Friday 18 November 2022

तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!....

खरं तर, तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!
लोकांनी, माध्यमांनी मात्र तुझ्या मृत्यूचा बाजार हिरिरीने मांडलाय
तुझ्या नावाखाली हरेकास आपली पोळी भाजून घ्यायचीय
आपले विचार पुढे रेटायचेत,
असलेले, नसलेले 'इझम' खोल खोल रुजवायचेत
पहार ठोकावी तसे सर्वजण तुझ्या अवशेषांना अगदी खोल मेंदूच्या भुयारात ठोकत आहेत.

तू पुन्हा पुन्हा मिनिटाला हरेक वृत्तवाहिनीवर मरते आहेस
लोकांच्या सोशल मीडियामधल्या पोस्टमध्ये तुझ्या चिंधड्या उडताहेत
काहींनी तर तुझ्या मरणावरही मिम्स बनवलीत
तुझा मृत्यू हा आमच्या विचारधारा पसरवायचा इव्हेन्ट झालाय.

पोरी, तुला खूप दुःख होत असेल ना गं!
'त्याने' तुझे तुकडे केले तेंव्हाही तू इतकी व्यथित झाली नव्हतीस ना!
तुझा बाजार आणखी काही दिवस चालेल,
पुन्हा सारं विसरून सारे नव्या हाडाच्या प्रतिक्षेत राहतील
नवं हाडूक मिळताच तुला अगदी अलगदपणे स्मृतींच्या विजनवासात सोडतील.

तिथे असेल काळाकभिन्न अंधार आणि जीव गुदमरवून टाकणारा एकांत!
मात्र भिऊ नकोस बाळा, तू मोठी धीराची पोर आहेस!
कैक जण तुला नावं ठेवत असतील तरी त्याची पर्वा करू नकोस.

तुला पुन्हा लेकीचा जन्म घ्यावा वाटला तर माझ्या पोटी जन्म घे
तसेही तुझ्यासारख्या शोषितांचे आत्मे माझ्या मस्तकात, हृदयात तेवते आहेत
तेंव्हा पोरी माझ्या पोटी जन्माला ये आणि राहिलेलं आयुष्य मनसोक्त जगून घे!

- समीर गायकवाड

16/11/2022

@shraddha walker murder

Wednesday 16 November 2022

गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे..



गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथेही आता रात्र झाली असेलमात्र अद्यापही तिथला अंधार फितूर झाला नसेल
ओसरीवरच्या गप्पा जारी असतील
पारावरची लगबग मंदावली असेल

खेळत असतील फुफाट्यात पोरं गल्लीबोळातली
माळवदावरती बसुनी असतील आठवणींचे उदास पक्षी
देवळाच्या पायऱ्यांपाशी असतील काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी

स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या

जीर्ण दगडी वाडे काही झुकले असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील

संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून

पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल
पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेल्या पिढीचा कासरा कोण ओढत असेल?

आठवणींनी कासावीस झालेले म्हातारे कुणीएक डोळे पुसत असतील नजर चुकवून
इथे उचक्या लागल्या बरोबर उमगते
याद कोणाची निघते अन् मनातल्या गोठ्यातली गाय रडते हंबरून
गाय रडते हंबरून.

गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथलाच अंधार पहाटेस माझ्या उशाशी येऊन बसतो मायेची साय पांघरून...

- समीर गायकवाड

#sameerbapu #sameer_gaikwad

Thursday 3 November 2022

सांगा आम्हाला भारतमाता म्हणाल की नाही?



आमच्या माथी टिकली आहे, कुंकूही आहे
भरीस आम्हाला नवराही आहे
त्यानेच आम्हाला बाजारात उभं केलंय ही गोष्ट अलाहिदा!
आम्ही कष्टाने कमावतो आणि ताठ मानेने जगतो!
आता तर तुमच्या अटीशर्तीतही आम्ही बसतो,
सांगा आम्हाला भारतमाता म्हणाल की नाही?

आमचा देह कोरलाय सर्व धर्मांच्या स्पर्शसुक्तांनी
गोंदवून घेतलेत आम्ही आमचे स्तनही वेदनांनी!
भारतमातेच्या नि आमच्या संवेदना सारख्याच आहेत
तिरस्कारग्रस्तांनो तुम्हाला त्या कळायच्याच नाहीत!

