Wednesday 8 May 2019

नसती तहान तर ...



नसती तहान तर बरे झाले असते,
अष्टौप्रहर वणवण पायपीटेची थबकली असती.
निवडुंगे बोटाची झाली नसती
भार नसता वाहावा लागला बोडक्या मस्तकी हंडे कळशांचा.
दुधपीते तान्हुले घरी टाकून झोळीत
रणरणत्या भुईच्या वाळवंटी नसते लागले
माझ्या मायबहिणींचे अगतिक मेळे.

नसती तहान तर नद्या बारवे
झाले नसते पाषाणी खडककायेचे.
कोरडयाठाक ओढ्यात करपल्या पानावरून
फिरला असता पाण्याचा हात सायमाखला.
पाठीवर चिमूरडयांच्या राहिले असते दप्तर अन
उजाड माळांची गायराने होऊन
चरली असती खिल्लारे
वाचली असती जंगले अन
घरटी वाढल्या असत्या दुर्मिळ पाखर पिढ्या.

नसती तहान तर आटले नसते पाणी
बांधावरल्या मातीत पडले नसते मुडदे
रांजणाच्या तळाशी नसते काळीज गुंतले
पिके भरदार लगडली असती शेतशिवारातून
रास धान्याची लागली असती दारी भरभरून.
माती रानोमाळची रडते
माझ्या अनवाणी मायच्या पायी पडून. धाय मोकलून...
मायबहिणींच्या भाळी तहानेच्या शापाचा झाला अश्वत्थामा.
निहंत्या आता तू एक कर,
हरामी माणूस मेल्यावर त्याचे झाड कर
त्याला उन्हांतान्हात उभे कर,
वीजपावसाचे तडाखे दे
रोंरावणाऱ्या वादळाचे पीळ त्याच्या अंगाला पडू देत
उन्हे पिऊन सावली देतानाही
कापायला त्याला आले कुणी तर याच शापाचं स्मरण होऊ दे...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...