Wednesday, 8 May 2019

कवीने कसे सगळे मस्त लिहावे

कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावेलोकांना आवडेल असेच खरडावे.

निर्जीव चंद्र ताऱ्यांवरसमुद्राच्या खाऱ्या पाण्यावर मधुर गीते लिहावीत.

दोन दिसाच्या क्षणभंगुर प्रेमावर जगड्व्याळ शब्दांची कवने लिहावीत.

काँक्रिटच्या जंगलात राहून कुसुंबी झाडांच्या हिरवाईची शब्दफुले वेचावीत.

गुलछबू तुंदिलतनू व्हावेबुभुक्षित चेहरे दुर्लक्षून गोडगुलाबी चित्र रेखावे.

कोणाच्याही बेगडी सौंदर्यावर आसक्त होत फुकाची लेखणी झिजवावी.

सृष्टीशी तादात्म्य पावू नये ; निष्प्राण यमकअलंकारवृत्तांवर प्रेम करावे.

भावहीन आशयाच्या शब्दांचे इमले रचून त्यात इमानाचे कलेवर चिणावे. 

विश्वासघातक्यांवर स्तुतीसुमने उधळत खोट्या थोरवीचे पोवाडे लिहावेत.

गंधभ्रांतीच्या शोधातील गुलाबाच्या पाकळ्यावर प्रतिभा खर्चत राहावे.

मनातले पंगु सत्य सांगू नयेलाचारीच्या परिघावरती गोल गोल फिरावे.

दैन्य -विषमताअन्याय-उपेक्षा शोषण याकडे सराईत डोळेझाक करावी.

चिमणी पाखरे जगवली नाहीत तरी जाळीदार घरटयावर मजबूत लिहावे.

कोरडया नात्यांत जगून अथांग माणूसकीच्या सुमार कविता कराव्यात.

भणंग विद्रोहाचे जहर प्राशू नयेभ्याड समाजाविरुद्ध गरळ ओकू नये.

टीका करणे टाळावेप्रस्थापितांची थुंकी झेलत बधिर रचना कराव्यात.

प्रसंगी बाजारू मंगलाष्टके लिहावीत भाटगिरी करावी कुत्र्याचे जिणे जगावे.

शब्द विकावेतआशयाचा लिलाव करावाखुंटलेली प्रतिभा गहाण टाकावी.

डोळ्याला झापडं लावून जगावेजगाला कोलावेआपल्याच कोषात जगावे.

आहेव पुरुषीपणाची कड घ्यावीइभ्रतीचे बांडगूळ माथ्यावर वाढवावे.

गोठलेल्या रोमरोमात अंगार फुलवू नयेपोलादी लेखणीचा पारा करावा. 

दोनतोंडी गांडूळ व्हावेपायातली वहाण व्हावे पण सत्यासूड होऊ नये.

डोळ्यादेखत माणसे मरू दयावीतमेलेल्यांवर आदर्श सूक्ते रचावीत.

कणाहीन विचार ठेवावेतलाळघोटेपणा करत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करावे.

सत्याची बाजू घेऊ नयेबोथट आत्म्याशी बेगुमान बदफैली करत जगावे.

कविता न ऐकताच दाद देणाऱ्या श्रोत्यांसाठी खोटे स्मितहास्य करावे.

पुरस्कारासाठी मुजरे करावेतउष्ट्या संमेलनासाठी झोळ्या पसरव्यात.

सरकारकडे याचना करावीसत्ताधिशांचे सोनेरी जोडे उराशी कवटाळावेत.  

घरासाठी अनुदाने मागावीतखड्डयातल्या रस्त्यांना नाव देऊन घ्यावे.

कवीने कसे सगळे मस्त मस्त लिहावेलोकांना आवडेल असेच खरडावे.

 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...