- समीर गायकवाड

०४/११/२०२२ 
  

Sunday 16 October 2022

दरवळ अखेरपर्यंतची

अनेक वर्षांनी तिला भेटल्यानंतरही तो तिच्याजवळ गेला नाही
दुरून पाहत राहिला
नजर चुकवून न्याहाळत!
ती ही रेंगाळली बराच वेळ उगाच.
तोही उस्मरला तिच्या डोळ्यातले भाव निरखून
तोच तर वस्तीस होता तिच्या शुष्क निस्तेज डोळ्यांच्या कोपऱ्यात!
अंधार गर्द होताच लोक एकेक करून निघाले
तीही गेली पतीसमवेत
गर्दी पुरी पांगली,
बराचसा निर्मनुष्य झाला इलाखा
मग चोरपावलांनी तो बसला तिथे जाऊन,
जिथे ती बसून होती कैक वेळ
तिथल्या दरवळाने तो अनिवार आनंदला.
तिने तेच अत्तर लावलेलं होतं जे त्याला पसंत होतं
ती हवा फुफ्फुसात भरून तो आता घराकडे निघालाय
त्याच्या एकाकी घरात तो एकट्याने कधी मेला जरी
तरी तिथे आता तोच गंध दरवळेल.. . .. .. . . .. . . . . . . .
 
- समीर गायकवाड

Thursday 15 September 2022

डोळ्यातलं आभाळ

आठवणींच्या मेघांचा रस्ता नेहमीच हरवलेला असतो
ते येतात असेच अनाहूत 
आणि दाटून येतं आभाळ अचानक.
कालची प्रखर उन्हेच बरी होती असं मग वाटू लागतं
घरांना खिडकी नसली तरी चालते. 
मनातल्या खिडकीत 
एकसंध बसता यायला हवं.
बाहेर हात बांधून उभं असलेलं गच्च साचलेलं आभाळ 
मग आपल्या डोळ्यात रितं करता येतं..
आपलं रितेपण दूर होण्याचा याहून चांगला मार्ग नाही!

Monday 12 September 2022

जिभा काढून घेतल्यात त्यांनी..

जिभा काढून घेतल्यात त्यांनी आणि 
मणकेही ताब्यात घेतलेत
तुम्ही वाकूनच राहायचं आणि बोलायचं नाही
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय

आता तुमच्यापाशी उरलेय तरी काय?
तर तुमचे असले नसलेले ईमान आणि निद्रिस्त विवेक!

तुम्ही जर कधी लढले असालच सत्यासाठी तर
पेटून उठेल तुमचे ही ईमान नक्कीच
आणि असेल थोडी जरी श्रद्धा मानवतेवर तर विवेक ही जागेल तुमचा

पण मित्र हो,
तोवर निदान हात तरी कलम करून देऊ नकात त्यांना
अन्यथा ते तुमच्याच हातांनी तुमच्यावर शस्त्रे चालवतील
आणि मग यथावकाश होईल घोषणा - "तुम्ही शहिद झालात राष्ट्रासाठी!"

- समीर गायकवाड.

भादव्यातल्या उन्ही माळाच्या उष्ण काठी...

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
चिंचेच्या चिगोरी एक
निजे गाय थकलेली
पिऊनी साय सावली

डोळ्यात तिच्या झुरे
निष्पर्ण झाड शोकाचे
पक्षांना भूल स्वप्नांची
पंखांत ओल फुलांची!

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी
सुकल्या खोडाच्या पोटी
भुकेले पिलू घरटयात  
घार दूर मेघांच्या अभ्ऱ्यात      

चोचीस होती भास
इवल्याशा घासांचे
ओशाळे बरड रान
गळता अखेरचे पान.

भादव्यातल्या उन्ही
माळाच्या उष्ण काठी...


श्रावणातला पाऊस ओसरला की भाद्रपदातल्या उन्हांचे दिवस सुरु होतात. भाद्रपदातलं ऊन अंगाला चटके देतं. भरपूर पाऊस पडून गेलेला असल्याने मोकार उन्हे पडताच मातीतून धग बाहेर पडू लागते. मात्र सर्वच शेतशिवारात असं घडत नसतं. बरड मातीचा एखादा निष्पर्ण माळ असतो तिथे हे दृश्य दिसत नाही. अशा बांधांवर नुसती गरम हवा वाहत असते, रोरावणारा वारा बांधांच्या ऊष्ण काठांशी विसावतो आणि बांध अजून तापतात. अशा बांधावर एखादं चिंचेचं झाड असलं तर आसपासच्या शेतातली एखादी थकलेली भाकड गाय सावली पिऊन दिवसभर निव्वळ बसून राहते. सावली तिच्या आसपास मागेपुढे होत राहते. तिथेच शेजारी असणाऱ्या निष्पर्ण अशोकाच्या खोडातल्या घरट्यात जिवंत राहिलेलं एखादंच पिलू बसून असतं डोळे मिटल्या अवस्थेत. त्याला भास होत असतात आईने घास भरवल्याचे, त्याची चोच नकळत उघडझाप करत राहते मात्र त्याची आई दूर मेघांच्या अभ्र्यात विहरत असते. हे सगळं कमालीचं संथ आणि उदासवाणं असतं, परिणामी अशोकाचं अखेरचं पान गळून पडतं तेंव्हा ते बरड मातीचं रान विलक्षण ओशाळतं, कारण आपल्याही कुशीत हिरवे पिवळे कोंब उगवावेत झाडं मोठी व्हावीत त्यांना आभाळभर पाने फुले यावीत आणि त्यावर घरटी व्हावीत असं त्या मातीला वाटत असतं!

- समीर गायकवाड.  

Tuesday 15 March 2022

केवळ एक वचन...

केवळ एक वचन...

जेंव्हा तू प्रेमाची वचने देत होतास
तेंव्हा तुझ्या तप्त तळहातांत माझा थरथरता हात होता
त्याच वेळी, तुझ्या घरातल्या भिंतीवरती नजर माझी खिळली
तसबिरीत तिथे चित्र होते टांगलेले.

ज्यात एक तरुण स्त्री जात्यावर दळत होती आणि
एक वृद्धा सुरकुतल्या मुठींनी टाकत होती धान्य
शेजारीच पडून होता धान्याचा अर्धा रिता हंडा
जो त्यांना त्यांच्या उर्वरित लढाईची आठवण करून देत होता

त्याच तसबिरीत होता एक तरुण पुरुष
जो भिंतीस डोकं टेकवून
ओढत होता हुक्क्याची गुडगुडी.

चित्राच्या कोपऱ्यात बसून होता एक वृद्ध
जो वाजवत होता सारंगी !

हे सजना तुझ्या प्रेमाचा मी स्वीकार करतेय
ते ही सप्तपदीच्या सात फेऱ्यांशिवाय..

मात्र एक वचन हवेय मला
जेंव्हा माझा मुलगा त्याच्या भावी प्रेमिकेस प्रेमाच्या आणाभाका देत असेल
तेंव्हा ही असावे एक चित्र याच भिंतीवर

ज्यातली वृद्धा वाजवत असावी सारंगी
म्हातारा बसुनी असावा निवांत ओढीत हुक्क्याची गुडगुडी
आणि
धान्य दळत असावी तरुण स्त्री
संगतीस तिच्या असावा तरुण पुरुष !

हे सजना सांग,
तू चित्रातील पात्रांची अशी अदलाबदल करण्याचे वचन देशील का मला ?

~~~ ~~~~ ~~~~ ~~~~ ~~~~~

नोंद - विख्यात हिंदी कवयित्री मृदुला शुक्ला यांच्या 'बस एक वचन' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे.

या कवितेत विविध भावचित्रे आपसात विरघळत जातात आणि एक सजीव दृश्य आपल्या नजरेपुढे उभं राहतं ज्यात अनेक गोष्टींची चुटपुट लागून राहते.
आज प्रेमाचा वचनदिवस आहे, कवितेत प्रेमिकेने मागितलेलं वचन कुणी आज वास्तवात मागत असेल काय ?

- समीर गायकवाड

Monday 14 February 2022

आठवणींचे अत्तर ...

खुशाल माळतेस गजरा केसांत तू
गंधवेड्या वाऱ्याचं भान मग हरपत असतं
इथे आधीच आठवणींचे अत्तर छळतेय
जुन्या जखमांचं दुःख नव्याने उमगत राहतं

भीतीने मिटू नकोस डोळे
ओठांवर ओठ टेकवल्याने कुणी मरत नसतं....
नजरेनेही जखमा होतात
जेंव्हा कुणी बघून न बघितल्यासारखं करत असतं....

पदराआड लपवू नकोस चेहरा
फारतर बोलणं खुंटेल, अबोल नातं मरत नसतं ...
तुझं हे असं तर माझी वेगळीच तऱ्हा
चेहऱ्यावरून तुझ्या, नजर हटू नये असंच वाटत असतं...

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...