Wednesday, 8 May 2019

आई दार उघड ...




तू जागृत असतेस म्हणे ... 
तुला बळी लागतो म्हणे .. 
काल बोकडाचा बळी तुझ्या समोरच देण्यात आला .. 
दोन्ही बाजूनी पाय ओढून 
एका मुक्या जनावराला निष्ठुरपणे मारण्यात आलं... 
तू सांगतेस हे करायला ? 
तुला प्रसन्न करण्यासाठी मुक्या प्राण्याचा जीव द्यावा लागतो का गं ?
तुला आवडतं हे ?  
जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी देव असतो म्हणे !

मग काल तुझ्या पुढयात मारलेल्या जिवंत बोकडात 
देव नव्हता का  ?
की त्यातला देव आधी मारला 
आणि मग बोकड कापला का ?
तू समोर होतीस, तुला दिसलं असेल ना हे सर्व ?
तो बोकड तडफडला नाही का गं ? 
त्याला कापणाऱ्या माणसाचे हात थरथरले नाहीत का ?
त्याचे रक्त तुझ्या आवारात सांडलेले तुला चालते ?
हे सगळं तू मुकाट पाहत असतेस की 
डोळे मिटून बसत असतेस ?
तो बोकड मारण्याचा अधिकार त्यांना कुणी आणि कधी दिला गं ?
बळी न देता तुझे घटोत्थापन होत नसते का?
तू पूर्वी कोपायचीस म्हणे,
आता मला सांग 
हे सर्व तुला न विचारता केले जात असेल तर 
तू कोपत का नाहीस गं ?
की तुझ्या नावावर माणसांनी, भक्तांनी, पुजाऱ्यांनी अन 
गुरवांनी हा जीवघेणा खेळ सुरु केला आहे ?
तुझ्या लेखी एका जीवाची किंमत किती आहे ?
जमल्यास उत्तरं दे, नाही दिलीस तरी चालेल...

तरीसुद्धा मी म्हणत राहीन -   
दार उघड आई दार उघड ! 
पण कुणाचं हे तूच ठरवायचंस !      

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...