जगायचं कसं हे विचारलं पाहिजे,
मातीत उगवणाऱ्या हिरव्यापिवळ्या कोंबांना, गव्हाच्या टंच लोंब्यांना,
जुंधळयातल्या चांदण्यांना, चंद्रावरच्या नक्षी गोंदणांना विचारावं
दंडातून वाहणाऱ्या पाण्याला, विहिरीत घुमणाऱ्या पारव्याला
निळ्याजांभळ्या आकाश छटांना आणि शुभ्र मेघांच्या अभ्रांनाही विचारलं पाहिजे.
पुर्वाईच्या अपार लालीस, मावळतीच्या जास्वंदी झिलईस,
झाडांच्या किनखापी नक्षीस, वडाच्या पारंब्यास अन धुक्याच्या दुलईसही विचारलं पाहिजे
जगायचं कसं हे मातीच्या रोमरोमास विचारताना मातीच्या समर्पणाशी एकरूप होता यावं
जगायचं कसं हे विचारलं पाहिजे,
गाईच्या करूण डोळ्यातल्या पाझरास, माळरानातून वाहणाऱ्या निर्झरास
शिवारातल्या चंद्रमौळी घरास आणि गावातल्या मायाळू पारासही विचारलं जावं !
झाडाच्या सावल्यांना, रंगीबेरंगी फुलांच्या वेलींना, टेकडीवरल्या तालींना
आणि बैलाच्या मखमली कायेवर पांघरलेल्या नक्षीदार झुलींनाही विचारलं पाहिजे.
देवळातल्या कोनाड्यात दडून बसलेल्या पाकोळयांना, तुळशी वृंदावनातील मंजुळांना,
बांधावरून दिसणाऱ्या नितळ पारदर्शी लवलवत्या मृगजळांनाही विचारावं.
जीवनतत्व दवातल्या मोत्यासारखं असावं, एरव्ही हाती लागत नसलं तरी मनी जाणवावं !
जगायचं कसं हे विचारलं पाहिजे,
बाभळीच्या टोकदार काट्यांस, वेड्यावाकड्या झाडाच्या सूरपारंबी फाट्यांस
वटवृक्षाच्या स्थितप्रज्ञ बाण्यास, आंब्याच्या मोहरास नि गुलमोहराच्या बहरास
चिंचेच्या घनगर्द पानांस, पिंपळपानांच्या जीवनगाण्यासही विचारलं जावं !
भुकेजलेल्या चुलीतल्या धगीसही विचारावं अन कडब्याच्या शुष्क गंजीसही विचारावं.
जीवनतत्व ठाऊक असतं मुंगळयांच्या रांगांना, बैलगाडीच्या धावांना,
कापसाच्या बोंडांना, बैलांच्या रुबाबदार वशिंडांना, ओबडधोबड धोंडयांना !
गुरांच्या दमलेल्या खुरांना विचारताना त्यांचं दुःखसंचित आपल्या अश्रूतून वाहावं !
जगायचं कसं हे विचारलं पाहिजे,
धुंवाधार कोसळणाऱ्या जलधारांना, एकाएकी जमलेल्या काळ्याकुट्ट ढगांना
लकाकणाऱ्या लख्ख वीजांना, भर दुपारच्या रणरणत्या उन्हांना,
मळभभरल्या मेघांना, कुंद ढगांना आणि त्याहून अधिक नितळ निरभ्रांनाही विचारावं.
झुळझुळत्या शीतल हवेच्या लाटांना, बंडखोर वादळाच्या विद्रोही वाऱ्यांना
वैशाखातल्या रखरखत्या झळांना, डोंगरालगतच्या ओसाड कातळांना
पत्थरातल्या झऱ्यांना, खळखळत्या ओढ्यांना, आटलेल्या पाटांनाही विचारावं
अतिवृष्टीवलाही विचारावं अन त्यात टिकून राहणाऱ्या लव्हाळयाशी एकजीव व्हावं
जगायचं कसं हे विचारलं पाहिजे,
बळीराजाच्या थकलेल्या हातांस, भाळावरल्या घामाच्या थेंबांस
थकलेल्या श्रमिकाच्या काबाडकष्टास, निढळ कमाईस, निष्ठुर नियतीस
संन्यस्थ औदुंबराच्या विरक्तीस , बुद्धाच्या प्रसन्न शीतल मुद्रेस विचारलं पाहिजे.
पानातल्या वेणूनादास, घरट्यातल्या पिलांस, पक्षिणीच्या अथक हलणाऱ्या पंखांस
आणि धारदार विळ्यास, जात्याच्या जड पाळ्यास, गवताच्या तेजतर्रार पात्यास
नांगराच्या फाळास, शेकोटीतल्या जाळास आणि सुगीच्या खळ्यासही विचारलं जावं
जीवाचं मोल शिकवणाऱ्या दुष्काळास विचारताना जलधारेचं रूप घेता यायला हवं.
जगायचं कसं हे विचारलं पाहिजे,
शेतशिवारांच्या प्रसन्न भूपाळीस, लयबद्ध दुपारच्या निरव पानगळीस,
सांजेच्या पणतीतल्या मंद ज्योतीस, निर्जीव घडयाळातील टिकटिकीस आणि
अंधारवेळी शेतात डोकावणाऱ्या लक्ष चांदण्यांच्या मंदप्रकाशी दुलईसही विचारलं पाहिजे.
दंड घातलेल्या आईच्या जुनेर रजईस, खरमरीत रुक्ष वाकळेसही विचारावं
मातकट शेणाने सारवलेल्या जमिनीस, अंगणातल्या चंदनगंधी
मंदिरांच्या शिखरास, मस्जिदीच्या मिनारास, मायबापाच्या चरणांस विचारावं
डोळे मिटल्यावर दिसणाऱ्या विश्वनियंत्यसही विचारावं आणि प्रेमाचा मानवधर्म व्हावं !
जगायचं कसं ते आत्म्यातल्या सृष्टीला विचारावं आणि चराचराचा आत्मा होऊनी जावं !
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment