Wednesday 8 May 2019

कोमा



तू गेलीस अन
चंद्रभेसूर अंधार दुःखवेडया डोहाच्या
ओंजळीत हमसून हमसून रडला.
उध्वस्त घरट्यातील दिशाहीन पक्षी
रात्रभारित पश्चिमेच्या आभाळ निळाईत विरले.
घुबडघुमटी देवळाच्या शुष्क दीपमाळा
मेघांच्या धुव्वाधार मिठीत हळुवार निमाल्या.
अजान पुकारताना मस्जिदीचे गोलघुमट
अंतराळाला सवाल करून मोकळे झाले.
फुलांच्या गंधरुसव्या कळ्यांनी
देठाशीच कोंडून घेतले.
भिंतीवरच्या घडयाळातल्या टोकदार लंबकाने
अखेरचे उष्म आचके दिले.
देव्हाऱ्यातल्या समईने हलकेच फुलवातींना
मागे ओढून पोटात पाय दुमडले.
गुलमोहरी वळणवाटेवरच्या जुन्या शिळांना
दाटून गच्च उमाळे आले.
अंगणातले प्रकाशाचे प्रतिबिंब रात्रीत
गुंतताना निशाचराच्या रक्ताक्षात विलीन झाले.
माळावरच्या सावल्यांनी प्राक्तनवृक्षाचे मलिन
खोड कापताना मुळ्यांच्या अंताशी तुझा शोध सुरु केला.....

पण तू परत आली नाहीस...
त्या दिवसापासून उफाणलेल्या वाऱ्याने त्याचे घर वर्ज्य केले,
जाईच्या पाकळ्यांनी भ्रमरांशी अबोला धरला,
समग्र सांजा शिशिरातुर पानगळीत रत झाल्या,
प्रकाशगोलाच्या ओढीने ग्रासलेल्या त्याच्या देहाच्या
वेदीवरती क्षितिजाच्या यमसल्लेखनेच्या वेणा सुरु झाल्या !
अन,
पानातल्या स्वरबंदिस्त वेणूनादाने गदगदलेल्या झाडात हलकेच गोंदवून घेतले.\    
जेंव्हा कधीही अवचित येतो स्वरगंधित पानांचा सळसळणारा आवाज
तो ओळखतो की
आता तुझ्या परतण्याचा भास होणार आहे.
त्याच्या थिजलेल्या प्रतिक्षारत डोळ्याच्या बाहुलीत हलकेच तुझे प्रतिबिंब तरळते,
त्याच्या डोळ्यांची जोरदार हालचाल होते.........  


इस्पितळातल्या आयसीयुत तो पडून आहे दोन दशकापासून
डोळ्यावर टॉर्चचा झोत टाकताच होते त्याच्या बुब्बुळांची हालचाल
डॉक्टर म्हणतात, "स्टील होप्स आहेत, ही रिस्पॉन्डस,
त्याच्या डोळ्यात लाईफसाईन आहे, हि मे रिकव्हर फ्रॉम कोमा !"
खरे तर तेंव्हा त्याच्या डोळ्यात तू तरळून गेलेली असतेस अन
त्याच्या कानात स्वरबंदिस्त पानांचा अल्वार वेणूनाद होऊन गेलेला असतो.

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...