Friday 15 May 2020

ते ज्या रस्त्यावरून निघून गेले ...


रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं 
चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती.
त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा 
ते थकलेले जीव निद्राधीन झालेले…

त्यांचे डोळे तेंव्हा सताड उघडे नव्हते हे एका अर्थाने बरेच होते.
नाहीतर कालच्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलेलं
त्यांचं चंद्रमौळी घर,
फाटक्या साडीतली बायको,
डोईची चांदी झालेली आई,
दृष्टी अंधुक झालेला जन्मदाता आणि
आपला बाप येण्याच्या खुशीनं अर्धपोटी झोपलेली चिंधूडकी पोरंबाळं,
हे सगळं त्यांच्या डोळ्यात तरळलं असतं.
ते पाहून काहींनी अश्रू पुसले असते तर काहींनी उसासे सोडले असते...

त्यांच्या कलेवराशेजारी सापडलेल्या भाकऱ्यांवर
श्रमिकांचं भूकसूक्त कोरलेलं होतं.
ते वाचता येणाऱ्या माणसाचा शोध जारी आहे...
तोवर त्या बत्तीस पावलांचे चित्र काढून
हिमालयाच्या गंडस्थळावर खिळ्यांनी ठोकलं पाहिजे.

रोरावत येणाऱ्या वाऱ्याला  
हिमालयापाशी अडणाऱ्या मेघांना
आणि आसमंतातून पाहणाऱ्या
समग्र ग्रहताऱ्यांना त्यांचं दुःख कळलं पाहिजे.
माणसांना तर ते कळले नाही, निदान चराचराला तरी कळलं पाहिजे..
चराचराला तरी कळलं पाहिजे..

- समीर गायकवाड

1 comment:

  1. If you permit, I would like to record this poem in my voice and send it across to you.

    ReplyDelete

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...