Wednesday, 8 May 2019

जिवाचं सरपण..



दूर आडरानी एक वस्तीचा ठाव,

तिथं काळजात बाभळीचा डाव

उगवे सूर्य, संगट पोटाचा सवाल

हाता फुटत पारंब्या लाखलाल


काटेरी जू माणसाच्या मानेवर,

जित्तेपणीचं जणू मुकं कलेवर

खपाटी पोट बरगड्या बाहेर  

डोळ्याची विहीर माथा सैरभैर


वारा खुनशी फिरे शेतशिवारातून,

काळ्या मातीस आधण आंतून

किडं करपल्या पानी चिटकून,

पाल फिरे कोरडया जात्यातून


खोपटा टांगलं नशीब छिललेलं,

जणू सुंद वटवाघळ झाडा लटकलं 

उन्हं तळपती संसार माथी मारून,

भूक शमते सरपण जिवाचं जाळून..  

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...