गावाकडे सांज होताच आभाळाची निळाई मातीत उतरते.
मातीतली पेंग रांगत रांगत गोठ्यात जाते, गाईच्या डोळ्यात पाझरते.
आभाळातलं लुकलुकतं चांदणं देव्हाऱ्यातल्या निरांजनात चकाकून उठते.
समईतल्या वातींची ज्योत शांत शीतलतेने जळू लागते.
पडवीतला पाचोळा धडाडून उठतो.
लख्ख पुसलेल्या कंदिलाच्या काचेत चेहरा चंद्र न्याहाळतो.
सांज होताच वासरे बिलगतात गाईला अन लेकरे आपुल्या आईला.
सांज कुरवाळते थकलेल्या झाडांना, वेलीना, पानांना अन सुकल्या फुलांना.
रात्रभर ती सोबत करते उमलणारया कळ्यांना ,
परसातल्या घरधन्याच्या अंगावर सांज आभाळाचे पांघरूण घालते.
हळूच चुलीच्या पोटात शिरते अन पेटून उठते.
चुलीवर ठेवलेल्या, मातीने सारवलेल्या पातेल्यात मायेने झिरपते,
गरीबाच्या ताटातले दोन घास सांज अमृताचा करून जाते.
दमल्या जीवाला सांज झोप देते, वासरांना माय देते
मायेला आसरा देते, आसऱ्याला देवास आणते,
देवाला माती दावते, मातीला निळ्या आभाळाची भेट घडवते.
सांज मिलन घडवते !
सांजेला माणसाची पडती विठूरायापुढे दंडवते.
सांज, स्वतःच्या अस्तित्वाला पोथीत शोधिते,
आजीच्या गोष्टीत अलगद हरवून जाते.
आजोबांच्या जीर्ण चुरगळल्या चंचीत लपून बसते,
बाजेवर हलकेच अंग टाकून पाठ मोकळी करते.
आरशात न्याहाळणाऱ्या सासूरवाशिणीच्या गजरयात घुमते,
रिकाम्या ताटातून अर्धभरल्या पोटात जाते,
पोटातून डोळ्यात येते, डोळ्यातून गालावर ओघळते.
सांज हसवतेही अन रडवतेही...
सांजेला आकाशाकडे बघताना झोप कधी लागते काही कळत नाही.
रात्र गडद झाल्यावर सांज माघारी फिरते, परतुनी जाताना मायबापांचे हसरे सांगावे स्वप्नी सोडून जाते..
- समीर गायकवाड .
No comments:
Post a Comment