Tuesday, 15 March 2022

केवळ एक वचन...

केवळ एक वचन...

जेंव्हा तू प्रेमाची वचने देत होतास
तेंव्हा तुझ्या तप्त तळहातांत माझा थरथरता हात होता
त्याच वेळी, तुझ्या घरातल्या भिंतीवरती नजर माझी खिळली
तसबिरीत तिथे चित्र होते टांगलेले.

ज्यात एक तरुण स्त्री जात्यावर दळत होती आणि
एक वृद्धा सुरकुतल्या मुठींनी टाकत होती धान्य
शेजारीच पडून होता धान्याचा अर्धा रिता हंडा
जो त्यांना त्यांच्या उर्वरित लढाईची आठवण करून देत होता

त्याच तसबिरीत होता एक तरुण पुरुष
जो भिंतीस डोकं टेकवून
ओढत होता हुक्क्याची गुडगुडी.

चित्राच्या कोपऱ्यात बसून होता एक वृद्ध
जो वाजवत होता सारंगी !

हे सजना तुझ्या प्रेमाचा मी स्वीकार करतेय
ते ही सप्तपदीच्या सात फेऱ्यांशिवाय..

मात्र एक वचन हवेय मला
जेंव्हा माझा मुलगा त्याच्या भावी प्रेमिकेस प्रेमाच्या आणाभाका देत असेल
तेंव्हा ही असावे एक चित्र याच भिंतीवर

ज्यातली वृद्धा वाजवत असावी सारंगी
म्हातारा बसुनी असावा निवांत ओढीत हुक्क्याची गुडगुडी
आणि
धान्य दळत असावी तरुण स्त्री
संगतीस तिच्या असावा तरुण पुरुष !

हे सजना सांग,
तू चित्रातील पात्रांची अशी अदलाबदल करण्याचे वचन देशील का मला ?

~~~ ~~~~ ~~~~ ~~~~ ~~~~~

नोंद - विख्यात हिंदी कवयित्री मृदुला शुक्ला यांच्या 'बस एक वचन' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे.

या कवितेत विविध भावचित्रे आपसात विरघळत जातात आणि एक सजीव दृश्य आपल्या नजरेपुढे उभं राहतं ज्यात अनेक गोष्टींची चुटपुट लागून राहते.
आज प्रेमाचा वचनदिवस आहे, कवितेत प्रेमिकेने मागितलेलं वचन कुणी आज वास्तवात मागत असेल काय ?

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...