आलं आभाळ दाटून माझ्या डोळ्यांच्या पांदीत
गेला पदर फाटून तुझ्या संसाराच्या सांदीत
कशी झाली पानगळ कसं आलं हे वादळ
दैना झाली जीवाची आता सोसवेना कळ !
चूक झाली कोणाची सजा भोगतंया कोण ?
बाकी उरली न काही तरी फिटेना हे ऋण
चित राहीना थारयावर मन उडं वाऱ्यावर
काळजाचं होई पाणी दुःख झुलं झुल्यावर
गेलं पंखातलं बळ आलीं शेवटची भोवळ
तुटली बंधनं सारी वाहते कायेची ओंजळ
गेला पाऊस पाडून आता मागं उरे रानभूल
येता सय तुह्या ऊरात लागं माझीच चाहूल
गेलं आभाळ रंगून माझ्या चितेच्या मेंदीत
गेलं आयुष्य उसवून तुझ्या स्वप्नाच्या चिंधीत !!
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment