संतांच्या अभंगात तू, आत्म्याच्या मृदंगात तू
समईच्या वातीत तू, आमराईच्या सावलीत तू
गवताच्या पात्यात तू, दगडाच्या जात्यात तू
नांगराच्या फाळात तू, जठराच्या जाळात तू
कृष्णाच्या बासरीत तू, शिवबाच्या तलवारीत तू
मेघांच्या अभ्रात तू, पाखरांच्या पंखात तू !
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?
पक्षांच्या घरटयात तू, वृक्षांच्या राहुटयात तू
अर्जुनाच्या बाणात तू, कर्णाच्या दानात तू
देवळाच्या कळसात तू, शंभूच्या पळसात तू
बीजांच्या अंकुरात तू, वादळांच्या उरात तू
विद्रोहाच्या बंडात तू, आक्रोशाच्या दंडात तू
ओवीच्या अक्षरात तू, कोकिळाच्या स्वरात तू
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?
भिक्षुकांच्या कटोरयात तू, स्वप्नांच्या मनोरयात तू
मनगटाच्या पोलादात तू, आसवांच्या ओघळात तू
फुलांच्या देठात तू, सुरांच्या ओठात तू
दवाच्या मिठीत तू, देहाच्या दिठीत तू
सागराच्या खोलीत तू, झाडांच्या ढोलीत तू
मोराच्या पिसारयात तू, चितेच्या निखारयात तू !
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?
अबीर गुलालाच्या गंधात तू, सत्य असत्याच्या द्वंद्वात तू
वीरांच्या गाथेत तू, समरांच्या कथेत तू
श्रमिकांच्या घामात तू, गणिकांच्या दुःखात तू
वारांगनेच्या देहात तू, तारांगणाच्या डोहात तू
अंधाराच्या गर्भात तू, हवनाच्या दर्भात तू
जीवनाच्या सत्वात तू, अनंताच्या पंचतत्वात तू !!
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?
स्वत्वशोधाच्या अंतानंतरच, उमगशील तू !
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment