Wednesday, 8 May 2019

या नभाचे हे दान ...

येताच तू, भरल्या ओटीचे तलमस्वप्न भुईला पडले.
राव्यांच्या गीतांनी आमराईस रेशीमविळखे घातले.
झाडे कुसुंबी लज्जित शाममेघांच्या मिठीत विसावली,
मावळत्या नभांस तुझ्या दृष्टीची दिवेलागण झाली.
बांधावरच्या वृक्षांची साल हळदओल्या पालवीत नाहली,
प्राणपाखरांना इंद्रधनुष्यी पुष्पगंधाची रानभूल पडली.
पोटरयात पिकांच्या तुझी चाहुल हलकेच तटतटली,
उफाणल्या शिवाराच्या देहात तालवीणा तुझी झंकारली.

गायींच्या स्निग्धडोळ्यात ऊब आनंदाश्रूंची उतरली,
अभ्रात नभाच्या शुभ्रबगळ्यांची चित्रे त्रिकोणी उमटली.
कलण्याआधी सुर्यबिंब तुझ्या मृगनयनात विरघळले,
तुझ्या सदाफुली सोनपावलांनी चराचर फुलुनी आले.
संधीकाळी तममेघ भूशिर वसुंधरेच्या वक्षी विसावले,
धुंदनाद पैजणरवांचे पानोपानी अलगद थरथरले.
येताच तू बिल्वदलांच्या रांगोळीने भुईला पूजिले,
सदगदित कंठांनी सौभाग्याशिष पंचतत्वांनी तुला दिले.
सप्तपदीच्या दग्धसमिधांनी जणू वरदान मला दिले,
या नभाचे हे दान भुईला सातजन्मांसाठी मिळाले !   

- समीर गायकवाड. 

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...