गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
गाव त्याला शिळामंदिरी शोधत राहते.
तांबडफुटीलाच तो पिकांतुनी निघून येतो
कणसातल्या मोत्यांत सत्व परि उरते.
तुळशीच्या मंजुळांत बाळकृष्ण झंकारतो
हळदओल्या हातांना त्याचीच ऊब येते!
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
खिल्लारांच्या पाठी झुल त्याची लहरते
माळावरच्या पानापानात तालात डोलतो,
दरड कपारीत त्याचीच सावली तरंगते
पाकळ्यांच्या मखमाली कायेतून रसरसतो
फुलांच्या परागकणांना झिंग त्याचीच येते!
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
कळसावरुनी पळसपान हिंदोळे हवेत घेते
गाभाऱ्यातला वेणूनाद घुमवत वारा फिरतो
चराचराची झिम्मड काया पुलकित होते,
वेशीवरचा गावदेह त्यानेच उजळून निघतो.
विहंगरांग नभांच्या शुभ्राभ्रातुनी उफाणते!
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
माळावरुन चालताना गुरांना पेंग येते
शिवारातल्या पिकांत अलगद प्राण भरतो
काळ्या आईच्या रोमरोमात सृष्टी अंकुरते
वस्तीतल्या चंद्रमौळी घरात पाठ टेकतो
गोठयातल्या गाईंना तव रवाने जाग येते!
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
त्याच्या अस्तित्वाने गाव श्वास घेत राहते
घरोघरच्या ओसरीत वेल आशेचा फुलतो
शिणल्या देहात तृप्तीचे संगीत फेर धरते
सुरकुतल्या भाळांवर गंधबुक्क्यात तो वसतो
सहवासाने त्याच्या गावजीवन धन्य होते!
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो
सुखदुःखात अष्टौप्रहर त्याचीच साथ असते
वेशीपासून ते शिवेपर्यंत अणुरेणूत नांदतो
त्याच्या कृपेची शाई माझ्या अक्षरात उतरते
सरस्वतीच्या चरणी माझे नमन सांगतो
गावदेवाची मातीच माझे अक्षरगंध सजविते.....
No comments:
Post a Comment