Tuesday, 7 August 2018

सोनपाखरू....



काळ्यापांढऱ्या ढगांची दाटी होऊन मेघगर्जना काय झाली,
उन्हात होरपळून गेलेल्या शुष्क पानांनी मिठीच मारली.

दोन चार थेंब वळवाचे आपल्याच नादात काय कोसळले,
माळावरच्या माना पडलेल्या गवताचे भालेच अलगद झाले.

वरुणोत्सुक वारा अंगात आल्यासारखा बेधुंद काय नाचला,
सुरकुतल्या लालपिवळ्या पिकल्या पानांनी बिस्तरा बांधला.

चंद्रमौळी गोठयाच्या कुडात शीतोष्ण सरी काय झिरपल्या,
रेशमी गाईंच्या डोळ्यात अलवार अश्रूधारा पाझरल्या.

पहिला पाऊस आला म्हणून कळ्यांनी ठेका काय धरला,
पाण्याच्या ओघळासरशी मुंगळयांनी रस्ता त्यांचा बदलला.

जलधारांत भिजताच चराचर सगळे कसे गहिवरून गेले,
पण पंख नाही भिजले म्हणून सोनपाखरू हिरमुसुन की गेले.....

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...