रात्रभर
खांद्यावर अंधाराची कावड वाहून थकलेल्या चांदण्या
आभाळओझ्याने
वाकून जातात,
लुकलुकतात.
चंद्राकडे
बघत जगत राहतात......
हजारो
वर्षांपासूनच्या प्रतीक्षा चक्राच्या परिघात फिरतात.
दिवस
मावळला की अंधारल्या मेघांना पाठीशी घेऊन प्रकटतात
रात्रभर
तिष्टत राहतात,
आणाभाका
घेतात.
अरुणोदयास
चांदण्यांच्या विरहाने चंद्राचा शुभ्र पारा आसमंतात विरत जातो,
अंधाराच्या
साक्षीने चंद्र कुढत जातो,
स्वतःला झिजवत जातो..
अमावस्येच्या
रात्रीस स्वतःला लपवतो,
त्याच्या
दुःखात चांदण्याही सामील होतात,
मिट्ट काळोखात लपेटून घेतात ...
अवसेची
रात्र ओसरताच
मलूल
झालेल्या चांदण्या चंद्राच्या शोधात सैरभैर होतात,
आकाशपाताळ
एक करतात,
नवी
सांज होईस्तो त्याला शोधून आणतात.
मग
चंद्र देखील पूर्वपदावर येऊ लागतो,
धुंद
चांदण्यांच्या मंद उजेडातल्या मैफिलीत न्हाऊन निघू लागतो,
त्यांच्या
प्रेमकवितांना पुन्हा बहर येऊ लागतो
प्रसन्न
उत्फुल्लित चंद्र पौर्णिमेच्या रात्रीला उजळून टाकतो.
पश्चिमेहून
निघताना वाटेतल्या चांदण्यांना खुणावत राहतो
थेट
पुर्वेपर्यंत त्यांच्या देहाला प्रकाशाचं झुंबर लावतो.
पुनवेला
चांदण्यांच्या खांद्यावर अंधाराची कावड नसते
चंद्राच्या
क्षणिक सहवासात त्या चंदेरी तेजात चिंब होतात.
“चांदण्या
रात्री प्रेमाला बहर जरा जास्तच येतो ..”
कवींच्या
या पंक्तीत खूप मोठा अर्थ दडला आहे हे खरं...
- समीर.
No comments:
Post a Comment