदा
पंखात श्वास भरलेले सगळे स्नेही आसमंतातून चक्कर टाकतात अन्
हवेतूनच माझी ख्यालीखुशाली जाणून घेतात; ऐन बहराच्या मोसमात
डेरेदार सावलीमध्ये मातीवर पाना पानातून डोकावणारे टोळ हळूच
बैलांच्या शिंगावर येऊन बसतात आणि शांतपणे माझे दुःख ऐकतात,
माझा बळीराजा देखील कधीकधी जवळ बसतो, पाठ टेकवतो,
दोन शब्द बोलतो तेव्हा खरे सांगू का, मन अधिकच हलकं होतं!
तेलवंगणाने तयार निर्जीव बैलगाडीही आजकाल दुःखी असते
माझ्या पडझडीनंतरचे ओंडक्यांचे ओझे तिच्यावरच असेल
हा तर कृतघ्नतेचा कळस होईल असं तिला वाटत राहतं,
सर्वांचं हे दुःख आता बघवत नाही म्हणून मी
पावसाची वाट बघत असा रात्रंदिन दीनवाणा
सज्ज उभा आहे. मला खात्री आहे, जेव्हा
पाऊस येईल तेव्हा त्याच्या संगतीने
कडाडणारी सौदामिनीही येईल
आर्त मिठीच्या कल्लोळात
माझी सुटका करेल
याची हमी आहे
पण,
मातीत खोल रुजलेली मुळे मात्र अजूनही आशावादी आहेत,
अफाट ताकदीनिशी तग धरून आहेत,
कदाचित तो इथल्या मातीचाच गुणधर्म आहे
जो माझ्या मुळ्यांच्या रोमारोमात भिनला असावा ....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment