Monday, 12 September 2022

जिभा काढून घेतल्यात त्यांनी..


जिभा काढून घेतल्यात त्यांनी आणि
मणकेही ताब्यात घेतलेत
तुम्ही वाकूनच राहायचं, बोलायचं नाही
मेंदू तर कधीच त्यांनी काबीज केलाय
आता तुमच्यापाशी उरलेय तरी काय,
तर तुमचे असले नसलेले ईमान आणि निद्रिस्त विवेक!

तुम्ही जर कधी लढला असाल सत्यासाठी
तर नक्कीच पेटून उठेल तुमचेही ईमान
आणि असेल थोडी जरी श्रद्धा मानवतेवर
तर विवेक ही जागेल तुमचा

पण दोस्तहो, तोवर निदान
हात तरी कलम करून देऊ नकात त्यांना
अन्यथा ते तुमच्याच हातांनी तुमच्यावर शस्त्रे चालवतील
आणि मग यथावकाश होईल घोषणा -
"तुम्ही शहिद झालात राष्ट्रासाठी!"
अथवा असंही म्हंटलं जाईल की,
"चकमकीत मारले गेले राष्ट्रद्रोही काही!"

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...