जाता निर्जन पाऊलवाटेने स्निग्ध माती बोले पायांशी
करे जिव्हाळ हितगुज जित्राबांच्या श्रमल्या खुरांशी
झुळुका मंद रानवाऱ्याच्या करीती वेणुनाद कानांशी
जाता निर्जन पाऊलवाटेने दाटे गाईच्या डोळ्या आभाळमाया
थकल्या आईच्या घामात निथळे विश्वनिहंत्याची शामलकाया
डोईवरच्या मोळीत नकळत विसावती दग्ध उन्हांच्या पडछाया
जाता निर्जन पाऊलवाटेने असती श्वास सोबतीला पांथस्थांचे
दगडमातीच्या खुणां ठरती वाटाडे पाऊलांच्या बंदिस्त गंधांचे
संवाद आपुल्याशी साधताना बेभान होती कैफ साऱ्या वाटांचे
जाता निर्जन पाऊलवाटेने दिसती दिवंगत मायबाप ठाईठाई
ऐकुनी त्यांचे मौन हुंदके अणूरेणुतुनि झाडांच्या डोळा पाणी येई!
- समीर गायकवाड.

No comments:
Post a Comment