Monday, 2 December 2024

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!


अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर
एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन !
मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्या दोन जास्वंदी
मॉलपाशी हसत होत्या लडिवाळ शेवंत्या
कॅफेबाहेर फुलत होत्या गुलबक्षीच्या कळ्या
होस्टेलसमोरच्या गार्डनमध्ये झुलत होते कळीदार गुच्छ
एका लयीत जात होत्या पाठीवर सॅक लावलेल्या निशिगंधाच्या जुड्या
गच्चभरल्या सिटीबसच्या खिडकीतल्या जाईजुईचा तजेला हवेत होता भरून
लायब्ररीच्या पार्किंगमधल्या गुलाब कळ्यांना पेलवत नव्हतं पुस्तकांचं ओझं
ज्युबिली हॉलच्या इनर सेक्शनमध्ये दरवळत होता गंधवेड्या मोगऱ्यांचा जत्था
रस्त्याच्या कडेने आईबाबांसह घुमत होती काही सोनकुसुमं आणि सोनकळ्या....

निर्भया, असिफा, ट्विंकल आणि कालपरवाची प्रियंका
अशी लाखो फुलं अकाली चुरगाळली गेली तरी
माझ्या शहरातल्या फुलांनी बहरणं सोडलं नाही, ती अखंड फुलताहेत,
या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे! 🌺🌸🌼🌹🪻🌷

या फुलांनी फुलतच राहावं, अखिल चराचराने यांना जपावं!🌿🍂
हे प्रसन्न तजेलदार ताटवे पाहून सकलांचा अमलताश व्हावा..

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...