अबोल्यातही एक अर्थ असतो, निशब्दतेतही एक हुंकार असतो,
नसलो जवळ तरी, स्पंदनात तुझ्या मी असतो....
प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते, अनुत्तरीत होण्यातही एक उत्तर असते,
नच उतरलो शब्दात तरी, काव्यात तुझ्या मी असतो ....
दिसण्यातही एक आनंद असतो, दृष्टीचाही एक अथांग शोध असतो,
नसलो भोवताली तरी, डोळ्यांत तुझ्या मी असतो.
कपाळीच्या बटेतही एक माधुर्य असतं, ओठांतही एक आसक्ती असते,
नच स्पर्श केला तरी, देहगंधात तुझ्या मी असतो !
जवळीकीचाही एक कैफ असतो, कैफाचंही एक आत्ममग्न जिणं असतं,
नच सहवास लाभला तरी, परिघात तुझ्या मी असतो.